पोस्टऑफिसउघडआहे !
या पोस्टचा जिकडेतिकडे समाज माध्यमावर धुमाकूळ सुरू दिसला. मला या “उघड्या पोस्ट ऑफिस ” चा काही केल्या लवकर उलगडा होईना .यावर काही आचरट विनोद ही आले. आचरटच विनोद लोकांना भारी वाटतात .पण हे सभ्य लोकांना बोलता येत नाही. तेही जाहीरपणे ? बर ते जाऊ द्या ! हा सगळा घोळ झाला तो माझ्या घरचा टीव्ही मागील कित्येक वर्षात बंद असल्यामुळे ! हा काय प्रकार आहे ते माझ्या लक्षात आले नाही.पण आज मी माझ्या बंद टीव्हीची नाही तर बंद पोस्ट ऑफिस ची गंमत सांगणार आहे !
सुनीता गुंजाळ , पोस्ट ऑफिस जवळ , कळंब .
हा माझा पत्ताच होता .म्हणजे मी डबल आडनावाची नाहीतर सिंगल आडनावाची असतानाची ही माझ्या बालपणाची गोष्टय ! आमचं घर पोस्ट ऑफिसच्या आगदी जवळच होतं. आणि पोस्ट ऑफिस म्हणजे आम्हा सगळ्या मैत्रिणींचा खेळण्याचा तो अड्डाच होता. मी आठवी /नववीला असेल. मला हिंदी शिकवायला कदम सर होते .अगदी रुबाबदार व्यक्तिमत्व ! गोरेपान .पिळदार काळ्याभोर मिशा . अगदी हिरो सारखेच दिसायचे सर. पण भयंकर कडक होते. अख्खी शाळा त्यांना टरकायची. सर गृहपाठाच्या वह्या वर्गात तपासत होते. आपली वही आली की सरांच्या जवळ जाऊन उभा रहायचे .हा नियमच होता. माझा नंबर आला, तशी मी सरांजवळ जाऊन उभारले.
“गुंजाळ…..”
सर कडाडले .तशी मी निमूटपणे उभी राहिले.
” काल महाराणाप्रताप घोड्यावर बसून पोस्टात पत्र टाकायला आले होते !”
मी प्रचंड घाबरले .
“सर मी काल पोस्टात खेळत नव्हते .”
अत्यंत घाबरत मी उत्तर दिले. ” म्हणजे काल तू महाराणा प्रताप यांना पाहिले नाहीस!” सरांचा स्वर अजून वाढला होता.
मी मानेनेच नाही म्हणाले.
” तू मूर्ख आहेस का ?”
मला काहीच समजेना. माझ्यापेक्षा जास्त वर्ग घाबरला होता .
सर हळू आवाजात म्हणाले,
,” तुला उत्तर देता येत नाही का ?
ते कसे येतील आता. ”
सगळा वर्ग खो-खो हसायला लागला .मीही त्यात सामील झाले अन सर ही !
पण त्या दिवसाने मला आत्मविश्वासाने प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला मात्र नक्की शिकवलं.
90 च दशक म्हणजे पत्राचा जमाना होता तो .15 पैशाला मिळणार पोस्ट कार्ड पळत पळत जाऊन आणायला अन पोस्टात टाकायलाही तेवढीच मजा यायची. आम्हीही त्याकाळी बरीच पत्र लिहायचो. बाई मावशी या आमच्या लाडक्या पण अशिक्षित मावशीला आम्ही जास्त पत्र लिहायचो.ती कोणाकडून तरी ते वाचून घ्यायची .आमच्या सगळ्यांचीच ती आवडती मावशी होती .
एकदा मोठ्या भावाने मावशीला पत्र लिहिले .पत्र मिळाल्यावर मावशीने ते नेहमीच्या वाचणाऱ्या मुलाकडे नेले .आणि ती त्याला पत्र वाच म्हणाली.
” काकू काहीच वाचता येत नाही हे पत्र !”
तो मुलगा म्हणाला.
मावशी रागातच पण मनात म्हणाली
“मेल्या तुलाच वाचता येत नाही ! माझ्या बहिणीचा मुलगा किती हुशार आहे!”
(हे तिनेच आम्हाला नंतर सांगितले )ती दुसऱ्या व्यक्तीकडे पत्र घेऊन गेली. ते पण म्हणाले ,
“पत्र वाचता येत नाही!” मावशी भयंकर चिडली .ती आणखी दोन-तीन व्यक्तीकडे तेच पत्र घेऊन गेली. पण कोणालाच वाचता आले नाही .आमच्या बंधूची ती करामत होती .कोणालाच वाचता येणार नाही असं पत्र लिहिलं होतं. महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटर प्रिंट पेक्षाही त्याच अक्षर सुंदर आहे. मावशी प्रत्येक वेळी आली की ही आठवण काढायची.अन आम्ही हसायचो.मावशी गेली.पण आठवण कायम आहे.
याच बंधूने आणखी एक करामत केली! तो खूप लहानही नाही पण आडमाप असतानाची ही गोष्ट. पोस्ट ऑफिस जवळ घर आहे कळाल्याने एका व्यक्तीने लिहिलेलं पोस्ट कार्ड त्याच्याजवळ पोस्टात टाकायला दिले .
घरी आल्यानंतर त्याने ते पत्र वाचलं अन त्या पत्रात उरलेल्या रीकाम्या जागेत लिहिलं की ,
“तायडीच्या लग्नाचा प्रयत्न करतो आहोत .पण अजून जमलं नाही .”
आणि ते पत्र पोस्टात टाकलं. नंतर आईला हे कळालं .
आईने कपाळावरच हात मारला. त्या एका वाक्याने पत्र मिळणाऱ्याच्या घरात काय काय गजब झाला असेल ? मागील कित्येक वर्षात आम्ही चर्चा करतो आहोत. पत्र लिहिणाऱ्याच्या घरातली तायडी अगोदरच विवाहित नसावी इतकीच प्रार्थना आईने केली .नाही तर काय भानगड झाली असती बिचारीच्या सासरी ! देव जाणे.
पोस्टमन दारात आल्याबरोबर ,
गुंजाळ ……गुंजाळ! असा जोरात आवाज द्यायचा .काय आनंद व्हायचा म्हणून सांगू. घरातली प्रत्येक व्यक्ती पळतच दारात येऊन पोस्टमन कडे अगदी आशाळभूत नजरेने पहायची. त्या दिवशी असेच पोस्टमन काका ,
गुंजाळ ……गुंजाळ करत आले. ते म्हणाले,
” सुनीता गुंजाळ कोण आहे ?”
माझं नाव घेतल्यावर मी अगोदर घाबरले .
“सुनिता गुंजाळ ची
मनीऑर्डर आहे !”
क्षणात स्वर्ग दोन बोटावर आला !.
माझी मनीऑर्डर कसली ? प्रत्येकालाच उत्सुकता लागली. पण त्या अगोदर त्यांनी कागदात गुंडाळलेली वस्तू माझ्या हातात दिली. त्यावर बक्षीसाचं नाव ,कोणी पाठवलं .सगळी माहिती होती. मुलांसाठी असलेल्या स्पर्धेचे बक्षीस थेट पुण्याहून मला आलं होतं .मनामध्ये मोर थुई थुई नाचायला लागला. पोस्टमन काका माझ्या सह्या घेत होते .मनी ऑर्डर पाहण्यासाठी आता घरच्या सोबत शेजारीपाजारी सुद्धा गोळा झाले .कारण मला मनी ऑर्डर आली हे जणू काही आठवे आश्चर्यच बनले होते .पोस्टमन काकांनी सगळी प्रोसिजर झाल्यावर खिशातून एक रुपया काढून माझ्या हातावर ठेवला. शेवटचं बक्षीस अनेकात विभागून माझ्यापर्यंत एक रुपया आला होता ! सगळेजण हसायला लागले. या रुपयासोबत किल्ल्यावरचे मावळे तयार करण्याचा साचा बक्षीस म्हणून होता .पोस्टमन नाकीलमामाही हसत हसत निघून गेले. मला प्रत्येक वेळी ते घरी टप्पा घेऊन आले की ते त्या मनीऑर्डर मुळे मलाच हसतात !असे वाटायचे .पण आई म्हणायची ,
” नाही ग नाकील मामाचा चेहराच हासरा आहे !”
आईने दुकानात काही सामान आणायला पाठवले की ,मी थोडा वेळ पोस्टात खेळायचीच .पत्र टाकतात त्या पेटीच्या खाली एक आडवी फळी मस्त ठोकलेली होती. त्यावर चढायचं आणि खाली उड्या मारायच्या. हा आमचा खेळच होता. बऱ्याच वेळी त्या पत्रपेटीत लांबपर्यंत हात घालायचा .ती ही एक मज्जा असायची .त्या दिवशी सामान आणायचं म्हणून आईने एक नोट दिली होती. आणि माझ्याकडे एक छोटी पर्स होती .त्यामध्ये माझी काही चिल्लर होती. आईने दिलेली नोट त्या पर्स मध्ये ठेवून मी दुकानाला निघाले खरी पण ,मध्येच पोस्ट ऑफिस कडे वळले. एक दोन मैत्रिणी तिथेच गजगे खेळत होत्या .(परवाच विषय निघाल्यावर शेजारची छोटी दुर्गा ,
काकू व्हॉट इज मिन बाय गजगे ! म्हणाली होती !)
मी त्यांचा गजग्यांचा डाव मोडला. अन पोस्टातल्या त्या आडव्या फळीवर आम्ही चढलो. मी माझा हात त्या पत्रपेटीत घातला .पुन्हा काढला .एवढ्यात माझी ती पर्स आत मध्ये पडली .पर्स काढायचा प्रयत्न केला पण छे !काही केल्या जमेना .मग रडायला सुरू केलं. सोबत आनी होती. ती म्हणाली
“अगं पर्स जिथे पडली तिथून आणू ,चल मला माहित आहे !”
पण कसं शक्य होतं ?आम्हाला ते लोक खूप रागवायचे .आज पोस्ट ऑफिस नेमक उघड होतं. त्यामुळे आम्ही नेहमीच पोस्ट ऑफिस बंद होण्याची वाट पाहायचो.
म्हणजे अगदी बिनधास्त खेळता यायचं. आम्ही सगळ्याच घाबरत घाबरत आतमध्ये गेलो.
तसा एक जण जोरात खेकसला ,
” आत काय काम आहे ग कारट्यांनो !”
मी पुन्हा रडायला सुरुवात केली. एवढ्यात मला तिथेच नेहमीचेच पोस्टमन
नाकीलमामा दिसले. माझा जीव भांड्यात पडला. आम्ही त्यांच्या कानावर घडला प्रकार घातला .ते पुन्हा तसेच गोड गोड हसले. .अन ती इटूकली पर्स जिथे पडली होती तिथून माझ्या ताब्यात दिली. आणि पुन्हा एकदा गड जिंकल्याचा आनंद मिळाला. पण घराजवळ पोस्ट ऑफिस असल्याने एक मात्र झालं, सारखं सारखं लिहायच आणि पोस्टाची सवय लागली .
म्हणून तर मग माध्यमावर जेव्हा *पोस्ट ऑफिस उघड आहे* म्हटल्याबरोबर मला बंद पोस्ट ऑफिस ची माझी आठवण आली. आम्हाला उघड्या पोस्ट ऑफिस ऐवजी बंद पोस्ट ऑफिस का आवडायचे ते आता तुम्हालाही कळले असेल! हो की नै !
सुनीता गुंजाळ -कवडे
धाराशिव (उस्मानाबाद)
THE BEST