‘आधार’ ची सदोषनोंदणी प्रक्रिया सामान्यांना फारच त्रासाची झालेली आहे. आधार कार्डाचा उपयोग काय आणि कुणाला? त्याची सक्ती कशाला? याबाबतची पोस्टमार्टेम करावीशी वाटते ती अशी
(१) ज्यांच्याकडे स्वपरिचयाचा आधार नसेल अशा सामान्यांचा आधार क्रमांक ही सर्वमान्य ओळख असल्याने “आधार नोंदणी ही मोफत आणि स्वैच्छिक आहे/aadhar enrollment is a free and voluntary” अशी ठळक सूचना आधार नोंदणी फोर्मवर नमूद आहे तर मग “महाराष्ट्र शासन पत्र क्र.बैठक २०१२/प्रक्र३५१/झोपुसू-१ दि.०९/०८/२०१२ नुसार सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी अर्जदारास “आधार कार्ड” सादर करणे आवश्यक राहील. आधार कार्ड सादर केल्याशिवाय सदनिकेचा ताबा देण्यात येणार नाही” अशी सक्तीची अट म्हाडाने गिरणी कामगारांना घालणे कितपत योग्य आहे? आणि अनेक शासकीय/निमशासकीय कामांसाठी, निव्वळ ओळख सांगणार्या आधार कार्डाची सक्ती नागरिकांवर शासनाकडून का लादली जात आहे?;
(२) आधार नोदणीकर्त्या संस्थेने नागरिकांना नोदणीपासून ६० ते ९० दिवसांत ‘आधार’ क्रमांक जारी करण्याचे बंधन असतांना एक वर्ष उलटून गेले तरीही कित्येकांना आधार क्रमांक आजतागायत का मिळालेला नाही?;
(३) आधार क्रमांक हा विशिष्ट १२ अंकीचा असेल आणि त्यात प्रत्येक व्यक्तीचे छायाचित्र, हाताच्या बोटांचे ठसे व बुब्बूळाचे छायाचित्राची नोंद असेल तेव्हा स्वत:चा १० अंकी भ्रमणध्वनी क्रमांक कित्येकांच्या आठवणीत राहत नाही त्याठिकाणी आधारकार्ड हरवल्यास १२ अंकी क्रमांक नागरिकांच्या कितपत आठवणीत राहील? आणि केवळ व्यक्तीचे छायाचित्र, हाताचे ठसे आणि बुब्बूळाच्या छायाचित्राचा वापर करून दुय्यम आधार कार्ड मिळवता येईल का?;
(४) राजकीय सत्तांतरानंतर आणखी कुठच्या तरी सर्वमान्य ओळखकार्डचा जावई शोध लावून ते कार्ड अंमलात आणले तर त्यावेळेस या आधारकार्डचा कितपत उपयोग होईल? कारण सत्तांतरानंतरही आधार कार्डाची मान्यता कायम राहील आणि केवळ ओळख सांगणार्या आधार कार्डासारखा दुसरा पर्याय अंमलात आणता येणार नाही अशी तरतूद केलेली आहे का? नसेल तर मग इतर पर्याय असतांना कशाला हवी ही खटाटोप आणि सक्ती?.
सुभाष रा. आचरेकर, वांद्रे (पूर्व).
Leave a Reply