तो खातो म्हणून –
मी खातो,
हा खातो म्हणून –
तो खातो.
माझे दहा –
त्याचे दहा ,
त्यांचे वीस आणि –
साहेबांचे पन्नास.
प्रत्येकाचे वाटे –
नेमके ठरलेले ,
पोट ठेवायचे –
सतत भरलेले.
काम करायचंय तर –
खायला द्या ,
नाहीतर फेरी परत –
मारा उद्या.
पण उद्या मात्र आहे –
माझी रजा,
काम परवा तुमचं… –
झालंच समजा.
तसाही…बाहेरच आहे –
मी परवा ,
आणि…ऑफिस हाफ डे –
असणार तेरवा.
मग रविवार !
म्हणजे सोमवारीच या.
काय ?आताच आणलेयत –
खाण्याचे पुडे ?,
मग लगेच सरकेल फाईल –
सहीला पुढे.
अहो, वेळेचं काय ? –
अर्ध्या वाटेवरून येतील,
तुमचा पुडा –
घेऊनच परततील.
खाणं वेळच्या वेळी –
झालं ना ,
आणि पोट भरलेलं –
असलं ना,
तिथे प्रश्नच नसतो –
मग काहीच ,
अहो करायची तर असते –
फक्त सहीच.
पण तेच अनेकदा –
राहून जातं,
सहिशिवाय सारं –
गाडच अडतं.
म्हणून म्हणतो –
खाण्याचं पहा आधी ,
मग तुमच्याच कामाचं –
पाहू सर्वांआधी.
माझे दहा –
त्याचे दहा ,
त्यांचे वीस आणि –
साहेबांचे पन्नास.
काय म्हणता ???-
विषाणू पसरतोय ?,
काही कल्पना नाही –
अहो, वेळ कुठे मिळतोय ?
अहो, उदरभरण झालेलं –
असलं ना ,
मग हे विषाणू वगैरे –
कुठे येतय मनात, सांगा ना ?.
शेवटी काय ? तर ते –
तुडुंब भरणं महत्त्वाचं ,
सगळं ‘ त्या ठिकानी ‘ सोडून –
आपण शांत झोपायचं.
प्रासादिक म्हणे
–प्रसाद कुळकर्णी
Leave a Reply