पुण्यात वाहतूकव्यवस्थापन करणाऱ्या प्रभाताई नेने यांचा जन्म ३० मे १९३७ रोजी झाला.
या लॉकडाउनच्या आधी गेली अनेक वर्षे अतिशय बारीक कुडी असलेल्या या प्रभाताई नेने आजी पुणे शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर स्वयंस्फूर्तीने वाहतूक नियमन करून वाहतुकीला शिस्त लावायचा प्रयत्न करताना तुम्ही बघितल्या असतील.
साधारण २००० साली ‘निर्धार’या संस्थेच्या श्रीमती शीला पद्मनाभन यांनी नागरिकांना एक आवाहन केले की, त्यांना स्कूल गेट व्हॉलेंटियर हवेत. कल्पना अशी होती की, शाळा भरताना आणि सुटताना शाळेसमोरील रस्त्यावर हे कार्यकर्ते विद्यार्थ्यांची सुरक्षा सांभाळतील आणि ट्राफिक कंट्रोल करतील. प्रभा नेने या आजींनी आपले नाव त्यासाठी नोंदवले आणि त्यांनी ह्या सेवेस सुरवात केली. सकाळी ७-७.३० वाजता सिंबायोसिस शाळेबाहेर उभ्या राहून बेशिस्त वाहतुकीतून मुलांना सुखरूप शाळेत वा रिक्षेपर्यंत पोहचवणे. प्रसंगी वाहतूक थाबवून मुलांना रस्ता करून देणे हे सुरु झाले. मग त्या दुपारी डेक्कन भागातील चौकात आपला वेळ देऊ लागल्या. पुण्यातील सर्वात गजबजलेला खंडूजीबाबा चौक, नळ स्टॉप इथे त्या पोलिसांना मदत करू लागल्या. सुरवातीला लोक त्यांना विचारत, आजी किती दिवस हा ‘निर्धार’ टिकणार? त्या म्हणत जीवात जीव असे पर्यंत. आज १८ वर्षे आजी शाळात, चौकात, उन्हापावसात हे काम करतायत. आज वयाच्या ८०व्या वर्षी देखील सकाळी सिंबायोसिस शाळा दुपारी ११ ते १ कोथरूडचे परांजपे हायस्कूल इथे त्या पुणेकरांची सेवा करतात. सकाळी त्यांच्या गरवारे कॉलेज समोरील घरातून सिंबायोसिसशाळेपर्यंत चालत जातात. दुपारी परांजपे शाळेत त्यांच्या स्वत:च्या पूर्वी फियाट व नंतर वँगन आर या गाडीने जात. या वयात देखील त्या गाडी उत्तम चालवतात.तीन वर्षा पूर्वी त्या ही नवी कोरी वँगन आर घेऊन सकाळी ६.३० वाजता पुण्यातून निघाल्या आणि ९.३० वाजता सोलापूरला ‘टच’. ही गोष्ट त्या अगदी सहज पणे सांगतात. त्यांच्या कडे बेबी ऑस्टीन ही विंटेज गाडी असून त्याला त्या आपली जिवलग सखी समजतात.
प्रभा नेने यांना काही वर्षा पूर्वी महिला महोत्सवात ‘सौदामिनी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या सदा आनंदी असणाऱ्या प्रभाताई, whatsapp वर येणारे सकारात्मक संदेश आपल्या वहीत, स्वतःच्यासुवाच्य अक्षरात लिहून काढत त्यांचा संग्रह करीत लॉकडाऊनमध्येही आनंद घेत आहेत.
प्रभाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply