१९६३ सालची गोष्ट आहे.. सी. विश्वनाथ या दिग्दर्शकाने एस. फत्तेलाल यांना सांगितलं की, आपण मुंबईला व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओत आपल्या नवीन चित्रपटाचं चित्रीकरण करुयात. त्यासाठी दोघेही मुंबईला पोहोचले. ते दोघे ऑफिसमध्ये जाऊन बसले व व्ही. शांताराम यांना भेटण्याची इच्छा तेथील कर्मचाऱ्यास सांगितली. त्यांना बापूंनी तासभर थांबण्याचा निरोप दिला. तासाभराने बापू आले व त्या दोघांशी बोलायला सुरुवात केली. सी. विश्वनाथ यांना विश्र्वास होता की, एस. फत्तेलाल यांच्या स्टुडिओच्या मागणीला बापू नाही म्हणणार नाहीत.. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. बापूंनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यास स्टुडिओच्या बुकिंग बद्दल विचारले, त्याने बुकिंग दोन तीन महिने उपलब्ध नसल्याचे सांगितले.. दोघेही निराश झाले व बापूंच्या ऑफिसमधून बाहेर पडले..
सी. विश्वनाथांना एस. फत्तेलाल म्हणाले, ‘आपण टॅक्सी करुन एके ठिकाणी जाऊयात.’.. टॅक्सी मेहबूब स्टुडिओच्या फाटकासमोर उभी राहिल्यावर दोघेही उतरले व मेहबूब स्टुडिओच्या ऑफिसमध्ये जाऊन बसले.
त्यावेळी स्टुडिओचे मालक मेहबूब, हे नमाज पढत होते. थोड्याच वेळात त्यांचे नमाज पढून झाल्यावर एस. फत्तेलाल यांच्या पायाशी, ते जमिनीवर बसले व प्रश्न केला, ‘साहेबमामा, कसे येणे केलेत? मी आपली काय सेवा करु?’ सी. विश्वनाथ यांना संकोचल्यासारखं झालं होतं.. ‘मदर इंडिया’ सारख्या ब्लाॅकबस्टर चित्रपटाचा निर्माता व दिग्दर्शक जमिनीवर बसून साहेब मामांना ‘काय सेवा करु?’ असे नम्रतेने विचारत होता..
साहेबमामांनी, मेहबूबला शुटींगसाठी स्टुडिओ हवा असल्याचं सांगितलं. मेहबूबने तात्काळ होकार दिला व नवीन तयार होणाऱ्या फ्लोअरवर शुटींगची परवानगी दिली. आता प्रश्र्न होता, भाड्याचा. त्याविषयी मेहबूबने स्वतःच सांगितले की, मी हिंदी चित्रपटासाठी शिफ्टला दोन हजार घेतो. आपल्या मराठी चित्रपटासाठी फक्त पाचशे रुपये घेईन. सी. विश्र्वनाथ व साहेब मामांनी खुशीने होकार दिला व मेहबूब साहेबांचे आभार मानले..
यथावकाश ‘युगे युगे मी वाट पाहिली’ हा चित्रपट तयार झाला. चित्रपटाला राज्य पुरस्कारांबरोबरच मानाचा, राष्ट्रीय रौप्यपुरस्कार देखील मिळाला मात्र चित्रपटाचे हे उत्तुंग यश पाहण्यासाठी ज्येष्ठ कलादिग्दर्शक एस. फत्तेलाल या जगात नव्हते..
एस. फत्तेलाल उर्फ साहेबमामांचा जन्म कोल्हापूरमधील कागल येथे १८९३ साली झाला. त्यांनी चित्रकलेचे कोणतेही शिक्षण अथवा पदवी न घेता त्या कलेत कौशल्य प्राप्त केले.
व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले व एस. फत्तेलाल या तिघांनी मिळून ‘प्रभात’ची स्थापना करुन, एकाहून एक सरस चित्रपटांची निर्मिती केली. अमृतमंथन, चंद्रसेना, धर्मात्मा, कुंकू, माणूस, संत ज्ञानेश्वर, रामशास्त्री अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी आपल्या कल्पक बुद्धीमतेने तो काळ हुबेहूब उभा केला.
त्यांनी आपल्या कला दिग्दर्शनातून ‘अमरज्योती’ मध्ये प्राचीन भारताचे वैभव साकारले. ‘कुंकू’ चित्रपटातून मध्यमवर्गीय सोज्वळता मांडली. ‘माणूस’ चित्रपटासाठी वेश्यावस्तीचा सेट उभा केला. ‘रामशास्त्री’ चित्रपटातून पेशवाईचं तत्कालीन वैभव दाखवलं. ‘गोकुळ’ चित्रपटासाठी मुंबईच्या गोशाळेतून अनेक गायी आणून, त्यांना खुराक देऊन धष्टपुष्ट केले. ‘शेजारी’ चित्रपटातील धरणफुटीचे दृष्य कल्पकतेने, सर्वोत्तम साकारले.
याच एस. फत्तेलाल यांनी ‘सैरंध्री’, ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्णिकंकण’, ‘मायामच्छिंद्र’, ‘अमृत मंथन’ व ‘चंद्रसेना’ या चित्रपटांसाठी चित्रीकरणाचेही काम केले.
‘चांद’, ‘हम एक है’, ‘गोकुळ’, ‘लाखाराणी’, ‘सीधा रस्ता’, ‘अपराधी’, ‘संत जनाबाई’ व ‘युगे युगे मी वाट पाहिली’ या चित्रपटांची निर्मिती केली.
एस. फत्तेलाल यांचेकडे कलाकुशलता होती, मात्र व्यवहार कुशलता नव्हती. त्यामुळे साहजिकच ते प्रसिद्धी आणि मानमरातब पासून दूर राहिले..
व्ही. शांताराम यांनी जरी त्यांना स्टुडिओ उपलब्ध करुन दिला नाही तरी मेहबूब सारख्या दिलदार निर्मात्याने, साहेबमामांचा शब्द खाली पडू दिला नाही.. त्याने आपल्या मृत्यूपत्रात, मराठी चित्रपटांसाठी आपल्या वारसदारांनी सवलतीत स्टुडिओ द्यावा, असे लिहून ठेवले होते..
‘युगे युगे मी वाट पाहिली’ या चित्रपटानंतर बावीस वर्षांनी जेव्हा ‘पुढचं पाऊल’ चित्रपटासाठी निर्माते मेहबूब स्टुडिओत गेले, तेव्हा मेहबूबच्या मुलाने, त्यांना आपल्या वडिलांच्या मृत्यूपत्रातील आदेशानुसार हिंदीला आकारल्या जाणाऱ्या भाड्याच्या एक पंचमांश रक्कम आकारुन स्टुडिओ उपलब्ध करुन दिला..
आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार वागणारी ही पिढी, निश्चितच कौतुकास पात्र अशीच आहे…
आज व्ही. शांताराम, साहेबमामा व मेहबूब देखील या जगात नाहीत मात्र त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये आपल्याला, खूप काही शिकवून जातात…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१५-९-२१.
Leave a Reply