इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद स्वामी यांचा जन्म १ सप्टेंबर १८९७ रोजी झाला.
हरे कृष्णा…कृष्णा कृष्णा…हरे हरे!! असा कृष्ण नामाचा गजर करीत धुंद होऊन नाचणाऱ्यांच्या मिरवणुका केवळ मुंबई, दिल्लीत नव्हे तर लंडन, न्यूयॉर्क, बर्लिन, पॅरिस, सिंगापूर अशा सर्वच शहरांत दिसतात. या देशी-विदेशींना कृष्णभक्तीची वाट दाखवणारे भक्तिवेदान्त प्रभुपाद स्वामी यांनी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण काॅन्शियसनेस म्हणजेच इस्कॉनची स्थापना केली व तिचा जगभर प्रचार व प्रसार केला.
प्रभुपाद स्वामीचे खरे नाव अभय चरण डे. त्यांचे शालेय शिक्षण युरोपीयन वळणाच्या स्कॉटिश स्कूलमध्ये झाल्याने पाश्चिमात्य रुढी व परंपरांची जाण त्यांना होतीच. शिवाय त्यांचे संस्कृत व इंग्रजी भाषा व भगवद्गीतेतील तत्वज्ञान यांवर विलक्षण प्रभुत्व होते. ते गीतेवर सविस्तर प्रवचने करत. प्रभुपाद स्वामींनी वयाच्या ३३व्या वर्षी दीक्षा घेतली व गौंडिय वैष्णव शिकवणुकीसाठी सारे आयुष्य वाहून घेतले. १९५९ मध्ये त्यांनी संन्यास घेतला.
त्यांची प्रासादिक वाणी, तर्कशास्त्र व गाढा अभ्यास यामुळे भारत व भारताबाहेर त्यांचा शिष्यसंप्रदाय वाढू लागला. त्यातूनच इस्काॅनचा जन्म झाला. आज इस्कॉनच्या भारत व सर्व खंडांत ५०० हून अधिक शाखा आहेत. त्यातून भारतीय तत्वज्ञानाबरोबरच सामाजिक कार्यही चालते. प्रभुपाद स्वामींनी गीतेचे निरुपण करणारी पुस्तके लिहिली. त्यांच्या लाखो प्रतींची दरवर्षी जगभर विक्री होते. प्रभुपाद स्वामी व इस्कॉन अनेकदा वादातही सापडले. त्यांच्यावर हेरगिरीसारखे व ड्रग्जच्या व्यसनांचे गंभीर आरोपही झाले आहेत.
प्रभुपाद स्वामींचे १४ नोव्हेंबर १९७७ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply