नवीन लेखन...

प्राचीन साहित्यातील लावण्यवती

स्त्री सौंदर्याचे मुख्य पैलू म्हणजे शरीरयष्टी, कांती, केस, अवयव आणि यौवन, नायिका तन्वी असावी म्हणजे शेलाटी, प्रमाणबद्ध असावी असा आग्रह सगळीकडे दिसतो. त्यामुळेच तिच्या शरीरयष्टीला फुललेल्या, नाजूक वेलीची उपमा नेहमी दिली जाते. एखाद्या कवीला अशी तनुगात्री पाहिल्यावर बीजेची चंद्रकोर आठवते. हंसीसारखी वा शंखासारखी मान, गोलाकार कोमल बाहु, कमळकळीसारखे किंवा कलशासारखे वक्ष, सिंहकटी, नितळ व सपाट पोटावर नाभीचा खोलसर आवर्त, केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या, कमळासारखे तळवे आणि पाऊले, चंद्रकोरीसारखी नखे हा भारतीयांच्या दृष्टीकोनातून स्त्रीसौंदर्यांचा आदर्श होता. जिच्या कोणत्याही अवयवात काहीही दोष काढता येणार नाही अशी ‘अनवद्यांगी’ किंवा जिच्या अंगावरचा तीळसुद्धा सुंदरच आहे अशी ‘तिलोत्तमा’ म्हणजेच खरी लावण्यखणी!

लावण्यवती गौरवर्णाची असावी असा हट्ट अगदी प्राचीन साहित्यापासून आजतागायत सगळीकडे सारखाच आहे. त्यामुळे सावळ्या रामचंद्राची सीता असो, की घनश्यामाची राधा असो, ती गौरकायच असते. सुंदरीचे गोरेपण दोन प्रकारचे सांगितले आहे ‘चाम्पेयकान्ति’ आणि ‘कमलकान्ति’. काही सोनचाफ्याच्या वर्णाच्या, तर काही कमळासारख्या गुलाबी-लालसर कांतीच्या. श्यामलवर्णाच्या सुंदरी फार क्वचितच वर्णिलेल्या आहेत. त्यांपैकी एक ठळक उदाहरण महाभारतातल्या द्रौपदीचे. तिच्या सावळ्या रंगामुळेच तर तिचे नावही कृष्णा आणि तिचे अंतरंगही कृष्णाशी एकरूप झालेले! बौद्ध वाङ्मयातही निळ्या कमळाचा वर्ण ल्यायलेल्या उत्पलसुंदरीचे वर्णन आले आहे. केशकलाप म्हटले म्हणजेही पहिल्यांदा डोळ्यांसमोर येते ती द्रौपदीच! तिच्या काळ्याभोर, घनदाट, कुरळ्या, मोकळ्या केसांना व्यासांनी पावसाळी आभाळाची उपमा दिलेली आहे. आपल्या केसांच्या नानाविध रचना करण्यात आणि त्यांना सजवण्यात सगळ्याच नायिका मोठ्या तत्पर असतात. सुगंधी चूर्णे वापरून न्हातील, केस उदा-धुपाने सुकवतील, वेण्यांचे वा अंबाड्यांचे वेगवेगळे प्रकार करतील, त्यांवर फुले, मोत्यांच्या जाळ्या किंवा सोन्याचे चंद्र-सूर्य घालून त्यांचे सौंदर्य खुलवतील. मोराच्या निळ्या जांभळ्या पिसाऱ्याचा जो डौल, तोच अशा सजवलेल्या केशसंभाराचा!

अवयवांपैकी सर्वांत आधी आणि प्रकर्षाने लक्ष वेधून घेतात ते डोळे! संस्कृत कवींनाही डोळ्यांचे फार कौतुक! एखाद्या सुंदरीचे नेत्र कमळाच्या पाकळीच्या आकाराचे, तर दुसरीचे मत्स्याकृती. मृगनयना तर कितीतरी जणी. कोरीव भुवयांच्या कमानी हे तर मदनाचे धनुष्य आणि काळ्याशार, दाट, लांबसडक, किंचित वर उचललेल्या पापण्यांनी सजलेले नेत्रकटाक्ष म्हणजे मदनाचे अमोघ बाणच जणू! सुंदरीची नजर कशी असावी हे सांगायलाही कवी विसरत नाहीत. भ्यालेल्या हरिणीसारखी किंवा जलात सुळसुळणाऱ्या मासोळीसारखी चंचल नजर हे साऱ्याच नायिकांचे वैशिष्ट्य! आकाशातून चाललेल्या कृष्णमेघाकडे ललनांच्या पाहणाऱ्या डोळ्यांना कुंदफुलांवर हालत्या-डोलत्या झेपावणाऱ्या भ्रमरांची शोभा येते असे वर्णन कालिदासाने मोठ्या रसिकपणाने नोंदवून ठेवले आहे.

लावण्यवतीचे ओठ लालचुटुक आणि धनुष्याकृती असेल तर ते कमालीचे मोहक दिसतात. संस्कृतात नेहमी सापडणारी उपमा पिकलेल्या लालसर तोंडल्याची. कधीकधी लालसर, सुकुमार, कोवळ्या पालवीची किंवा उगवत्या चंद्राच्या लालसर रंगाचीही उपमा ओठांना दिली जाते. अशा पक्वबिंबाधरोष्ठांनी शिवाला सुद्धा आकर्षून घेतले, तिथे इतरेजनांची काय कथा! उमा किंवा शकुंतला अशा सुंदरींचे कमळासारखे उत्फुल्ल कांतिमान मुख, कमलदलासारखे लाल, रसाळ ओठ आणि विशेष म्हणजे त्यांच्या श्वासाचा कमळासारखा गंध या सगळ्यामुळेच तर वेडावलेले ते भुंगे खऱ्या कमळांना सोडून या नायिकांच्या मुखा-ओठांभोवतीच रुंजी घालू लागले!

लावण्य पूर्णपणाने, सर्वार्थाने फुलते, खुलते ते यौवनावस्थेतच! यौवनाचा साज हाच खरा लावण्याचा अलंकार! यौवन साध्या-सुध्या रूपालाही वेधक बनवते, तर मग जातीच्या सुंदरींच्या बाबतीत काय बोलावे! पूर्ण बहरलेल्या यौवनाने मुसमुसलेली सुंदरी म्हणजे फुलांच्या गुच्छांनी लगडलेली वेलच जणू!

सौंदर्याच्या सगळ्या वर्णनांबरोबरच बाधा आणणाऱ्या गोष्टींचीही यादी केलेली आहे. तपकिरी डोळे, जाड ओठ, उभे राहणारे केस, अति कृशता किंवा अति पुष्टता, छोटे कपाळ, जाड भुवया, विरळ तीक्ष्ण दात, पांढरे डाग असलेली नखे, अति काळा किंवा अति गोरा रंग अशी कुरूपतेची अठरा लक्षणे सापडतात.

सौंदर्य दोन प्रकारचे असते बिजलीसारखे लखलखणारे, तळपणारे, आपल्याच मस्तीत राहून आव्हान देणारे किंवा समईच्या ज्योतीसारखे शांत, सोज्वळ, प्रसन्नपणाने आल्हाद देणारे. पहिल्या प्रकारचे सौंदर्य दिसते उर्वशीमध्ये, द्रौपदीमध्ये, मृच्छकटिकातल्या वसंतसेनेमध्ये किंवा बाणभट्टाच्या कादंबरीमध्ये; तर दुसऱ्या प्रकारचे सौंदर्य सापडते लक्ष्मीच्या वर्णनामध्ये, रामायणातल्या सीतेमध्ये, कालिदासाच्या मेघदूतातल्या यक्षपत्नीमध्ये. शकुंतलेमध्ये, अशी लावण्यमूर्ती स्त्री विधात्याने कशी घडवली असेल? कालिदास म्हणतो, विधात्याने आधी जगभरातली सगळी सौंदर्ये एकत्रित करून तिचे चित्र काढले असेल, आणि ते मनासारखे जमले म्हटल्यावर त्या चित्रात प्राण ओतले असतील. एकट्या विधात्याला एवढे कौशल्य दाखवता येणे अशक्यच. निश्चितच त्याने चंद्र, वसंतऋतू, शृंगाररस आणि मदन या सर्वांची मदत घेऊनच असे अजोड काम केले असणार अशी कवींची धारणा आहे.

प्राचीन भारतीय सौंदर्याकडे पाठ फिरवणारा, सौंदर्याला झाकून-लपवून ठेवणारा वा नाकारणारा नव्हता; उलट स्त्रीसौंदर्याकडे रसिकपणे, कौतुकाने पाहणारा, त्याची पूजा करणारा होता. आदिशंकराचार्यांच्या कितीतरी देवीस्तोत्रांमध्ये देवीच्या लावण्यमय रूपाचे गुणगान केलेले उत्सवांमध्ये दिसते. नटून थटून सहभागी होणाऱ्या सुंदरी ऋग्वेदातही पहायला मिळतात. बौद्ध काळात तर सौंदर्यस्पर्धा होत असत आणि जनपदकल्याणी तसेच नगरसौभिनी निवडल्या जात असत. स्त्रियांना आपल्या सौंदर्याची जाणीव असे, अभिमानही असे. सौंदर्याची निगा राखणे आणि प्रसाधनांच्या मदतीने ते अधिकाधिक खुलवणे या दोन्ही बाबतीत त्या कुशल होत्या असे प्राचीन साहित्यातील वर्णनांवरून दिसते.

‘सुंदरतेच्या सुमनांवरचे दव चुंबुनि घ्यावे’ हा तर कलावंतांचा धर्मच आहे. पण फक्त कवींनी लावण्यवतींच्या सौंदर्याची शाब्दिक वर्णने रंगवण्यातच धन्यता मानली असे नव्हे; तर चित्र-शिल्पकारांनीही रंगरेषांच्या आणि धातू-दगडांच्या माध्यमांतून विधात्याची ही सर्वश्रेष्ठ निर्मिती साकार केली. अजिंठ्यातली आणि प्राचीन हस्तलिखितांतील चित्रे आणि वेरूळसारख्या अनेक लेण्या-मंदिरातली शिल्पे याची जीवंत साक्ष देतात.

-डॉ. मंजूषा गोखले

व्यास क्रिएशन्सच्या कस्तुरी – महिला विशेषांकातून साभार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..