वसुंधरेवर मानव जन्माआधी कुठल्याही प्रकारचे प्रदूषण अस्तित्वात नसावे. मानव जन्मानंतरही काही युगं कदाचित सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने विरहीतच गेली असतील. कालांतराने मानवांची लोकसंख्या वाढत गेली आणि मानवाच्या दैनंदिन आणि मुलभूत गरजाही वाढत गेल्या. मानवाने आपल्या बुद्धीच्याबळावर विज्ञान तंत्रज्ञान विकसित केले आणि नवनवीन शोध लावले. मानवाकडे असलेल्या अतृप्ती, असमाधान, लोभ, स्पर्धा, दुर्गुणांमुळे त्याने वसुंधरेवरील सर्वच खजिन्यांचा आणि स्त्रोतांचा मुक्त आणि अनिर्बंध वापर करण्यास सुरवात केली आणि आता अशी परिस्थिती आहे की त्यामुळे वसुंधरेवर प्रमाणाबाहेर काही महत्वांच्या स्त्रोताचा उदा. पृथिवीच्या पोटातील पाणी, खनिज, नैसर्गिक इंधनाचा वारेमाप उपसा केल्याने आणि त्याच्या बेसुमार वापराने वसुंधरेवर सर्वत्र सर्वच प्रकारचे प्रदूषण निर्माण झाले आणि त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या पुढील कित्येक पिढ्यांना भोगायला लागत आहेत आणि लागणार आहेत. यावर वेळीच आवर घातला नाही तर कदाचित भविष्यात प्रदूषण समस्या गंभीर रूप धारण करील. पण लक्षात कोण घेतो! सर्वचजण अंतर्मुख होऊन प्रामाणिक विचार आणि कृती करतीलच असे नाही. ती एकट्या दुकट्याने करण्याची क्रियाही नाही तर सर्वांनी मिळून त्यावर प्रामाणिक आणि सकारात्मक कृती करण्याची गरज आहे.
असो. आपण जल, वायू, ध्वनी, जमीन आणि रेडीओलहरींच्या प्रदूषणाचे प्रकार नेहमी ऐकतो, वाचतो आणि बघतो पण प्रकाशामुळेही प्रदूषण होते हे बऱ्याच जणांना माहित असेलच असे नाही. कारण हे प्रदूषण आपल्याला वाट्याला येतच असं नाही किंवा ते सहजासहजी उमगत नाही म्हणा किंवा आपल्यावर त्याचा थेट प्रभाव पडत असतो हे जाणवत नाही म्हणून असेल कदाचित.
प्रकाश प्रदूषणाचा कोणी विचार सुद्धा केला नसेल की प्रकाश हे प्रदूषणाचे कारण असेल. पशु, पक्षी, वनस्पती आणि मानवजात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.
शहरातून आकाशाकडे बघितले की चांदण्या स्पष्ट दिसत नाहीत परंतू तेच गावाकडे गेले किंवा एखाद्या उंच डोंगरावरून आकाशाकडे बघितले की चांदण्या स्पष्ट दिसतात. दिवसा आकाश्यात चांदण्या का दिसत नाहीत तर सूर्याचा प्रखर प्रकाश असतो. तसेच यामागील मुख्य करणं हे आहे की शहरातील व्यापक प्रकाश आणि वातावरणातील विद्यमान सूक्ष्म कणही जे रात्री विभिन्न स्त्रोतातून निघणाऱ्या प्रकाशाला वातावरणात पसरवतात म्हणजेच याचे मुख्य कारण हे कृत्रिम प्रकाशच आहे ज्यामुळे आकाशातील चांदण्या रात्री दिसत नाहीत.
प्रकाशच्या विभिन्न स्त्रोतांचा चुकीच्या प्रकारे वापर केल्याने तो हवेतील सूक्ष्म कणांबरोबर मिसळून वातावरणात सर्वत्र पसरतो. यामुळे रात्रीच्या आकाशाला एक प्रकारचा लालसर तांबूसपणा येतो. जेथे दिव्यांचा झगमगाट जास्त असतो तेथे प्रकाशाचे प्रदूषण जास्त असते. यासाठी आपण एक उदाहरण बघूया. सिनेमा हॉलमध्ये सिनेमा सूर होण्यापूर्वी हॉलमधील सर्व दिवे बंद करतात कारण स्क्रीनवरील चित्र स्पष्ट दिसावे. म्हणूनच आज आपल्याला रात्री आकाशातील तारे स्पष्ट दिसत नाहीत कारण आवश्यकतेपेक्षा वातावरणात जास्त दिवे लावल्यामुळे आपले खगोलीय स्क्रीन धुरकट झाला आहे.
रात्रीही सर्वत्र प्रकाश असल्याने पक्षांना कळत नाही की रात्र आहे का दिसव, एवढेच नाही तर जे प्रवासी पक्षी दरवर्षी हवामानानुसार आपले स्थलांतर करतात त्यांनाही हा प्रकाश संभ्रमित करतो. हे पक्षी चंद्र आणि तारे यांना पाहून दिशा ठरवतात परंतू अश्या कृत्रिम प्रकाशात त्यांचा अंदाज चुकण्याचा संभव असतो. काहीवेळा त्यांचा अंदाज चुकल्याने कधी लौकर तर कधी उशिरा स्थलांतर करतात आणि चुकीच्या ऋतूत तेथे पोहोचल्याने प्रतिकूल वातावरणात त्यांचे आगमन होते आणि बऱ्याच वेळा त्यांना प्राण गमवावा लागतो. चुकून वाचले तर त्यांच्या प्रजनन प्रक्रियेवर त्याचा परिणाम होतो.
अनेक प्राणी व कीटक नैसर्गिकरीत्या चंद्र आणि ता-यांच्या अंधुक प्रकाशातच मार्गक्रमण करू शकतात. प्रखर प्रकाशाने ते बावचळून जातात. टोरंटो येथील ‘फेटल लाईट अवेअरनेस प्रोग्राम’ या संस्थेचे मायकेल मिझुरेन यांच्या अंदाजाप्रमाणे उत्तर अमेरिकेतील झगमगीत उंच इमारतींवर १० कोटी पक्षी दरवर्षी तरी आपटत असावेत. रात्री उडणा-या पाकोळया कृत्रिम प्रकाशात गोंधळून जातात. वॉशिंग्टन विद्यापिठातील ‘बर्क म्युझियमचे’ कीटकशास्त्रज्ञ रॉड क्रॉफर्ड यांच्या मते एकेकाळी उन्हाळयात विपुल दिसणाऱ्या ‘जायन्ट सिल्क मॉथ’ ची संख्या कमी होण्यामागे त्यांच्या अधिवासाच्या-हासाच्या जोडीने प्रकाश प्रदूषण कारणीभूत असावे. प्रकाशापासून दूर अंतरावर अधिक संख्येने पाकोळया आढळतात याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. फिलाल्डेफियातील डॉक्टर आणि कीटकशास्त्रज्ञ केनेथ प्रँक म्हणतात ‘पाकोळयांना मीलनासाठी जी अल्पकालीन संधी असते ती झगमगीत प्रकाशामुळे हुकते. शिवाय प्रकाशात त्यांची सहजी शिकार होते. झगमगीत प्रकाशामुळे पाकोळयांच्या स्थलांतराच्या मार्गात गोंधळ होतो आणि त्या भलतीकडे अंधा-या बेटावर उतरतात.’ वेलस्ली कॉलेजमधील मरिऑन मूर या लिम्नोलॉजिस्ट झू प्लँक्टनचा अभ्यास करीत आहेत. झू प्लँक्टन हे कवचधारी सूक्ष्मजीव रात्रीच्यावेळी खाण्यासाठी जलाशयाच्या पृष्ठभागावर येतात आणि जलशैवाल खातात. प्रकाशात शिका-यापासून संरक्षणासाठी ते खोल पाण्यात दडतात. रात्रीच्या वेळच्या परावर्तित प्रकाशाच्या झगमगाटामुळे अधिक काळ त्यांना खोल दडून रहावे लागते. त्यांना चरायला कमी वेळ मिळतो. परिणामी जलशैवाल वाढत राहते व त्यामुळे इतर पाणवनस्पती गुदमरतात. जलाशयातील विविध कीटकांच्या प्रणयक्रीडा आणि मीलनाच्या कार्यक्रमात अडथळा येतो. चंद्रप्रकाशाच्या नैर्सगिक वातावरणात त्यांचे प्रणयी जीवन फुलत असते. जे प्राणी उन्हात आपल्या सावलीला बघून स्थानाचा अंदाज लावतात, हेच प्राणी रात्रीच्या अनावश्यक प्रकाशामुळे त्यांची ही क्षमता कमी होण्यात होते.
आपल्या सर्वांना माहिती आहे की झाडे, वेली आणि मोठे वृक्ष ‘फोटोसिंथेसिस’ क्रियेद्वारा आपले अन्न बनवतात आणि रात्रीचा अंधार त्यांना एक महत्वपूर्ण नैसर्गिक क्रिया करण्यात मदत करतात ज्याला आपण ‘फाइटोक्रोम’ नावाने जाणतो. अश्या कृत्रिम मिळणाऱ्या प्रकाशाने त्यांचे हे गुण आणि प्रक्रिया बाधित होते. एवढेच नाही तर ऋतूत होणारे बदल लता-वेली-झाडं-मोठेवृक्ष दिवस आणि रात्र यामुळे जाणतात. परंतू वातावरणातील कृत्रिम प्रकाश्याच्या अनियमिततेमुळे त्यांना ऋतूतील बदल किंवा फरक कळणे कठीण जाते. याचा प्रतिकूल परिणाम वृक्षांवर आणि वनस्पतींवर होतो.
परमेश्वराने आपली शरीर रचना आणि त्याचा विकास निसर्गाच्या नियमांतर्गत केला आहे. आपली वाढ दिवस आणि रात्र या प्रक्रियेतून होते आणि हे चक्र मानवाचे अस्तित्व असण्याच्या काळा पासून आहे. आपले जैविक घडयाळ याच नियमानुसार चालते. आपणही हळू-हळू अंधारापासून दूर होऊ लागलो आहोत आणि म्हणून आपल्याला बऱ्याच दुखण्यांनी आणि आजारांनी ग्रासले आहे. ही गोष्ट संपूर्ण झोप घेण्याची नाही तर रात्र सुद्धा प्रकाशमय असल्याने हे अनैसर्गिक आहे. ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट’च्या पत्रिकेत २००१ साली दोन वेगवेगळे संशोधन निबंध प्रसिध्द झाले होते. त्यावरून रात्रीच्या वेळी दीर्घकाल कृत्रिम प्रकाशात राहिल्याने छातीच्या कर्करोगाची शक्यता वाढते.
दृकपटलावर पडणा-या प्रकाशामुळे शरीरातील मेलॅटोनिन तयार होण्याचे प्रमाण कमी होते. या हार्मोनवर सिरकॅडियन चक्र अवंलबून असते. मेलॅटोनिनमध्ये ऍंटीऑक्सीडंट गुणधर्म आहेत. काही सस्तन प्राण्यांमध्ये मेलॅटोनिनमुळे एस्ट्रोजेन एस्ट्रॅडिओलची निर्मिती थांबते. हे हार्मोन स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित आहेत. प्रकाश हे एक औषध आहे पण त्याचा गैरवापर करून आपण आपल्या प्रकृतीशी तडजोड करतो असे काही शास्त्रज्ञांना वाटते.
मानवी शरीरातील मेलॅटोनिन प्रकाश आणि अंधारावर अवलंबून असेत. (दिवस आणि रात्र) जर माणूस उजेडात झोपला तर शरीरात तयार होणाऱ्या मेलटोनीनवर त्याचा परिमाण होतो आणि ते कमी प्रमाणत शरीरात तयार होते. याने झोप शांत आणि पूर्ण होत नाही यामुळे अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात जसे डोकं दुखणे, आळशीपणा, ताण, लठ्ठपणा, चिंतेत वाढ होणे. काहीप्रमाणात कॅन्सर सारखे रोग उदभवू शकतात. दृष्टीवर परिणाम होतो. आपल्या शरीरात मेलॅटोनिन नावाच्या एका हार्मोनची निर्मिती तेव्हांच होते जेंव्हा डोळ्यांना अंध:काराचा संकेत मिळतो. ह्यामुळे शरीरात प्रतिकारक शक्ती प्रदान करण्यापासून ते कॉलोस्ट्रोलचे कमी अथवा अधिक अतिआवश्यक कामगिरी निर्माण करणे जे आपल्या सुदृढ शरीरासाठी आवश्यक आहे.
कॉम्पुटर स्क्रीनमधून येणारा प्रकाशसुद्धा उपरोक्त बाधांमध्ये अडथळे निर्माण करतो. जो एक नील प्रकाशाचा स्त्रोत आहे. म्हणून रात्रभर जागून कॉम्पुटर काम केल्यानी फक्त डोळ्यालाच त्रास होतो असे नाही तर त्याचे दूषपरिमाण शरीरारवरही होतात.
बाहेरील प्रकाश हा जास्त प्रमाणत रत्यांवरील दिवे, दिव्यांच्या जाहिराती आणि मोठमोठया इमारतींवर बाहेरून मारलेले प्रकाशाचे झोत यातून होतो. स्ट्रीट लाईटची व्यवस्था किंवा त्याचा फोकस असा असावा की तो रत्यावर पडेल ज्याने प्रकाशाचे प्रदूषण होणार नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवता येईल.
जो प्रकाश आकाशाच्या दिशेने जातो याने प्रकाशाचे प्रदूषण होते तसेच किमती उर्जेचे नुकसान होऊन उर्जा वायाही जाते. पैश्याचीही उधळण होते आणि वातावरणात अनैसर्गिक उष्णतेचे उत्सर्जन होऊन ग्लोबलवार्मिंगला कळत नकळत मदत होते. तरी वेळीच यावर आपल्या सर्वांच्या सकारात्मक कृतीने वसुंधरेवर सर्व प्रकारची प्रदूषणे कमी करण्याचा निश्चयात्मक प्रयास करून वसुंधरेला सुजलाम सुफलाम करू नव्या पिढीच्या हाती स्वच्छ, सुंदर पर्यावरण सोपवू.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply