बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले असून, या सरोवराचे पाणी खारे आहे. हे सरोवर पाहायला जगभरातील लोक लोणारला भेट देतात. आज मात्र याच जगप्रसिद्ध लोणार सरोवराची प्रदूषणाने दुर्दशा झाली आहे. या सरोवरालाही प्लॅस्टिकने घेरले आहे. प्लॅस्टिकमुळे हा जागतिक वारसा धोक्यात आला आहे. पुणे आणि मुंबई येथील संशोधकांनी केलेल्या संशोधनात या सरोवरात १६ प्रकारचे वेगवेगळे प्लॅस्टिकचे कण आढळले आहेत. अत्यंत दुर्मीळ शैवाल तसेच जीवाणूंचे या सरोवरात हजारो वर्षांपासून अस्तित्व आहे. मात्र, प्लॅस्टिकमुळे त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिकच्या सूक्ष्म कणांमुळे सरोवराचे सौंदर्य, संरचना आणि तेथील पर्यटनही धोक्यात आले आहे. लोणार सरोवरात असलेल्या सीता न्हाणी कुंडात स्नानासाठी कायम गर्दी असते. प्लॅस्टिकच्या बॅगा लोक परिसरात फेकून देतात. सरोवरची अतिप्राचीन जीवसृष्टी आणि जैवरासायनिक प्रक्रियेलाच धोका निर्माण झाला आहे. लोणार सरोवराला पडलेला हा प्लॅस्टिकचा विळखा सोडवायला हवा. त्यासाठी लोणार सरोवर परिसरात प्लॅस्टिकवर बंदीची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी.
Leave a Reply