आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच जन्म १ जानेवारी १९३४ रोजी बांदोडा-गोवा येथे झाला. प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी. प्रफुल्ला डहाणूकर या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्सद सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या.
प्रफुल्ला डहाणूकर यांचे वडील सुब्राय अनंत जोशी, यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला डहाणूकर पाच वर्षांची असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले. प्रफुल्लाचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. शाळेच्या मासिकासाठी तिने काढलेली चित्रे बघून वडिलांनी तिला कलाशिक्षणासाठी ’जे.जे.स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल केले. १९५५ मध्ये जे.जे मधून सुवर्णपदक मिळवून कलापदवीधर झाल्यानंतर प्रफुल्ला डहाणूकर चित्रकलेच्या अधिक शिक्षणासाठी फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळवून १९६१ मध्ये पॅरिसला गेल्या, आणि शिक्षण पूर्ण करून परत भारतात आल्या. त्या भित्तिचित्रांमध्ये खास प्रवीण होत्या.
भारतामध्ये अशा चित्रांसाठी त्यांनीच पहिल्यांदा रोलरचा वापर सुरू केला. जे. जे. मधून पदवी घेऊन बाहेर पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात रौप्य पदक (सिल्व्हर मेडल) मिळवत त्यांनी आपल्या चित्रकलेतल्या कौशल्याची चुणूक दाखवून दिली होती. वर्षभरातच त्यांनी स्वतःची चित्र प्रदर्शने भरवून कलाप्रेमींची मने जिंकली. चित्रकलेच्या क्षेत्रातील त्यांची कारकिर्द वाखाणण्याजोगी ठरली. चित्रकलेतल्या सुवर्ण महोत्सवी कारकिर्दीचा गौरव म्हणून जहांगीर आर्ट गॅलरीने त्यांना निवडक चित्रांचे विशेष प्रदर्शन भरवण्याचा बहुमान दिला होता.
फ्रान्सने दिलेल्या शिष्यवृत्तीद्वारे कला शाखेचा अभ्यास करत असताना त्यांनी फ्रान्स, इंग्लंड, हंगेरी, स्विर्त्झलंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान, पोर्तुगाल, आइसलंड या ठिकाणी भरवलेली प्रदर्शने प्रचंड गाजली होती. भारतीय दूतावासाने तब्बल तीन वेळा लंडनमध्ये डहाणूकर यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजीत केले होते. ही तिन्ही प्रदर्शने कलाविश्वात कौतुकास पात्र ठरली होती. सिटी बँक आणि बार्कले बँकेनेही डहाणूकर यांची विदेशात प्रदर्शनं आयोजीत केली होती. त्यांच्या दुबईतल्या एका प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या हस्ते झाले होते. प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन १ मार्च २०१४रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट