फिनोलेक्सचे उद्योगसमूहाचे संस्थापक-अध्यक्ष प्रल्हाद पी छाब्रिया यांचा जन्म १२ मार्च १९३० रोजी झाला.
पाकिस्तानमधील कराचीजवळच्या शिकारपूर येथील श्रीमंत सिंधी सावकारी कुटुंबात प्रल्हाद छाब्रिया यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे अकाली निधन झाले आणि हा परिवार अक्षरशः रस्त्यावर आला. एकेकाळी बग्गीतून रपेट केलेल्या शहरातील एका मिठाईच्या दुकानात काम करण्याची वेळ प्रल्हाद यांच्यावर आली. त्यानंतर अमृतसरमध्ये एका नातेवाइकाकडे काम करताना ते थोडेफार लिहा-वाचायला शिकले. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी पुण्यात सावकारी करणाऱ्या नातेवाइकाच्या दुकानात हरकाम्या म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यातून मिळालेली रक्कम कराचीत नऊ भावंडांसह राहणाऱ्या आईला ते पाठवत. नोकरी करता करताच त्यांनी आपल्या भावंडांसह इलेक्ट्रिकच्या वस्तू आणि केबलच्या व्यवसायाला सुरुवात केली. भाड्याची सायकल वापरून लक्ष्मी रोडवर एका जिन्याखाली त्यांनी व्यवसाय सुरू केला. हळूहळू जम बसवून त्यांनी लष्करासाठीही पुरवठादार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. १९५० च्या दशकात तांब्याचे ‘कोटिंग’ असलेल्या वायरचे तब्बल तीन लाख रुपयांचे कंत्राट त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण करून एक लाख रुपयांचा नफा मिळवला आणि तिथून त्यांची यशोगाथा दहा हजार कोटींच्या उलाढालीपर्यंत पोहोचली.
फिनोलेक्स केबल्स लि. कंपनीची मुहूर्तमेढ १९५४ मध्ये त्यांनी अत्यल्प भांडवलावर रोवली. उद्योगाचा विस्तार झाला आणि १९८१ मध्ये फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि. असे त्याचे नामकरण झाले. छाब्रिया यांनी भारतात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबल्स आणि ठिबक सिंचनासाठीच्या केबल्स ही नावीन्यपूर्ण उत्पादने आणली. भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली.
मुकुल माधव फाउंडेशन, होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर या संस्थांच्या माध्यमातून छाब्रिया यांनी गरजूंना वैद्यकीय, शैक्षणिक आणि समाजकल्याणासाठी अर्थसाह्य़ केले. अंगी भिनलेली आंत्रप्रेनरशिप हेच माझ्या यशाचे सूत्र आहे, असे ते नेहमी सांगत.
छाब्रिया यांनी पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवर काम केलेच; परंतु स्वतः इंजिनीअरिंग कॉलेजसह अनेक शैक्षणिक संस्थाही उभारल्या. ‘बॅलन्स शीट’सह अर्थकारणाचा त्यांचा अभ्यास एखाद्या ‘सीए’लाही लाजवेल असा होता. भाड्याने घेतलेल्या सायकलवर व्यवसायाची सुरुवात केलेल्या छाब्रिया यांनी नंतरच्या काळात स्वतःचे खासगी विमान घेण्यापर्यंत मजल मारली.
छाब्रियांच्या ‘There’s No Such Thing as a Self-Made Man’ या आत्मचरित्राचे ‘फिनोलेक्स पर्व’ या नावाने समीरण वाळवेकर यांनी मराठीत भाषांतर केले आहे.
प्रल्हाद छाब्रिया यांचे ५ मे २०१६ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply