उन्हाळ्याची सुट्टी असल्याने प्रणय आणि प्रगती काकांकडे गावी आले होते . रात्री जेवण झाल्यावर प्रणय, प्रगती व काकांची मुलं घराच्या अंगणात घोंगडीवर गप्पा मारत बसायची . तेव्हा त्यांचे विजूकाका त्यांना विज्ञानाच्या छान छान गमती जमतीच्या गोष्टी सांगायचे . मुलांना खूप मजा वाटायची .
असेच एका रात्री विजू काका मुलांना गोष्टी सांगत असताना अचानक घराच्या अंगणात मुलांना खूप सारे छोटे छोटे ठिपके चमकत उडताना दिसले . प्रणय तर ओरडतच म्हणाला,” अरे ती पहा जादू! काही तरी चमकत उडत आहे” .मुलांना खूप आश्चर्य वाटले मुले एकमेकांना विचारू लागली “असे हिरवट पिवळसर रंगाचे ठिपके कसे उडत असतील बरं” .
विजू काका कुतूहलाने व कौतुकाने मुलांकडे पाहत होते इतक्यात प्रगतीने विचारले,” काका हे उडणारे छोटेसे ठिपके म्हणजे नक्की काय आहे ?” विजू काका शिक्षक असल्याने त्यांना ते ठिपके म्हणजे काय ? हे ठाऊक होते . ते म्हणाले,” मुलांनो हे काजवे आहेत . काजवे म्हणजे कीटक होत .काजव्यांच्या पोटाच्या शेवटच्या दोन घड्यांमध्ये आतल्या बाजूने ल्यूसीफेरीन नावाचे रसायन असते. काजव्यांच्या पोटाला छिद्र असल्याने ऑक्सिजन त्यांच्या पोटात जातो . ऑक्सिजनची या रसायना बरोबर प्रक्रिया होऊन प्रकाश उत्सर्जित होतो . त्यामुळे काजवे प्रकाशमान दिसतात यात जादू वगैरे काही नाही तर ही निसर्गाची देणगीच आहे .”
या ज्ञानाचा उपयोग करून अमेरिकेच्या प्रयोगशाळांमध्ये या रसायनाद्वारे प्रकाश निर्माण करता येईल का? याविषयी संशोधन सुरू असल्याची माहितीही काकांनी दिली .
ही अदभूत माहिती मुले कान टवकारून ऐकत होती . आज त्यांना नवीन काहीतरी शिकायला मिळाल्याचा आनंद व आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहत होते .
श्री प्रकाश शिवाजी भोंगाळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेमळा मोराळे
तालुका- खटाव
मो.नं.९२७१६८९२३०
आम्ही साहित्यिक चे लेखक
Leave a Reply