मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, पत्रकार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, शिक्षणत़ज्ज्ञ, राजकारणी, वक्ते प्रल्हाद केशव अत्रे ऊर्फ आचार्य अत्रे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९८ रोजी झाला.
संयुक्त महराष्ट्र आंदोलनाचे आचार्य अत्रे हे एक प्रमुख नेते होते. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी परमोच्च्च बिंदूवर नेलेला हा सर्वोत्कृष्ट राजकीय लढा होता. त्यांच्या अमोघ आणि विनोदी वक्तृत्वाने शिवाजी पार्कवर त्यांनी जवाहरलाल नेहरूंपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत सर्वांना गारद केले. मोरारजी देसाई यांची भिती तर त्यांनी नष्ट केलीच, पण त्यांची एवढी भीषण टवाळी केली की, मोरारजींच्या खूनशीपणाला महाराष्ट्रात आणि मराठी मनात काही जागाच उरली नाही. सेनापती बापट हे त्यांचे अजून एक श्रद्धास्थान. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अत्रेंनी उभे केलेले ‘मराठा’हे वृत्तपत्र, अत्रेंचे अमोघ वक्तृत्व हे वजा केल्यास संयुक्त महाराष्ट्र झाला नसता आणि मुंबई महाराष्ट्रात आली नसती, हे निर्विवाद सत्य कोणीही नाकारणार नाही.
आचार्य अत्रे यांनी ‘मराठा’ हे भूमिकापत्र संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी काढले नसते, तर सर्वपक्षीय संयुक्त महाराष्ट्राचा लढा कितीही प्रयत्न झाले, तरी यशस्वी झाला नसता. आचार्य अत्रे यांच्यासोबत भाई माधवराव बागल, शाहीर अमरशेख, क्रांतिसिंह नाना पाटील, कॉम्रेड डांगे ही व अशी सर्वपक्षीय दिग्गजांची फळीच उभी होती. त्यांच्यात मतभेदही व्हायचे. मग निर्णय काय घ्यावा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ठरवायचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे खूप जवळचे संबंध होते. गाडगेमहाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर या सर्वांविषयी अत्रे यांना प्रचंड आदर होता. पण तरीही मतभेदांच्या वेळी डॉ. आंबेडकर योग्य तीच बाजू घेत.
एस. एम. जोशी यांच्या आत्मचरित्रात आचार्य अत्रे यांच्या संदर्भात एक प्रसंग आहे – एस. एम. आणि अत्रे यांच्यात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यासंबंधी काहीतरी मतभेद झाले. दोघेही निवाडा करण्यासाठी डॉ. आंबेडकरांकडे गेले. एस. एम. यांचे म्हणणे सत्तेत जाऊ नये असे होते, तर अत्रे यांचे म्हणणे सत्तेत राहून लढाई करणे असे होते. अत्रे आणि बाबासाहेब एकमेकांच्या प्रेमातले. तरीही बाबासाहेबांनी एस. एम. यांच्या बाजूने मत दिले. बाबासाहेबांच्या शब्दात सांगायचे झाले, तर जे एस. एम. जोशी यांनी ‘मी एस. एम.’ या पुस्तकात नमूद केले आहे. बाबासाहेब म्हणाले, “जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल, तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नये.” बाबासाहेब म्हणाल्यावर अत्र्यांनी त्यांचा निवाडा तात्काळ मान्य केला. नंतर अत्रे एस. एम. यांना म्हणाले जे एस. एम. यांनी नमूद करून ठेवले आहे, “बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच केली हो आमची.”
बाबासाहेब आणि अत्रे यांचे प्रेम, जिव्हाळा, आदर आणि वात्सल्य बाबासाहेबांच्या अखेरपर्यंत टिकले.
आचार्य अत्रे हे शिक्षण क्षेत्रात विशेष गाजले. सावरकरांनी त्यांना आचार्य ही पदवी दिली. त्यांनी सर्व स्तरांतील मुलांना एकाच शाळेत शिकवले. त्यांनी तत्कालीन पाठ्यपुस्तकांवर जबरदस्त ताशेरे ओढले व स्वतः काही शिक्षकांच्या व शिक्षणतज्ज्ञांच्या मदतीने नवयुग वाचनमाला सुरू केली. मुलांना अभ्यासात गोडी वाटावी, म्हणून सोप्या भाषेतील अनेक धडे आणि कविता त्यांनी या वाचनमालेत निवडल्या. त्यांच्या वाचनमालेचे गुजरातीत भाषांतरही झाले. अत्र्यांनी लंडनला जाऊन दीड वर्षे अभ्यास केला.
साष्टांग नमस्कार हे त्यांचे विनोदी नाटक त्यांच्या नाट्यलेखनाची सुरुवात होती. तोवर ते विनोदी वक्ते म्हणून गाजलेले होतेच, त्यात या नाटकाचीही भर. हे नाटक खूप गाजले. त्यानंतर घराबाहेर हे गंभीर विषयावर आधारित नाटक लिहून अत्र्यांनी सर्वांना थक्क करून सोडले. त्यावेळी सर्वांना त्यांच्या अष्टपैलूपणाची जाणीव झाली.
१९३४ साली सरस्वती सिनेटोनच्या नारद-नारदी चित्रपटाची कथा व संवाद अत्र्यांनी लिहून दिले. ‘हंस पिक्स्चर्स’साठी १९३७ साली त्यांनी इब्सेनच्या ‘पिलर ऑफ द सोसायटी’ या कथेवरून धर्मवीर, स्वतःच्याच कथांवरून प्रेमवीर ह्या मराठी व ‘बेगुनाह’ ह्या हिंदी चित्रपटांच्या पटकथा लिहून दिल्या. १९३८ साली ‘हंस’साठीच ‘ब्रह्मचारी’ चित्रपटाची कथा त्यांनी लिहून दिली. त्यांनी लिहिलेला ‘ब्रँडीची बाटली’ हा चित्रपटही लोकप्रिय ठरला. अत्र्यांनी राजगुरू व अभ्यंकर या इतर दोन भागीदारांसोबत एआरए या नावाने ‘नवयुग चित्रपट कंपनी’ काढली. पुढे ‘हंस पिक्चर्स’मधले मास्टर विनायक, पांडुरंग नाईक, बाबूराव पेंढारकर हेदेखील भागीदार झाल्यावर या कंपनीने ’नवयुग पिक्चर्स’ असे नाव बदलून घेतले. १९४० साली नवयुग पिक्चर्सतर्फे ‘लपंडाव’ चित्रपटाची कथा अत्र्यांनी लिहिली. ‘लपंडाव’ चित्रपटानंतर त्यांनी ‘संत सखू’ या चित्रपटाचे संवाद लिहिले. परंतु ‘प्रभात’ने ही हाच विषय घेतला आहे या कारणाने मास्टर विनायकांनी त्याला विरोध केला. नवयुग पिक्चर्सने मग वि.स. खांडेकरांची ‘अमृत’ ही कथा घेऊन चित्रपट काढावयाचे ठरवले. या वादामुळे अत्र्यांनी नवयुग पिक्चर्स सोडले. अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या “श्यामची आई” चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार” सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले “सुवर्ण कमळ” मिळाले होते. आचार्य अत्रे यांनी बनवलेल्या महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला राष्ट्रपतींचे रजत पदक प्राप्त झाले होते. महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटातील पहिल्या दृश्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. १९२३ साली अत्र्यांनी ‘अध्यापन’ मासिक सुरू केले. १९२६ मध्ये ‘रत्नाकर’ , १९२९ साली ‘मनोरमा’, आणि पुढे इ.स. १९३५ साली ‘नवे अध्यापन’ व १९३९ साली ‘इलाखा शिक्षक’ ही मासिके काढली. १९४० साली त्यांनी नवयुग साप्ताहिक सुरू केले. १९५६ साली त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते.
आचार्य अत्रे यांचे १३ जून १९६९ रोजी निधन झाले आपल्या समुहा तर्फे आचार्य अत्रे यांना आदरांजली.
— संजीव_वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply