नवीन लेखन...

प्रामाणिकपणा

 

ही गोष्ट खूप जुनी. माझ्या लहानपणाची. खरे तर या चाळीस वर्षांत इतक्या काही घटना-घडामोडी झाल्यात की ती सहज विसरून जावी; पण नाही, ती घटना मी विसरू शकलेलो नाही. ती घटना मी विसरू शकणार नाही. आपण म्हणतो ना, की या घटनेनं माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, तशीच ही घटना. अर्थात, जेव्हा हे सारं घडलं तेव्हा या घटनेचा आपल्यावर इतका दीर्घकालीन परिणाम होईल, असं वाटलंही नव्हतं. तसं वाटावं असं ते वयही नव्हतं.

 

तर, त्या वेळी मी पुण्यातल्या राजा धनराज गिरजी शाळेमध्ये शिकत होतो. पाचवी किवा सहावी असेल, पण त्या वेळी वि. कृ. क्षोत्रिय नावाचे मुख्याध्यापक होते. मराठीत अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, सुभाषितांचे संग्रह काढले, मुलांच्या मनावर संस्कार घडविले. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून आचार्य प्र. के. अत्रे यांनीही काम पाहिलं होतं. पुण्याच्या पूर्वभागातील ही शाळा त्या वेळी फारशी प्रख्यात नव्हती. गरिबांची शाळा असंही काही वेळा तिचं वर्णन केलं जायचं; पण शाळेसाठी देखणी इमारत होती, सुसज्ज प्रयोगशाळा होती, शरीराला व्यायाम व्हावा आणि मनाला ऊर्जा लाभावी, असं मैदानही होतं. त्या दिवशी शनिवार असावा. सकाळची शाळा होती. मी वर्गात प्रवेश करणार एवढ्यात उजवीकडे, भितीलगत काहीतरी चमकणारं दिसलं. वेग कमी झाला. मी थांबलो. पाहिले, तिथं एक घड्याळ पडलेलं होतं. उचललं आणि खिशात ठेवलं. घड्याळ ही मौल्यवान चीज आहे एवढं कळण्याजोगं वय होतं माझं. माझ्या वडिलांनी त्यांच्यासाठी घड्याळ घेतलं त्या वेळी त्या हॅन्री सॅन्डोजच्या घड्याळाला ९० रुपये लागले होते. हे घड्याळ तर भारी दिसत होतं. वर्गात बसलो; पण शिक्षकांच्या शिकवण्याकडे माझे लक्ष नव्हतं. अर्ध्या चड्डीच्या उजव्या खिशात त्या घड्याळाला मी सतत स्पर्श करीत होतो. या घड्याळाचं काय करावं, हा प्रश्न मला अस्वस्थ करीत होता. तोपर्यंच्या बालसुलभ आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा हा काही माझा स्थायिभाव नव्हता. शिवाय मोहही खूप होते. शाळेबाहेर बसणारा हिदुस्थानी काजूवाला (शेंगदाणे) चिक्कीवाला, शिवाय चुंबकीय खेळण्याचं नवं विश्वही मला कळलेलं होतं. काय करावं? काय करू शकू? प्रश्नांची मालिका मनात फेर धरीत असतानाच बेल झाली अन् मधली सुटी झाली. माझी तंद्री भंग पावली. मी उठलो, वर्गाबाहेर आलो. शेजारीच मुख्याध्यापकांची खोली होती. पाहिलं अन् सरळ आत घुसलो. श्रोत्रिय सर बसले होते. त्यांच्यासमोर ते घड्याळ ठेवलं. म्हटलं, ‘सकाळी हे घड्याळ सापडलं. माझा तास सुरू होता म्हणून जवळच ठेवलं, हे घ्या. ज्याचं असेल त्याला मिळायला हवं.’ मी हे बोललो. काही खरं होतं, काही खोटं… पण मी घड्याळ परत केलं होतं. का, हे मला आजही सांगता येणार नाही. कदाचित घड्याळासारखी वस्तू विकण्याची, पचविण्याची माझी क्षमता नसावी. सरांनी ते घड्याळ पाहिलं. शाब्बास म्हणाले अन् मी परत वर्गात आलो. आपण जे केलं ते योग्य की अयोग्य याचा वेध घेता येत नव्हता. स्वाभावाकिपणे कोणाला काहीच सांगितलं नाही. कदाचित इतर मुलं वेड्यात काढतील अशी भीतीही असावी. त्यानंतर आठवडाभरानं म्हणजे दुसर्‍या शनिवारी प्रार्थनेसाठी सर्व वर्ग एकत्र आलेले असताना प्रार्थनेनंतर सरांनी मला पुढे बोलावलं. सगळ्या विद्यार्थ्यांना माझी ओळख करून दिली. झालेली घटना सांगितली आणि अशी प्रामाणिक मुलं ही या शाळेचं नाव मोठं करतात, असं काहीतरी सांगितलं. हजार विद्यार्थ्यांच्या समोर आज मी प्रामाणिक विद्यार्थी झालो होतो. शाळेच्या अभिमानाचा विषय झालो होतो. ज्याचं घड्याळ होतं त्यानं मला देण्यासाठी एक पेन दिलं होतं. माझ्या आयुष्यातला हा पहिला पुरस्कार. मी काही केलं नसताना मिळालेला! दोन दिवसांनी घरी पत्र आलं. मी मावशीकडे राहत असे. शाळेचं पत्र पाहून घरचे चकावले; पण पत्र वाचून त्यांनाही आनंद झाला. एका पोस्टकार्डवर श्रोत्रिय सरांनी माझ्या प्रामाणिकपणाला दाद दिली होती. आता घरातही मी प्रामाणिक ठरलो होतो. घरसामान आणताना दोन-पाच पैशाची हेराफेरी करणारा मी प्रमाणित प्रामाणिक ठरलो होतो. त्यानंतर शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी मला खास प्रमाणपत्र देण्यात आलं. ‘तू प्रामाणिक आहेस याचा आम्हाला अभिमान वाटतो.’ असं ते प्रमाणपत्र सांगत होतं. जे माझं नव्हतं, जे मला मिळालं, ते मी परत केलं या एवढ्याशा बाबीवरून मी शाळेतला एक विशेष विद्यार्थी झालो होतो. खरोखर मी प्रामाणिक होतो का? मला तरी ठामपणे या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देता येत नाही. घड्याळाऐवजी पाच-दहा रुपये सापडले असते तर? तर कदाचित माझा प्रामाणिकपणा कधीच पुढे आला नसताही! पण एक मात्र खरं, या घटनेनंतर ज्या ज्या वेळी मोहाचे क्षण आले, त्या त्या वेळी जे आपलं नाही, जे दुसर्‍याचं आहे; ते आपल्याला नको, हाच आवाज मनानं दिला. मला ती शाबासकी, ते पेन, ते प्रमाणपत्र याचा कधी विसर पडू दिला नाही. मी मुळतः प्रामाणिक होतो की नाही मला माहीत नाही; पण वि. कृ. श्रोत्रिय सरांनी तू प्रामाणिक आहेस, असाच संस्कार केला. तो कायम राहिला हा त्यांच्या विश्वासाचा परिणाम असावा.

 

— किशोर कुलकर्णी

Avatar
About किशोर कुलकर्णी 72 Articles
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..