नवीन लेखन...

प्रमाणित अक्षरचिन्हं आणि लिपी

मराठीतील अक्षरचिन्हे, स्वरमाला आणि व्यंजनमालेविषयी एक विवेचन….

पारंपारिक वर्णमाला : स्वरमाला आणि व्यंजनमाला 

पारंपारिक स्वरमाला :

अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार…अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार…. अहा..), ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) असे अेकूण १६ स्वर आहेत.

पारंपारिक व्यंजनमाला :

कंठ्य (Guttural) :: क ख ग घ ङ
तालव्य (Palatal) :: च छ ज झ ञ
मूर्धन्य (Retroflex) :: ट ठ ड ढ ण
दंत्य (Dental) :: त थ द ध न
ओष्ठ्य (Labial) :: प फ ब भ म
य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ

असे अेकूण 35 व्यंजनं आणि 16 स्वर म्हणजे 51 वर्ण आणि ॐ हे अक्षर घेतले तर 52 वर्ण होतात.

य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ या व्यंजनांचंही वर्गीकरण केलं आहे. ह (कंठ्य), य आणि श (तालव्य. खरं म्हणजे य आणि श हे अुच्चार थोडे भिन्न आहेत.), र आणि ष (मूर्धन्य), ल आणि स (दंत्य), व (ओष्ठ्य).

ळ, क्ष आणि ज्ञ हे वर्ण आगळेवेगळेच आहेत. संस्कृतात ळ नाही. भगवदगीतेच्या 18 अध्यायांच्या 700 श्लोकात ळ अेकदाही आला नाही. क्ष हा वर्ण क् श् आणि अ किंवा य यांचं मिश्रण आहे तर ज्ञ हा वर्ण …द् न् आणि अ किंवा य यांचं मिश्रण आहे. लंगडा श् आणि र हे जोडाक्षर लिहीणं जरा कठीणंच होतं म्हणून श्र हा वर्ण घडविणार्‍या व्यक्तीच्या प्रतिभेला माझे शतश: प्रणाम. श्र हा वर्णदेखील क्ष आणि ज्ञ सारखा स्वतंत्र समजायला हवा.

अ आ इ ई उ ऊ ऋ ए अॅ ऐ ओ ऑ औ ही स्वरमाला, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागानं, 6 नोव्हेंबर 2009 रोजी काढलेल्या अध्यादेशानं प्रमाण झाली. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे, सुमारे 200 वर्षानंतर, अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले गेले. 200 वर्षानंतरच हे स्वर शुध्द झाले, तोपर्यंत ते अशुध्द समजले गेले.

आज आपल्या समाजाची अशी अवस्था झाली आहे की, सरकारी कायदा, अध्यादेश…फतवा काढल्याशिवाय, आपण अु्क्रांत बदल स्विकारीत नाही. काही प्रस्ताव, सरकार दरबारी वर्षानुवर्षे कायदा होण्याच्या प्रतिक्षेत खितपत पडलेले असतात. परंतू काही विलक्षण घटना घडली की अेका दिवसातच, त्या प्रस्तावाचं कायद्यात रुपांतर होतं. बव्हंशी हे कायदे कागदावरच राहतात. जनताजनार्दन जेव्हा हे बदल अुस्फुर्तपणे स्वीकारतो तेव्हाच तो खराखुरा बदल असतो.

ज्ञानेश्वर माअुलींनी, सुमारे 700 वर्षापूर्वी ‘भावार्थ दीपिका’ हा, भगवदगीतेवरील निरूपणाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथालाच, आज आपण ‘ज्ञानेश्वरी’ म्हणतो. त्यांची मराठी ही त्या काळाची अती शुध्द प्रासादिक मराठी समजतो. त्या मराठीबद्दल आपल्याला आदरही आहे. भाषेची अुत्क्रांती हे वास्तव आहे. त्यानुसार ज्ञानेश्वरी मराठी आता कालबाह्य झाली आहे. हे वास्तव आपण स्वीकारायलाच हवं. हा बदल नैसर्गिकरित्या हळूहळू अुस्फुर्तपणे झालेला आहे. मराठी भाषेची अुत्क्रांती आजही होते आहे.

थोडक्यात म्हणजे अ ची पुढीलप्रमाणे बाराखडी ::: अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ आणि मागील लेखात सुचविलेली व्यंजनमाला, जनताजनार्दनानं स्वीकारण्यासाठी सरकारी फतव्याची गरज नसावी.

— गजानन वामनाचार्य
बुधवार, २६ नोव्हेंबर २०१४

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

3 Comments on प्रमाणित अक्षरचिन्हं आणि लिपी

  1. नमस्कार.
    हा माझ्या प्रतिक्रियेचा पुढील भाग :-
    ७) क्ष हें जोडाक्षर आहे. क् + श याचा क्ष होतो.
    – ज्ञ हेंही जोडाक्षर आहे. याचा मराठी उच्चार ‘ द् +न् + य’ असा होतो ; हिंदी उच्चार ‘ग +य’ असा होतो, गुजराती उच्चार ‘ग् +न’ असा होतो. याचा उच्चार जो पाणिनीनें दिला आहगे तो ‘ज + ञ’ असा होतो. संस्कृतमधआये हाच उच्चार आहे. मग्हणून, इंग्रजीत ‘ज्ञ’ लिहितांना ‘jn’ असें लिहिलें जातें.
    सस्नेह
    सुभाष स. नाईक

  2. नमस्कार.
    ही माझी पुढील प्रतिक्रिया .
    ६) ‘च , छ, ज, झ ’ यांचे मराठीत दोनप्रकारें उच्चार होतात. एक म्हणजे ‘चंद्र’ मधला च . दुसरा म्हणजे ‘चमचा’ मधला च. ( म्हणजेच, तालव्य आणि कंठ्य-तालव्य, असे दोन प्रकार. ) . लेखनात दोन्हीही सारख्या प्रकारेंच लिहिले जातात. माधवराव पटवर्धन (माधव ज्यूलियन) यांनी दोन्हींचें लेखन भिन्न कसें करावें, हें १९३० च्या सुमारास सुचवलें होतें, पण त्याची अंमलबजावणी झाली नाहींच.
    हिंदीत असा उच्चाराचा फरक दाखवायला ‘नुक्ता’वापरतात . हा नुक्ताबिंदु अरबीतून फारसीत, व फारसी-उर्दूतून हिंदीत आलेला आहे. नुक्तानें उच्चारभिन्नता कळते. हल्ली मराठीत गझल ( गज़ल ) लिहिणारे लोक असा नुक्ता वापरतात. अरुण टिकेकर यांनीही त्यांच्या कांहीं लेखांमध्ये व पुस्तकात असा वापर केलेला आहे. ( मीही काहीं ठिकाणी, उदा, जरा ( म्हणजे म्हातारपण) , व ज़रा ; जप व ज़प , अशी नि;सनिग्ध उच्चारभिन्नता दाखवायला नुक्ता वापरतो.
    आतां, मराठीचें प्रमाणीकरण करतांना हा नुक्ता स्वीकारायला हरकत नसावी, म्हणजे ‘च’ वर्गाचें उच्चार व लेखन यात साधर्म्य येईल, ambiguity रहाणार नाहीं.
    पण अडचण अशी आहे की सौकर्यीकरनाच्या, सुलभीकतरनाच्या, नांवाखाली जिथें अनुस्वार हटवले, र्‍्हस्व-दीर्ध असा फरक नसावा असें सुचवलें जात आहे, तिथें नुक्त्याचें एक additional चिन्ह मराठीत स्वीकारलें जाईल काय ?
    सस्नेह
    सुभाष स. नाईक

  3. नमस्कार.
    आपला अक्षरमालेवरील लेख वाचला. माहितीपूर्ण आहे. थोडीशी माझीही पुस्ती :-
    १) ज्ञानबेश्वरी : एकनाथांच्या काळींच ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेच्या रूपात बदल झाला होता. म्हणून त्यांनी तिच्यातील भाषा सुधारून तत्कालीन लोकांना समजेल अशी केली. आज आपल्याला जी ज्ञानेश्वरी दिसते, ती एकनांथांनी भाषिक सुधार केलेली अशी आहे. एकनाथ-काळापूर्वीची ज्ञानेश्वरीची एक प्रत इतिहासााचार्य राजवाडे यांना ( व अन्य एक प्रत दुसर्‍या एका सद्.गृहस्थाला ) सापडलली होती/ आहे.
    २) संस्कृतमधआये ‘ळ’ नाहीं , असें जेव्हां आपण म्हणता, तेव्हां आपल्याला पाणिनीनंतरची संस्कृत अभिप्रेत आहे, हें उघड आहे. ऋग्वेदकालीन भाषा, जिला छांदस् , देववाणी, दैवी-वाक् अशी नांवें अहेत, व जिला हल्ली आर्ष-संस्कृत म्हणुन ओळखतात, तिच्यात ‘ळ’ षोता. ही कांहीं ऋग्वेदातील उदाहरणें :
    – पहिलीच ऋचा : ‘अग्निमीळै पुरोहितम् …’
    -’अन्य एक : ‘ ……… सजोषा इळा देवैर् ….. ’
    – आणखी एक : ‘तम् ईळत प्रथमम् …. ’
    आणखीही उदाहरणें मिळतील, पण एवढी पुरेत.
    ३.) सरकारनें ‘अॅ’ स्वीकारला, तें स्वागतार्हच आहे. पण हल्लीच्या युनिकोड आज्ञावलीत (software ) हा अॅ टाइप करतां येत नाहीं. धन्य धन्य त्या सोफ्टवेअर डिझाइंन करणार्‍याची ! दीर्घ ऋ येत नाहीं हें आपण लिहिलें आहेच. लृ सुद्धा साध्य करावा लागतो, मूळ स्वर म्हणून सोफ्टवेअरमध्ये येत नाहीं. ( आणि, दीर्घ लृ चें काय ? )
    ४) आतां तर भाषा-सौकार्याचें निमित्त पुढे करून ‘नको तें सोपीकरण’ चाललें आहे. र्‍्हस्व-दीर्घ चें तर सर्वांनाच माहीत असेल. पण एक शिक्षणणखात्यात काम केलेल्या विदुषीनें तर, ‘औ’ ऐवजी ‘अउ’ लिहावें , व ‘ऐ’ ऐवजी ‘अइ’ असें लिहावें , असें सुचवलें आहे. धन्य धन्य !
    ५) सत्वशीला सामंत, अरुण टिकेकर वगैरे विद्वानांनी मराठी भाषा बिघडू नये म्हणून केलेलें लिखाण व प्रयत्न फोलच आहेत म्हणायचे ! सौकर्यीकरणाच्या नांवाखाली मराठी भाषा दिवसेदिवस बिघडत चालली आहे, हें हतबल होऊन पहाण्याव्यतिरिक्त अन्य काय उपाय ? मराठी भाषेची आज उत्कांती होते आहे की अधोगती, हें आज समजणार नाहीं, तर त्यासाठी कांहीं काळ जावा लागेल. पण त्याच्या खुणा स्पष्ट दिसताहेत, त्या वाचण्याची तसदी कुणी घेतली तर !
    स्नेहादरपूर्वक
    सुभाष स. नाईक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..