खंडाळ्यासारख्या प्रसिद्ध हिलस्टेशनमध्ये एका अत्यंत सुंदर जागी, उंच डोंगरमाथ्यावर, एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूस राजमाचीचा उंच डोंगर, समोर हिरवीगार दरी आणि चार-पाच एकरांचा विस्तीर्ण परिसर आणि त्यात एक आलिशान बंगला, अशी ही सगळी मालमत्ता कधी स्वप्नातही माझी होईल असे मला कधी वाटले नाही. कसे वाटणार? हे कसे घडले? त्याचीच तर ही गोष्ट आहे.
मी एक साधा मध्यमवर्गीय निवृत्तीनाथ! म्हणजे एक निवृत्त बँक कर्मचारी, आमच्या बँकेत निवृत्त होणाऱ्यांना निवृत्तीनाथ म्हणावयाची पद्धत. अशा आजपर्यंत निवृत्त झालेल्यात माझा नंबर होता १०८ म्हणून मला सगळे म्हणतात श्री श्री १०८ निवृत्तीनाथ! जसे जैन साधू असतात ना, श्री श्री १००८ स्वामी अमुकतमुक वगैरे, तसे. म्हणजे मी काही तसा कोणी साधू बिधू नाही बरं का.
तर सांगायचे म्हणजे मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा आमच्या ऑफिसमधला ‘जोशा’ म्हणाला, “साहेब, तुम्हाला १०८ नंबर फार भाग्याचा आहे. तुम्ही लवकरच करोडपती होणार!” आणि तसे त्या पट्ट्याने निरोप समारंभात सांगूनही टाकले.
हा जोशा फार गमत्या. पण याचे भविष्यकथन मात्र जबर. आकड्यांवरून अचूक भविष्य सांगतो. कधी कोणी विचारायला गेला तर म्हणतो, “बघा बरं, माझी वाणी कधी खोटी होत नाही. मी खरं तेच सांगणार. मग ते वाईटसाईट असेल तर ऐकून घ्यायची तयारी ठेवा!” मग कुणी त्याच्या फंदात पडत नसत. पण काही चांगलं असेल तर स्वत:हून सांगेल.
तर सांगायची गोष्ट. त्याने मी १०८ वा निवृत्तीनाथ झाल्यावर माझे भविष्य जाहीर करून टाकले. जोशाची वाणी ती खरी होणार याची सगळ्यांना खात्री. पण मला ना कोणी काका ना मामा. ना कोणी देवबाप, म्हणजे गॉडफादर, की जो देईल मला गडगंज. शिवाय लॉटरी बिटरी असे छंद मला बिलकुल नापसंत. मग कसं जमायचं हे भविष्य?
मी आपलं तेवढ्या पुरतं ऐकलं आणि घरी गेल्यावर बायकोला सांगितलं.तिला पण वाटली मोठी गंमत. आणि मग रोजच्या दिनक्रमात आम्ही हे विसरूनही गेलो. वर्तमानपत्रातलं रोजचं भविष्य कसं? सकळी उत्सुकतेनं वाचतो, पण लगेच विसरूनही जातो, तसं.
आमच्या सोसायटीत आमचा एक नऊ निवृत्तांचा नवनाथ निवृत्तीनाथ’ संघ आम्ही स्थापला आहे. आम्ही रोज पहाटे उठून फिरायला जातो. एक सर्युलेटिंग लायब्ररी, सोसायटीच्या मुलांना योगासने शिकवणे, गणपती, दिवाळी, ३१ डिसेंबर असे कार्यक्रम आयोजित करणे, गोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, लाफींग क्लब वगैरे उपक्रम अशा आमच्या काही ना काही चळवळी चालू असतात. वेळ मजेत तर जातोच पण थोडीफार समाजसेवाही घडते.
एके दिवशी सकाळी मी नेहमीप्रमाणे फिरायला जायला म्हणून बाहेर पडलो. तोच सोसायटीच्या गेटसमोर एक आलिशान गाडी थांबली. कुठल्या मेकची, कुठले मॉडेल वगैरे मला ठाऊक नाही. अहो नेहमी लोकल, रेल्वे, कधीमधी बस आणि अगदी क्वचित टॅक्सी याशिवाय काही माहिती नाही तर ही गाडी कुठून माहिती असणार? असो. रुबाबदार होती एवढे खरे.
तर सांगायची गोष्ट म्हणजे, त्या गाडीतून एक गृहस्थ उतरला. लालबुंद चेहरा, डोक्यावर काळी गोल टोपी आणि पांढरा लांब कोट. पांढरी शुभ्र पँट, काळे चकचकीत बूट. त्याने मला विचारले, “काय हो, मिस्टर जोगदंड इथेच राहतात काय?”
त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून आणि पेहेरावावरून तो पारशी वाटत होता आणि हा चेहरा आपण कुठेतरी पाहिला आहे असे मला वाटले. मी म्हणालो, “हो मीच. काय काम आहे माझ्याकडे?”
तो पेशाने नोकरदार वाटत नव्हता, अशा सर्वस्वी अपरिचित व्यक्तीचे माझ्याकडे काय काम असणार? कदाचित आमच्या बँकेत याचे खातेबिते असावे पण निवृत्त होऊन मला पाच सहा महिने होऊन गेले होते आणि बँकेचा आणि माझा संबंध आता फक्त पेन्शनपुरता येत होता. अशा परिस्थितीत या गृहस्थाचे माझ्याकडे काय काम असणार? माझी तर मतीच गुंग झाली.
मी त्याला घरी घेऊन गेलो. बायकोने दार उघडले. मी आता दोन तीन तास तरी येणार नाही अशी तिची समजूत. तेव्हा मला पाहून तिने विचारले, ‘अहो तुम्ही?” पण माझ्या मागे कोणी अपरिचित व्यक्ती पाहून ती गप्प बसली.
आम्ही आत आलो. तो पारशी, त्याने आपले नाव ‘करसन’ सांगितले. तो सोफ्यावर बसला. लालबुंद चेहरा, लांब टोकदार नाक, झुबकेदार भिवया आणि गलमिशा यातून त्याचे भेदक डोळे माझ्याकडे रोखून पाहत होते.
परंतु साधारणपणे पारशी माणसात जाणवणाऱ्या खोडकर आणि आनंदी स्वभावाचा त्याच्यात अभावच दिसत होता. तो बराचसा उग्र आणि त्याच्या चेहऱ्यावर, आपल्याला या असल्या ठिकाणी यावे लागले याचा मनोमन राग आला आहे असे भाव अगदी स्पष्टपणे जाणवत होते. थोडा वेळ आम्ही गप्प होतो. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि मग मोठ्या नाखुषीनेच तोंड उघडले.
“हे बघा जोगदंड साहेब’, त्याचं मराठी बरं होतं. पण उच्चार मात्र पारशी ढंगाचे, गुजराथी वळणाचे होते. पण ऐकायला मात्र मजा वाटत होती. तर तो म्हणाला, “हे पहा जोगदंडसाहेब. तुमच्या अने आमच्या तो काय संबंध नाय, मोठे मुश्किलीने मी तुमचा एड्रेस शोधला हाय, मला ज्यादा टायम नाय. हा समदा आमचे बापने घाटलेला घोळ हाय. हे साले म्हातारे मरुनशानी पण तुमचे डोकेवर बसते.
तो काय बोलत होता ते काही माझ्या ध्यानात येत नव्हते. तसेच तो आपल्या बापाला का शिव्या घालत होता तेही मला कळेना. खरंतर तो स्वत:च आता साठीचा वाटत होता. असो. मी त्याला म्हणालो, “हे पहा करसनशेट, मी तुम्हाला किंवा तुमच्या वडिलांना ओळखत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. तुम्ही चुकून भलतीकडे आलेले आहात असे मला वाटते. शिवाय तुम्ही मला आधी काहीच कल्पना न देता अचानक आला आहात. आता मला वेळ नाही. तुम्ही पुन्हा कधीतरी वेळ ठरवून या. मग आपण बोलू.” माझे बोलणे ऐकताच तो भलताच भडकला. आधीच लालबुंद असलेला त्याचा चेहरा आता टोमॅटोसारखा झाला.
“अरे जोगदंडसाब, काय बोलते काय? पुन्हासुन या? अरे मला असले फालतू लोगांकडे यायाला टायम नाय. मी आनलेल्या कागदावर तुमी सही करा अने मला मोकला करशो. मग मी पुन्हासुन तुमचा तोंडसुद्धा पाहणार नाय.
आता मात्र हद्दच झाली. माझाही पारा चढला.
“अहो मि. करसनशेट! तुम्ही मोठे शेट बीट असाल तर ते तुमच्या घरी! इथे माझ्या घरात तुमचा रुबाब दाखवू नका. तुम्हाला काही सभ्य चालीरीती आहेत आहेत की नाही?” माझा आवाज चढला. माझा चढलेला आवाज ऐकून तो जरा चरकला.”अरे साब, अरे साब, माफ करशो, माफ करशो मी असा बोलायलानको होता. माझा थोडा ऐकूनशानी घेयेल तो लय उपकार होयेल. प्लीज! जोगदंडसाब, प्लीज!”
तो आता लायनीवर आला हे पाहून मी पण थोडा शांत झालो. तेवढ्यात बायकोने दोन चहाचे कप आणि बिस्किटे आणून ठेवली. तेव्हा करसन पण थोडा ओशाळला. चहाचा कप उचलून तो म्हणाला, “जोगदंडसाब, तुमी लै पूर्वी भायखळ्याला राहात होते ना? मिस्त्री बिल्डिंगमदी? तेवेली तुमचे समोर होरमस मंझील मंदी माझे वडील राहत होते. होरमस आरदेशीर मिस्त्री.”
भायखळा आणि मिस्त्री बिल्डिंग म्हणताच माझी ट्यूब खाडकन पेटली. करसन! मिस्त्री शेटचा लाडावलेला मुलगा!
-विनायक अत्रे
Leave a Reply