नवीन लेखन...

प्रारब्ध – भाग 2

गोष्ट सुमारे चाळीस वर्षापूर्वीची. माझ्या वडिलांची बदली झाली त्यावेळची. बदली झाल्यावर नाशिकहून आम्ही मुंबईला आलो. वडिलांना भायखळ्याला राणीच्या बागेजवळ, आता तिला जिजामाताबाग म्हणतात, ससेक्स रोडला मिस्त्री बिल्डिंगमध्ये सरकारी जागा मिळाली.

जागा कसली? एक दुमजली बंगलेवजा घराचा १ल्या मजल्यावरचा अख्खा अर्धा भागच होता तो! दोन मोठे प्रशस्त हॉल. तसंच मोठं स्वयंपाकघर. उंची चांगली बारा पंधरा फूट. मंगलोरी कौलं. तिन्ही बाजूंनी आठ दहा फूट रुंद प्रशस्त व्हरांडा. अगदी राजेशाही थाट! त्याच रस्त्यावरून म्युझियम ते राणीचा बाग अशी एक छोटीशी ट्रॅम गाडी पण यायची. आम्हाला तर फार मजा वाटायची. रात्री राणीच्या बागेतल्या वाघ-सिंहाच्या डरकाळ्या पण ऐकू यायच्या. एखाद्या गव्हर्नरच्या बंगल्यासारखाच थाट होता. नंतर समजले की पूर्वी तो बंगला म्हणजे जर्मन कॉन्सुलेटरचे ऑफिसच होते. आता तो मिस्त्री नावाच्या एका पारशाने विकत घेतला होता.

बंगल्यात खाली तीन भाडेकरू आणि वर आम्ही आणि आमच्या शेजारी एक ख्रिश्चन भाडेकरू मि. फर्नांडीस म्हणून रहात असत. बंगल्यात पंखे वगैरे नव्हते. पण व्हरांड्यातून असा सुंदर वारा यायचा की पंख्याची गरजच नव्हती. भाडं होतं रु.पन्नास फक्त. अर्थात त्या काळी ते पण फार वाटायचं.

तर सांगायची गोष्ट म्हणजे त्या बंगल्याच्या समोरच होरमस मंझील म्हणून तीन मजली, दगडी इमारत होती. ती पण मिस्त्री शेटचीच होती. जुन्या युरोपियन वास्तूसारखी ती प्रचंड दगडी इमारत फार सुरेख दिसायची. जुन्या इमारतींच्या पद्धतीप्रमाणे ती फुटपाथला चिकटूनच होती. तिच्या आजूबाजूच्या इमारतीही तशाच भव्य.

संपूर्ण ससेक्स रोडवर पारशी किंवा ख्रिश्चन लोकच रहायचे. आम्ही एकमेव मराठी. सुरुवातीला फार चुकल्यासारखे वाटायचे. पण नंतर झाली सवय. ते लोक पण कधी रस्त्यामधे भेटले तर काय घाटी? कसा काय बरा हाय ना? वगैरे धेडगुजरी मराठीत चौकशी करायचे. तेव्हा समजले की मुंबईत सगळ्या मराठी लोकांना इतर भाषिक घाटी या नावानेच ओळखतात. त्यावरून आचार्य अत्रे नी त्यांच्या एका भाषणात कोटीही केली होती की या लोकांशी वाटाघाटी करायच्या म्हणजे, नुसते वाटाघाटी, वाटाघाटी म्हणजे घाटी लोकांना वाटा! तर सांगण्याचा मुद्दा, त्या रस्त्यावर आम्ही एकमेव घाटी! पण वडील सरकारी अधिकारी होते म्हणून आमचा आदर केला जायचा

मी सकाळच्या कॉलेजला जायचो. दुपारी घरीच असायचो. घरी आजोबा पण होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठे रुबाबदार! उंची बेताची, रंगाने काळेसावळे, पण चेहरा अत्यंत तेजस्वी आणि भेदक डोळे! अंगात सदैव पांढरे धोतर आणि सदरा. कपाळावर गोपीचंदनाचे आडवे सुबक गंध आणि त्यावर मधोमध लाल गंधाचा टिळा. रोज घोटून दाढी करायचे. बाहेर पडले म्हणजे चापून चोपून पांढरा रुमाल बांधायचे डोक्याला, त्यातही त्यांची खास स्टाईल म्हणजे दोन्ही भिवयांच्या टोकाला बरोबर स्पर्श होईल अशा कोनातच तो यायला पाहिज. पांढरा शुभ्र कोट, पुणेरी लाल जोडे, खांद्यावर करवतीकाठाचे उपरणे असा त्यांचा रुबाब! समोरून येणारा अदबीने बाजूला होणारच! बॉडी लैंग्वेज म्हणजे काय ते त्यांच्याकडे पाहून कळायचे. ते स्वत:हून कोणाशी बोलायचे नाहीत. वायफळ बोलणे त्यांना पसंत नसे. मग फालतू गप्पा-टप्पा तर दूरच. आमच्या ससेक्स रोडवरच्या सगळ्या लोकांना ते माहीत होते. न बोलता सुद्धा! दुसरे कारण म्हणजे त्यांच्याकडे वनौषधींची खाणच होती. कित्येक जुन्या किचकट दुखण्यांवर त्यांच्याकडे जडीबुटीचे उपाय असत.

आमचे गाव तिकडे नगर जिल्ह्यातले एक खेडेगाव. गावचे ग्रामदैवत भूतनाथ! एकनाथपंथी साधू, लोकांचा फार विश्वास. कधी आले, केव्हा आले काही माहिती नाही. गावातच त्यांनी समाधी घेतली. त्यांच्या सध्याच्या वारसाची आणि आमच्या आजोबांची खास मैत्री. त्यांनीच आजोबांना ही जडीबुटी दिली. अट फक्त एकच. औषध विकायचे नाही. आजोबांनी ते व्रत कटाक्षाने पाळले. मधून मधून ते गावी जात आणि लागणाऱ्या जडीबुटी घेऊन येत, घरीच औषध बनवीत.

तर आमच्या समोर आमचे मालक मिस्त्रीशेट रहायचे. या पारशी मंडळीत एक गोष्ट खास असते. तरुणपणी दिसायला गोरेगोमटे, सुंदर, धारदार नाकाचे, घारे डोळे, निळे डोळे पण वृद्धत्वाकडे झुकले की काही विचारू नका. वृद्ध पारशी बघवत नाहीत. कंबरेत वाकलेले, नाका-कानातून केसांचे झुपके वाढलेले, सुरकुतलेल्या लोंबत्या कातडीचे, चेहऱ्यावर भकास भाव असलेले, तुसडे असे त्यांचे भेसूर रूप पाहून घाबरायलाच होते.

आमच्या मालकांकडे एकदा जायची वेळ आली. म्हणजे त्यांचा नोकरच आमच्याकडे मालकांनी बोलावलेय म्हणून सांगायला आला. तेव्हा मी घरीच होतो. आजोबा म्हणाले, “जा रे ये पाहून.” मालक तिसऱ्या मजल्यावर रहायचे. लिफ्ट होती. त्यावेळी लिफ्टचे फार अप्रूप. होरमस मंझील बाहेरून दिसायला जेवढी सुंदर तेवढीच आतून उदास आणि अंधारी. मोठे मोठे हॉल पण उदास. त्यात त्यांचे ते म्हातारे आईवडील! मी तर घाबरलोच.लिफ्टने वर पोहोचलो. बेल वाजवली. दार उघडले तर दारात मिस्त्रीशेटची आई. मी तिचे ते भुतासारखे रूप पाहून जाम टरकलो. पण ती गोड हसली आणि म्हणाली, “कौन जो ए तमे?” मी म्हणालो, “मी मनोहर जोगदंड. मालकांनी बोलावले म्हणून आलो आहे.”

“हां हां, तमे जोगदंडना डिकरा छे ने? अंदर आवनी, बेसो.’ आणि आत पाहून ती म्हणाली, “होरमस, ए जोगदंडने डिकरा आवे छे तमे मिलने.’

होरमस शेट हळूहळू चालत आतून आले. मला पाहून गोह हसले. म्हणाले, “बेसो, बेसो डिकरा. अरे गोविंद जरा चाय अने बिस्कुट लाय जो. हां डिकरा, क्या नाम तमारो?”

मी म्हणालो, “मी मनोहर. आपला निरोप मिळाला म्हणून आलो. काय काम आहे आपलं?”

“हां, हां. बराबर छो. बराबर छो. अरे तुजे ते आजोबा हाय ने ते जडीबुटीचे ओशद देते ना?”

“हो.” मी म्हणालो.

“हां, तेचे साटीच तुमाला बोलावले. हे आमचे गुडदे हाये ना ते लय दुकते. तेचेसाठी ते कायतरी ओशद देते काय?”

“साहेब मला माहीत नाही. पण आजोबांना विचारून सांगतो. ते येऊन बघून जातील.” मी म्हणालो.

“हां हां तेनला आमचा निरोप सांग. आले तर लय उपकार होतील.”

मी चहापाणी घेऊन घरी गेलो आणि आजोबांना त्यांचा निरोप दिला. आजोबांनी ताबडतोब आपला फेटा बांधला, कपडे घातले, पायात जोडे सरकवले आणि म्हणाले, “मनोहर, चल आत्ताच जाऊ. हे उपाय फार वेळखाऊ असतात. जेवढे लवकर होतील तेवढे बरे.”

आम्हाला ताबडतोब आलेले पाहून मिस्त्रीशेट चाटच पडले.

“अरे मनोहर, हे आजोबांना ताडाताडी कसाला घेऊन आला? तेंचे ते सवडीने यायचे. आमाला जिना चढायचे लय तरास होते म्हनूनशान नाय, नायतर आमी सोताच येनार होते.”

आजोबा म्हणाले, “अहो मालक त्यात त्रास कसला? ते तर माझे कामच आहे. आपण बिलकुल काळजी करू नका. मी तपासून औषध देईन. ते मात्र नेमाने घ्यायचे.

आजोबांनी त्यांचे गुडघे तपासले. नाडी पाहिली. थोडा वेळ डोळे मिटून कसलेसे ध्यान केले आणि मग म्हणाले, “बरे येतो मी. चार औषध घेऊन येईन. औषध तुम्हाला तीन वर्षे घ्यावे लागेल. तीन वर्षांनी तुम्ही चार जिने सुद्धा आरामात चढून जाल!” मिस्त्रीशेट आश्चर्याने पहातच राहिले. हे संधिवातासारखे किचकट दुखणे त्यांना हैराण करीत होते आणि हे गृहस्थ फक्त तीन वर्षात ते पूर्ण बरे होईल असे म्हणतात. हे ऐकून त्यांना काय बोलावे तेच सुचेना. ते नुसतेच आ वासून पहात बसले.

इतक्यात आतून एक देखणा, लालबुंद, गोरापान, नाकेला तरुण झपकन बाहेर आला. तारुण्याची चपळ हालचाल, भेदक डोळे, तोंडाने कुठलेसे इंग्रजी गाणे गुणगुणत ठेक्यावर पावले टाकीत होता. आल्या आल्या ओरडून म्हणाला, “ओऽऽ डॅड, अरे हे साला घाटी काय दवा देनार? डॉ. तारापोरवालानी हात टेकला तुमचे गुडदे समोर. आनी आता हे तात्या साला काय करनार? तद्दन मूरख छे!”

-विनायक रा. अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..