नवीन लेखन...

प्रारब्ध – भाग 4

असो. मी शुक्रवारी भायखळ्याला गेलो. आमच्या जुन्या घराच्या जागी आता मोठी इमारत उभी होती. तिथे चौकशी केली तेव्हा आमचे जुने दोस्त आणि शेजारी फर्नांडिस भेटले. मला पाहून त्यांनाही खूप आनंद झाला. जुन्या गप्पा गोष्टी झाल्या. त्यात मिस्त्रीशेटचाही विषय निघाला. खरंतर नीच काढला. कारण मला तीच माहिती हवी होती. आणि जे समजले ते ऐकून मी थक्क झालो. एवढेच नाही तर करसन किती उलट्या काळजाचा होता त्याची कल्पना येऊन माझ्या अंगावर शहारे आले.

फर्नाडिस म्हणाला, “अरे मनोहर वो तो बडी ट्रॅजेडी हो गयी।”

“म्हणजे?” मी म्हणालो.

“अरे तुमच्या औषधांनी मिस्त्रीशेट चांगला बरा झाला. करसनची मात्र झाली ” पंचाईत. त्याचे सर्व रंगढंग बंद पडले. बापाची अफाट संपत्ती आणि हे दिवटे एकुलते एक चिरंजीव. अत्यंत उधळ्या. त्यात पोरी फिरवणे, पाटा, जुगार आणि कसले कसले नाद. बाप लेकाची रोज भांडणे व्हायची. खूप आरडाओरडा व्हायचा. अख्ख्या ससेक्स रोडचा तो एक चर्चेचा विषयच झाला होता. शेवटी कंटाळून कंटाळून शेटनी करसनला इस्टेटीचा अर्धा वाटा काढून दिला आणि करसन वेगळा राहू लागला. पण त्याच्या सारख्या कर्मदरिद्री माणसाला कितीही पैसा कसा पुरावा? काही वर्षातच कफल्लक होऊन तो परत आला. शेटनी त्याला घराबाहेर काढला. पण त्याची आई मधे पडली म्हणून शेटनी त्याला परत घरात घेतला. थोडे दिवस बरे गेले आणि पुन्हा ये रे माझ्या मागल्या. आरडाओरड आणि भांडणांनी उच्चांक गाठला. दोनतीन महिन्यांपूर्वीची गोष्ट. रात्री त्यांचा नेहमीप्रमाणे आरडाओरडा चालू झाला आणि एकाएकी एक भयंकर किंकाळी ऐकू आली. आसपासचे सगळे लोक धावले. होरमस मंझीलच्या फुटपाथवर, मिस्त्रीशेट रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. रोजच्या भांडणांना कंटाळून त्यांनी म्हणे तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून खाली उडी मारली. पण आमची खात्री आहे की त्या दिवट्या पोरानेच त्यांना वरून ढकलले असावे. उलट्या काळजाचा आहे तो. साक्षीदार कुणीच नाही. घरात फक्त त्याची म्हातारी आई. ती पण दुसऱ्या खोलीत बेडवर पडलेली! अपघात म्हणून प्रकरण मिटले. करसन आता सर्व मालमत्तेचा मालक झाला. पण आम्हाला असे कळले की शेटने आपली सर्व संपत्ती धर्मादाय ट्रस्टला दिली आहे. आमचे भाडे आम्ही आता ट्रस्टला देतो. करसनला रोजच्या उदरनिर्वाहासाठी काही तरतूद केली आहे असे ऐकतो. पारशी समाजात करसन बदनाम आहे, त्यामुळे त्याचे लग्नही झाले नाही. तो एकटाच आहे. आईला वेड लागलंय. ती पारशी वृद्धाश्रमात आहे.”

आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. करसनचा डाव माझ्या लक्षात आला. सर्व मालमत्ता तर गेलीच पण खंडाळ्याची एकमेव मालमत्ता कोणा उपटसुंभाच्या हाती लागणार हे कळताच त्याचा अगदी जळफळाट झाला असणार. असो. असे असले तरी त्याचे त्याला गेलेले बरे हा माझा विचार मात्र पक्का होता.

ठरल्याप्रमाणे करसनशेट शनिवारी सकाळी माझ्या घरी आले. आम्ही दुपारी खंडाळ्याला पोहोचलो. त्यांची इस्टेट पाहून मी थक्कच झालो. बंगला तर केवढा प्रशस्त! दहा-बारा मोठमोठ्या प्रशस्त राजेशाही खोल्या. चहूबाजूंनी लांब रुंद प्रशस्त व्हरांडे. पांढरीशुभ्र संगमरवरी फरशी! चहूकडे लॉन्स. फुलझाडे, कारंजी, अगदी राजवाडाच! होरमस शेटची बेडरूम तर केवढी प्रशस्त. तिन्ही बाजूला जमिनीपासून छतापर्यंत काचेच्या खिडक्या. त्यातून समोरची हिरवळ आणि दूरवर पसरलेली हिरवीगार दरी! अप्रतिम!

याच खोलीत एका भिंतीवर संत मेहेरबाबा यांचे अत्यंत सुंदर पोट्रेट लावले होते. त्याच्या खाली भिंतीतून काढलेल्या कोरीव नक्षीदार संगमरवरी शेल्फवर सुवासिक फुले आणि उदबत्त्या लावल्या होत्या. सर्वत्र मंद हलका सुगंध दरवळत होता. कुणीतरी नुकतीच पूजा केली असावी असे वाटत होते.

“हे सर्व कोण करते?” मी.

“इस्टेटीची रखवाली करणारा माळी करतो.’ करसन म्हणाला.

त्याच शेल्फवर आणखी दोन लक्ष वेधून घेणाऱ्या चीजा होत्या. करसनच्या तपकिरीच्या डबीसारख्या दोन डब्या! एक डबी उघडून पाहिली त्यात लाल रंगाची पूड. मला वाटले कुंकू! करसन म्हणाला, “हे तुमचे आजोबांनी दिलेला दवा! आमच्या बुढ्या बापाने हे दोन डिब्यात भरूनशान इथे ठेवला आहे. रोज पूजा करायचा. तद्दन मूरख! वेडा झाला होता वेडा!”

आपल्या वडिलांबद्दल त्याची ही भाषा मला मुळीच आवडली नाही. पण आज तो आनंदी मूडमध्ये दिसत होता. मी डब्या पहात होतो. तेव्हा त्याने आपल्या खिशातली डबी काढली आणि मोठ्या समाधानाने एक मोठा झुरका घेऊन बोलता बोलता डबी तिथेच शेल्फवर ठेवली. त्याने मला सर्व इस्टेट फिरवून दाखवली. खूप मोठी होती. खरंतर सबंध फिरून पहायला एखादा तास सहज लागावा एवढी मोठी होती ती! पण करसनला हे काम म्हणजे फुकटची झंझट वाटत असल्यामुळे त्याने त्याच्या गाडीतूनच एकदाही खाली न उतरता दहा पंधरा मिनिटात आमची बोळवण केली. संध्याकाळ व्हायला लागली होती. करसनला जायची घाई होती. रात्री कुठे तरी पार्टीला जायचे आहे असे म्हणत होता. कागदपत्रांवर सही करण्याची घाई करत होता.

मी म्हणालो, “करसनशेट आता फार उशीर झाला आहे. आजचा दिवस मी इथे मुक्काम करीन म्हणतो. कारण रात्री घरी जाऊन तरी काय करणार? रात्री आपण जेवण करू आणि उद्या सकाळी मी कागदपत्रांवर सही करेन.”

करसनचा चेहरा खर्रकन उतरला. त्याला वाटले हे सर्व वैभव पाहून माझी बुद्धी फिरली की काय? तो म्हणाला, “हे बघा जोगदंडसाहेब, मला बनवायचा प्रयत्न करू नको. लय भारी पडल. उद्या जर सही नाय करेल तर ” पुढे काही न बोलता डोळे रोखून माझ्याकडे पहात राहिला. तो किती उलट्या काळजाचा आहे याची मला माहिती होतीच. तो कोणत्याही थराला जाऊ शकेल हे मी जाणून होतो. अर्थात त्याच्या इस्टेटीचा मला काहीच मोह नव्हता. मी म्हणालो, “करसनशेट, अहो एकदा शब्द दिला म्हणजे दिला. हे समोर मेहेरबाबा आहेत, त्यांची शपथ घेऊन सांगतो की उद्या सकाळी मी नक्की सही करीन. मग तर झालं? तुम्ही बिलकुल चिंता करू नका. चला आता आपण जेवण करू.”

“तुम्ही घ्या जेवून, मी आता बाहेर जानार हाय. मला रात्री येयाला लय उशीर होईल. तुमी झोपून जा. आपण सकाळी भेटू.” करसनने तिथल्या माळ्याला बोलावले. म्हणाला, “गोविंद, हे साहेबांना जेवायला घाल आन रातचा हे इथेच सोयेल. तेंची वेवस्था आपले आऊटहाऊस मंदी करून दे.’

माळ्याला सांगून तो घाईघाईनं निघाला. खिशात हात घालून चाचपडू लागला. बहुधा तपकिरीची डबी. मग त्याला आठवले. त्याने ती मघाशी मेहेरबाबांच्या फोटो खालच्या शेल्फवरच ठेवली होती ते. घाईघाईने त्याने डबी उचलली. बाहेर पडून तो गाडीत बसला. एकदा माझ्याकडे रोखून पाहिले जणू न बोलता इशारा करत होता की उद्याचे लक्षात ठेवा नाहीतर गाठ माझ्याशी आहे.

मी पोर्चच्या पायरीवर उभा राहून त्याचा निरोप घेत होतो. त्याने गाडी स्टार्ट केली. अॅक्सीलेटरवर पाय दाबताच ती परदेशी गाडी लगेच निघाली. करसनने तेवढ्या गडबडीतही डबी उघडून तपकिरीचा बार भरलाच. गाडी भर वेगात गेटच्या बाहेर पडली आणि वळणावर दिसेनाशी झाली. करसनला बहुतेक श्रीमंतांच्या लाडावलेल्या पोरांप्रमाणे भन्नाट गाडी हाणायची सवय असावी. असो.

मी आत आलो. मी आणि बायकोने जेवण केले. माळ्याने आस्थेने आम्हाला काय हवे नको पाहिले. म्हातारा होता. प्रेमळ वाटला. बोलता बोलता मी त्याला करसनच्या वडिलांची आणि आमची कशी ओळख झाली, ते किती प्रेमळ होते वगैरे हकिगत सांगितली. त्यालाही त्यांची फार आठवण येते म्हणाला. त्याचाही गळा दाटून आला.

“साहेब, मी काय सांगू तुम्हाला, थोरले शेट म्हणजे देवमाणूस होता बगा. त्याच्या पोटी हा रावण कसा आला देवजाणे! इथे येऊनही शेटजींशी लय भांडायचा. कधी त्यांना शांती मिळू दिली नाय. येवढा चांगला बाप पण या पोराचं प्रारब्धच खराब!” माळी.

जेवण उरकून आम्ही थोडा वेळ बागेत फेरफटका मारला आणि झोपलो. सकाळी आम्ही करसनची वाट पहात बसलो. एकदाचे कागदपत्रांवर सह्या करावे आणि मोकळे व्हावे असे वाटत होते. पण दहा वाजले, अकरा वाजले, बारा वाजायला आले तरी पण करसनचा पत्ता नाही. थोड्या वेळाने माळी धावत आला. त्याच्या हातात एक स्थानिक वर्तमानपत्र होते. त्यावर मोठा मथळा!

खंडाळ्याचे एक माननीय रहिवासी कै. होरमसजी मिस्त्री यांच्या मुलाचा अपघाती मृत्यू!

पुढे बातमीत म्हटले होते, काल रात्री करसनशेट बंगल्यातून गाडीतून बसून बाहेर पडले आणि वळणावर त्यांची गाडी खोल दरीत कोसळली. अपघात पाहणाऱ्यांनी सांगितले की त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला असे दिसत होते. कारण गाडी वेगाने वेडीवाकडी धावत होती.

फारच धक्कादायक बातमी होती. मी सुन्न होऊन मेहेरबाबांच्या फोटोकडे पहात होतो. तेवढ्यात माझे लक्ष त्या दोन डब्यांकडे गेले. मी सहजच एक डबी उघडून पाहिली. त्यात तपकीर होती. मग करसनने नेली ती डबी? त्यात औषधाची भुकटी होती. आणि त्या भुकटीला हात लावायचा नाही असे आमच्या आजोबांनी सांगितल्याचे मला चांगलेच आठवत होते. भुकटीला हात लावला तर फार खाज सुटते असे त्यांनी सांगितले होते आणि करसनने तर नुसता हातच नव्हता लावला तर त्या भुकटीचा नाकात बारही भरला होता.

मंडळी, एकेकाचे प्रारब्ध! आता तुमच्या लक्षात आले असेल तर मी कसा करोडोपती झालो ते! ‘जोशा’ची वाणी ती, ती कशी खोटी होणार?

पुढच्या आठवड्यात बंगल्यावर सगळ्या ऑफिसला जंगी पार्टी देणार आहे आणि ‘जोशा’ ला चीफ गेस्ट म्हणून खास आमंत्रण आहे.

-विनायक रा अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..