रामानुज नावाचे एक थोर संत आणि विचारवंत होऊन गेले. त्यांचा मोठा शिष्य समुदाय होता. एक दिवस त्यांचा एक शिष्य त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला “मला परमेश्वरप्राप्ती करायची आहे. मला प्रार्थना करायला शिकवा. कुठून सुरुवात करु तुम्हीच सांगा.”
रामानुज यांनी त्याच्याकडे करुणेने पाहिले. ते त्याला म्हणाले “माझे उत्तर जाणून घ्यायच्या अगोदर मला हे सांग की तू कधी कोणावर प्रेम केले आहेस काय? ”
तो शिष्य संकोचला आणि म्हणाला “स्वामी, मी तर ब्रम्हचारी आहे. प्रेम करण्याचा विचारही माझ्या मनाला शिवलेला नाही. प्रेमाचा आणि प्रार्थनेचा तसेच परमेश्वराचा काय संबंध आहे? ”
त्यावर रामानुज म्हणाले “पुन्हा एकदा नीट आठवून पहा. कधीतरी तुझ्या मनात प्रेमाचा छोटासा तरंग उठला असेल. तुझ्याही मनात प्रेमाच्या तारा झंकारल्या असतील. ते प्रेम स्त्री पुरुषाचेच हवे असे नाही. प्रेम कोणाबद्दलही वाटू शकते. माणसांवर, प्राण्यांवर, पशु पक्ष्यांवर, वृक्ष वेलींवर आपण कोणावरही प्रेम करु शकतो. पुन्हा एकदा आठव आणि मला सांग, तुला ही प्रेमाची भावना कधी जाणविली आहे काय?
शिष्य म्हणाला “कधीच नाही. प्रेमाचा असा अनुभव मला कधीच कोणाच्याच बाबतीत आलेला नाही. मी फक्त पूजा पाठ करतो. तर्क करतो आणि तुमचा शिष्य आहे. या पलिकडे मला तुम्ही म्हणता तसला कुठलाही अनुभव आलेला नाही.”
त्याचे बोलणे ऐकून रामानुज उदास झाले. ते स्वतःशीच विचार करु लागले. शिष्य त्यांच्याकडे आशेने पहात होता. मी ब्रम्हचारी आहे हे सांगितल्यावर स्वामींना माझा अभिमान वाटेल असे त्याला वाटत होते. थोडावेळ विचार करुन रामानुज त्याला म्हणाले “बाळा मी तुला कुठलीही मदत करु शकणार नाही. ज्या माणसाला प्रेमाचा स्पर्श झालेला नाही त्याला प्रार्थना काय असते हे सुध्दा कधीच कळणार नाही. प्रार्थना हा प्रेमाचा एक आविष्कार आहे. आपण तर्क करत बसलो की प्रार्थनेतले प्रेम आणि करुणा मरुन जाते. तर्क करणाऱ्याला प्रार्थना समजू शकत नाही. प्रेम ही देखील एक प्रार्थना आहे. ते समर्पणातले प्रेम आहे. ज्याला या प्रेमाची अनुभूती येते तो प्रार्थना करु शकतो. तो ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो. तर्क करणाऱ्याला हा अनुभव कधी घेता येणार नाही. मला वाटते तू अगोदर प्रेमाचा प्रत्यय घे. त्यानंतर तुला आपोआप प्रार्थना करता येऊ लागेल. तुझा तर्क थोडावेळ बाजूला ठेव. कोणाच्यातरी प्रती समर्पित हो. त्यातूनच तुला प्रेमाचा, करुणेचा साक्षात्कार होईल. हा साक्षात्कार तुला प्रार्थना करायला शिकवेल. तुला वेगळ्या मार्गदर्शनाची गरज उरणार नाही.
खरोखर ही कथा आपल्या सगळ्यांना विचार करायला लावणारी आहे. जोपर्यंत आपण बाल की खाल काढत बसतो म्हणजेच कुठल्याही मुद्द्याचा कीस काढत बसतो तोपर्यंत आपल्याला प्रेमाची, करुणेची भावना स्पर्श करु शकत नाही. मनातली श्रध्दा आणि समर्पण हे आपल्याला प्रेमाचा मार्ग दाखवतात. पर्यायाने आपणही प्रेममय होतो. प्रार्थनेची ही सुरुवात असते. थोडावेळ आपणही आपला तर्क बाजूला ठेवून केवळ प्रेमावरच विश्वास ठेवून पाहूया. कदाचित हे जग आपल्याला नव्याने वेगळे दिसायला लागेल.
— नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
Leave a Reply