भगवान म्हणतात, ‘प्रार्थना करताना आपल्याला काय हवं आहे, याची नेमकी जाणीव असणं आवश्यक आहे.’ बर्याचवेळा आपल्याला काय हवं आहे याचीच कल्पना माणसाला नसते. अन् मग प्रार्थनेच्या पूर्ततेनंतरही समाधानाची, आनंदाची प्राप्ती होत नाही. माझंच उदाहरण घेऊ. त्यावेळी मी नागपूरला होतो. मी, पत्नी, सून आणि नातू असे रहात होतो. मुलगा पुण्यात होता. तो नागपूरला यायला हवा, असं मलाच काय घरातल्या सर्वांनाच वाटत होतं. तशी प्रार्थनाही आम्ही करीत होतो. प्रार्थनेला प्रयत्नाचीही साथ होती. अखेर आमची प्रार्थना सफल झाली. माझ्या मुलाला नागपूरमध्ये नोकरी मिळाली. नागपूरमधल्या त्या संस्थेने तो पहिलाच कर्मचारी होता. काम सुरु झालं, काही दिवस गेले अन् मला जाणवू लागलं की मुलगा आहे त्या स्थितीत समाधानी नाही. तो ज्या क्षेत्रात काम करीत होता, ते क्षेत्र नागपूरमध्ये मर्यादित होत. अनुभव विश्वाला मर्यादा, कामाच्या व्याप्तीला मर्यादा, कामाशी पूरक अशा पर्यावरणाला मर्यादा यातून असमाधान, दुःख प्रकट होऊ लागलं, इतकं की माझी प्रार्थना सुरु झाली ती त्याला पुन्हा पुण्या-मुंबईत काही काम मिळू देत. काय हवं होतं मला? मुलाचं माझ्याजवळ असणं, तो त्याच्या मुलाजवळ, पत्नीजवळ असणं? हे सारं असूनही दुःखाचं मळभ होतंच. अखेर तो पुण्याला आला त्याच्या कुटुंबासह पुण्याला आला. माझी प्रार्थना पुन्हा सफल झाली. प्रार्थनेचा उद्गम कशातून यालाही या प्रार्थना कौशल्यामध्ये मोठं स्थान आहे. बर्याचवेळा स्पर्धा, तुलना, इर्ष्या, द्वेष आणि अहंकार यातूनही आपल्या मागण्या आणि त्यातून प्रार्थनेचा जन्म होतो. अशावेळी त्या बहुधा सफल होत नाहीतच. माझ्याबरोबर या क्षेत्रात पदार्पण केलेला सहकारी मोठ्या आलिशान गाडीतून फिरतो आहे, हे पाहून माझ्या मनात तुलना, स्पर्धा, द्वेष सुरु होतो आणि मग मला आणखी मोठी गाडी हवी अशी प्रार्थना आकाराला येते. ही प्रार्थना. स्वाभाविकपणे अनुत्तरीत राहते. आणि मग आपण आपल्या नशिबाला दोष देऊ लागतो. हीच बाब स्वार्थमूलक प्रार्थनेची. जेव्हा स्वतःच्या संकुचित स्वार्थासाठी प्रार्थना केली जाते. त्यावेळीही यापेक्षा वेगळे काही हाती लागत नाही. भगवान म्हणतात, ‘तुमच्या प्रार्थनेची सफलता खर्या अर्थाने तुमच्या नातेसंबंधातल्या आत्मियतेवर अवलंबून असते. आईला नाकारणार्या, त्रास, यातना देणार्याला यश सहजी लाभत नाही. जर ते लाभले तर त्यामागे त्या मातेच्या शुद्ध प्रार्थनेचाच सहभाग असतो. आर्थिक यशासाठी वडिलांचे आशीर्वाद आवश्यकच आहेत. त्यांचे शिव्याशाप ज्याला आहेत, त्याला त्याच्या जीवनात खडतर समस्यांना सामोरं जावं लागतं. हे आणि असं सार्वत्रिकच घडतं असं नव्हे; पण तुमच्या प्रार्थनेला तुमच्या नातेसंबंधाची साथ आवश्यकच असते. त्यामुळे जीवनात यशस्वी होण्यासाठी आई-वडील, पती-पत्नी, भाऊ-बहीण, सहकारी यांच्याशी निकोप नातं असणं सर्वाधिक महतत्वाचं.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply