नवीन लेखन...

मराठी संगीत रंगभूमीवरील प्रख्यात गायक-नट प्रसाद सावकार

प्रसाद सावकार यांचे पूर्ण नाव सांबप्रसाद रघुवीर सावकार. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९२८ रोजी गोमंतकीय संगीत रंगभूमीवरील नामवंत सावकार घराण्यात  झाला . बडोदे येथे त्यांचे वडील रघुवीर सावकार हे स्त्रीभूमिकांसाठी प्रसिद्घ असलेले गायक-नट होते व ते ‘रंगदेवता’ या पदवीने ओळखले जात. वडिलांच्या नाट्यसंस्थेत प्रसाद सावकारांचा बालपणापासूनच वावर असल्याने त्यांच्यावर लहानवयातच नाटक प्रसाद सावकार व संगीत यांचे संस्कार होत गेले. गायन-अभिनयाचे प्राथमिक धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. संशयकल्लोळ नाटकात त्यांनी वडिलांबरोबर कृत्तिकेची भूमिका केली. एवढेच नव्हे, तर ह्याच नाटकात कृत्तिका, साधू, जलशातील गायक व वैशाख शेठ अशा चार भूमिका एकाच वेळी करून त्यांनी एक विक्रमच केला. गोपीनाथ सावकारांच्या ‘कलामंदिर’ संस्थेच्या सौभद्र, मृच्छकटिक, विद्याहरण, मानापमान अशा नाटकांतून त्यांनी सुरुवातीला काही भूमिका केल्या, तसेच हौशी रंगभूमीवर करीन ती पूर्व इ. नाटकांतूनही कामे केली. मो. ग. रांगणेकरांच्या ‘नाट्यनिकेतन’ संस्थेच्या रंभा कुलवधू, कोणे एके काळी, एक होता म्हातारा या नाटकांतून त्यांनी विविध भूमिका साकारल्या. लग्नाची बेडी या नाटकातील त्यांची ‘गोकर्णा’ची भूमिका उल्लेखनीय होती. पेडगावचे शहाणे, गोरा कुंभार अशा मोजक्या चित्रपटांतूनही त्यांनी भूमिका केल्या. १९६० ते १९७२ या काळात मराठी रंगभूमीवर संगीत नाटक परंपरेचे पुनरुज्जीवन घडून आले. या काळात नाट्यसंगीताला नवसंजीवन देणाऱ्या प्रमुख गायक-नटांमध्ये प्रसाद सावकार हे अग्रणी होते. १९६० मध्ये विद्याधर गोखले यांची दोन संगीत नाटके–पंडितराज जगन्नाथ व सुवर्णतुला लागोपाठ रंगभूमीवर आली. या दोन नाटकांनी मराठी संगीत रंगभूमीचे नवे पर्व सुरू झाले आणि प्रसाद सावकारांनी गायिलेली त्या नाटकांतील पदे संस्मरणीय ठरली. विशेषतः पंडितराज जगन्नाथ या नाटकातील वसंत देसाईंच्या संगीत-दिग्दर्शनाखाली प्रसाद सावकारांनी (भूमिका पं. जमनलाल) गायिलेली ‘जय गंगे भागिरथी’ व ‘सावन घन गरजे’ ही नाट्यपदे खूपच लोकप्रिय झाली. ‘जय गंगे’ने तर लोकप्रियतेचा कळस गाठला व प्रसाद सावकारांना श्रेष्ठ गायक-नट असा लौकिक मिळवून दिला. त्यांनी सुवर्णतुला नाटकात कृष्णाची भूमिका केली आणि ‘रतिहून सुंदर’ व ‘रागिणी मुख’ ही पदे गायिली. यानंतर विद्याधर गोखले यांच्या मंदारमाला नाटकात त्यांनी ‘मदनगोपाळ’ ही व्यक्तिरेखा साकारली व राम मराठे यांच्याबरोबर ‘बसंत की बहार’ ही जुगलबंदी गायिली. तसेच विद्याधर गोखले यांच्या जय जय गौरीशंकर या नाटकात ‘ श्रृंगी’ची भूमिका केली. त्यातील त्यांनी गायिलेली ‘ भरे मनात सुंदरा’ व ‘नारायणा रमारमणा’ ही नाट्यपदेही लोकप्रिय झाली. यानंतर त्यांनी पुरुषोत्तम दारव्हेकरांच्या कट्यार काळजात घुसली या नाटकात ‘सदाशिव’ची भूमिका साकारून पं. जितेंद्र अभिषेकींसमवेत ‘घेई छंद’ हे पद गायिले. पुरुषोत्तम दारव्हेकरांच्याघनश्याम नयनी आला या नाटकात त्यांनी गायिलेल्या दोन गीतांची ध्वनिमुद्रिका निघाली. मधुसूदन कालेलकरांच्या तो राजहंस एक या नाटकात त्यांनी कृष्णाची भूमिका साकारली. अमृत मोहिनी, अवघा रंग एकची रंग ही त्यांच्या भूमिका असलेली अखेरची नाटके होत. त्यांचा आवाज भरदार व श्रवणमधुर, वाणी स्वच्छ व शुद्घ आणि गायकीत आवश्यक त्या करामती, ताना व हरकती असल्याने त्यांच्या गाण्यांची श्रोत्यांवर सहज छाप पडते. छोटा गंधर्व यांना त्यांनी श्रवणगुरू मानले. त्यांना अनेक मानसन्मान लाभले: पद्मश्री, अ. भा. मराठी नाट्यपरिषदेचे बालगंधर्व सुवर्णपदक, संगीतभूषण राम मराठे स्मृतिपुरस्कार, गोवा शासनाचा कलावंत पुरस्कार, मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, गोमंतक मराठी अकादेमीच्या दीनानाथ स्मृतिप्रतिष्ठानतर्फे लता मंगेशकर पुरस्कार इत्यादीचा त्यात समावेश होतो.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : मराठी विश्व कोश

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..