नवीन लेखन...

प्रसारमाध्यमांचे संस्कार व विकार 

प्रसार माध्यमांचे संस्कार व विकार यांनी समाज आकार घेत असतो. मनोरंजनाच्या नावाखाली प्रसार माध्यमांनी झाकली मूठ उघडली आहे. प्रसारमाध्यमांचे सगळ्यात कमी लक्ष शिक्षणाकडे आहे. साक्षरता तर त्यांच्या खिजगणतीतही नाही. निरक्षर प्रौढांना केवळ अक्षरं आकृष्ट करु शकणार नाहीत. निरक्षरांकडेही  प्रसार माध्यमांचं दुर्लक्ष आहे. बहुतेक मालिकांत सधन घराण्यातील प्रश्न मांडतात. दुःखदारिद्र्य, झोपडपट्ट्या, कुरुपता वास्तवाप्रमाणे माध्यमांतून पाहायला लोक उत्सुक नसतात. वास्तवापेक्षा तारतम्य नसलेले स्वप्नरंजन लोकांना आवडतं. प्रश्न विचारणं व चिकित्सकवृत्ती गुंडाळून ठेवून, लोकांना माध्यमांना समोरे जावे लागत आहे.

प्रसार माध्यमांतील जाहिराती, उपभोग संस्कृतीच्या जबड्यात माणसांना नेत आहेत. विवेकबुध्दी व स्वावलंबन याला तिलांजली दिली की, माणसं नको त्या वस्तूच्या नादी लागतात. सौंदर्यप्रसाधनासाठी करोडो रुपयांच्या जाहिराती, जीवनावश्यक वस्तूऐवजी अनावश्यक वस्तूंचा संग्रह प्रतिष्ठेसाठी घ्यायला लावत आहेत. आर्थिक गुलामीचे नवे तंत्र जाहिरातीमुळे कळत आहे. जाहिरातीच्या मोहजालामुळे वैचारिक परावलंबन वाढले आहे.

जाहिरातीला प्रमाण मानून वास्तव जगणं सुरु आहे. फसव्या व हसव्या जाहिरातीचं पोस्टमार्टेम लोकांनाच नको आहे. वस्तूंसाठी माणूस अशी अवस्था व व्यवस्था जाहिरातीने केली आहे. ग्राहकांच्या गरजा वाढविण्याची वातावरण निर्मिती या जाहिरातीमुळे होत आहे. टाटा व बाटा यांचाच वाटा जाहिरातीत आहे. जाहिरातीने माणसाला पंगू बसवले आहे. निसर्गोपचार पासून दूर जाहिरातीचा औषधोपचारच नेत आहे. औषधांमध्ये ७६ टक्के औषधी कंपन्या परकीय आहेत, जाहिरातींच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बाजारपेठ काबीज केली आहे. १९७७ साली देशात बहुराष्ट्रीय कंपन्या १,१३६ होत्या, १९९१ ला १७ हजार पेक्षा जास्त होत्या. हे सगळं जाहिरातीमुळेच, आधी जाहिरात मग आघात.

पुरेशा प्रोत्साहनाचा अभाव व शिक्षकाच्या मदतीशिवाय अध्ययन करण्याविषयी अनिच्छा यामुळे अध्ययनात अडथळे निर्माण होतात. एकलव्याची जिद्द, आदर्श इतिहासजमा बाब झाली आहे. आवश्यक ती कौशल्ये व प्रेरणा शिक्षणातून मिळायला हवीत. संस्कार  वेगळे व व्यवहार वेगळे हे चित्र दिसत आहे. केवळ शैक्षणिक संस्थावर सर्व प्रश्न सोपवून चालणार नाही. शैक्षणिक संस्थाच प्रश्नांनी त्रस्त आहेत.

कुटुंबाच्या उंबरठ्याच्या आत व बाहेर जे जे घडतं त्यानं माणूस आकार घेतो. उंबरठ्यातली शिदोरी आयुष्यभर कामाला येते, उंबरठ्याबाहेर तीच तारते. पूर्वसंचित, आनुवंशिकता, संस्कार या उंबरठ्यातील बाबी तर कौशल्ये, व्यवहार, व्यक्तिमत्व साकारणं या उंबरठ्याबाहेरच्या बाबी.

योग्य प्रकारची संपर्क साधने योग्य वेळी, योग्यप्रकारे व्यक्तिमत्वाला योग्य संस्कार देऊ शकतात. कोणत्या साधनांचा संपर्क साधायचा व कोणाचा संसर्ग टाळायचा हे ठरवता आलं पाहिजे.  व्यक्ती  एकलकोंडी, स्वयंकेंद्रित झाल्यामुळे तिला घडविण्यात सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत प्रत्येक माध्यमाच्या माध्यमातून तो घडतो, बिघडतो, सुधारतो.

संस्कार लवकर घडतही नाहीत व झालेले संस्कार लवकर पुसलेही जात नाहीत, ही एक जीवनमार्गी आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. संस्कारासाठी कोणतेही जाणीवपूर्वक प्रयत्न नसतील तर संस्कार होणार कसे? संस्कार ही केवळ नैसर्गिक प्रक्रिया नाही, ती सहेतूक प्रक्रिया आहे. एखादी कल्पनासुध्दा संस्कार करते, विकार निर्माण करते. संस्कार करते, संस्कार हा व्यक्तिमत्वाला, जीवनाला आकार देणारा घटक आहे. माणसाची अभिव्यक्ती, वर्तन हा सुध्दा संस्काराचाच भाग असतो. मिळमिळीत संस्कार झालेली माणसे प्रवाहात वाहत जातात, हवा येईल तशी वाहवत जातात. घट्ट रुतलेल्या संस्कारावर नैतिकतेची इमारत दिमाखात उमी राहते.

व्यक्तीला सुधारण्याचा, बिघडविण्याचा मक्ता आता समूहसंपर्क साधनांवर अवलंबून आहे. काही वर्तमानपत्र वाचकांना दिशा देतात. काही वर्तमानपत्र वाचकांची दशा करतात. मनोरंजनाची पुरवणी वाचकांना नशा देणारी असावी. वृत्तपत्र, चित्रपट काढणार्‍यांचे हेतू शुध्द राहिले नाहीत. लिहिणारेही खूप झाले, वाचन न करणारेही लिहते झाले. लेखन तर काय कुणीही करील, पण खरी गरज असते ती स्वर्गीय देणगी असलेल्या संपादकाची असे एच.डब्ल्यू. नेव्हिनन्सनने म्हटले आहे.

भावना जपणार्‍या कुटंबात भावना चाळवणार्‍या अनेक गोष्टी हात जोडून उभ्या आहेत. दूरदर्शनवरुन स्त्री दर्शनाचा मारा प्रचंड प्रमाणात होत आहे. दूरदर्शनने माणसांना खिळवून टाकलय. हालचाल बंद, बोलती बंद, विचार बंद, उच्चभ्रू लोकांच्या वस्तू घेण्याविषयी मध्यमवर्गीयांना आवाहन करणार्‍या जाहिराती, प्रवृत्त करणार्‍या जाहिराती, नको ती कृती करायला लावणार्‍या जाहिराती, जाहीररित्या ‘ती’ चा उल्लेख करणार्‍या जाहिराती. माल कुणाचा, हाल कुणाचे. ‘सबकुछ दिखता है’ एक्स-रे प्रमाणे माणसाच्या शरीराचा वेध घेणार्‍या जाहिराती, विनोद, शरीर व मानसिकता लक्षात घेऊन जाहिराती तयार होत आहे. ८० टक्के  फॅटरहित तेलगंगा लोकांच्या घरी जाहिरातीमुळे पोहोचली. जाहिरातीपुढे डॉक्टरांचा सल्ला निष्प्रभ ठरत आहे. वारंवार जाहिरातीचा ब्रेक, मनाचा उद्रेक होण्याइतपत तापदायक ठरत आहे. जाहिरातीच्या कवचकुंडलाचा वापर प्रसारमाध्यमे करीत आहेत. उत्पादनातली गुणवत्ता जाहिरातीतून भ्रष्टाचार, स्वैराचार, शरीर, विकार, जोपासले जात आहेत. पोरीला पटविण्यासाठी प्रेमाचे धडे जाहिरातीतून मिळत आहेत. उच्चभ्रू लोकांनी, उच्चभ्रू लोकांसाठी केलेल्या जाहिराती मध्यमवर्गीयांची झोप उडवत आहेत, त्यांना अनावश्यक वस्तू खरेदी करायला लावत आहेत.

संस्कार करणार्‍या गोष्टी दुर्मिळ झाल्या की, भावनिक पोषणाचा प्रश्न येतो. अनेक ऐतिहासिक पात्र रंगमंचाच्या, चित्रपटाच्या माध्यमांतून संस्कार देऊ शकतात. निर्बुध्द चित्रपट, मालिका पाहत मुलं स्वतः जवळील सुप्त गुण विसरत चाललेत. कुटुंब संस्थाही उत्कृष्ट रंगमंच आहे कुटुंबाच नेपथ्य, पालकांचा दिग्दर्शन, वातावरण निर्मिती या गोष्टी पोषक असतील मुलांचा भावी जीवनातील अभिनय दाद देण्यासारखा होतो. निर्जीव समूह संपर्कसाधनांच्या सान्निध्यात सजीव आज गुदमरत आहेत. क्षेपणास्त्राप्रमाणे सजिवांवर एकतर्फी मारा संवाद संपवतो. संवाद संपलेल्या समाजाला मरगळ येते. जिथे संवाद असतात तिथे चैतन्य असतं. माध्यम हे अत्याचार करणारं नसावं. विचाराला दिशा देणारं असावं. अनेक रटाळ वर्तमानपत्रं, चित्रपट, प्रेक्षकांच्या माथी मारले जातात. वैचारिक भूक भागविण्यासाठी प्रसारमाध्यमासारखं माध्यम नाही. घरातली माणसं कमी झाली तरी दूरदर्शनमधून माणसांची रेलचेल घरात सुरु झाली. घरातल्या माणसांची बडबड बंद करुन माध्यमातील माणसांनी लुडबूड सुरु केली आहे.

‘बेबी अँड चाइल्ड केअर’ या बेन्जामिन स्पॉक यांच्या पुस्तकाने जगभरातील पालकांना आपल्या पाल्यांना सांभाळण्यास मदत केली. ३० हून अधिक भाषात भाषांतरित झालेल्या पुस्तकाच्या ५ कोटी प्रती खपल्या. दुसर्‍या महायुध्दानंतरच्या काळात या पुस्तकाने पालकांच्या मार्गदर्शनाची भूमिका बजावली. जे उत्कृष्ट लिखाण करतात त्यांच्याकडे वृत्तपत्रांनी जायला हवं. धर्म, पक्ष, जात या बरीच वृत्तपत्रे आज अडकली आहेत. बातम्या या लेखनकौशल्य दाखविणार्‍या नसाव्यात तर वस्तुस्थिती प्रतिबिबीत करणार्‍या असाव्यात. लोकांना आश्चर्यचकीत करणारी प्रसारमाध्यमे नसावीत, ते क्षणभंगूर असते. क्षणभंगूर गोष्टी मानवी पकड घेत नाही. निवडणुकीचे निकाल हे प्रसार माध्यमांच्या धमालवर अवलंबून नसतात. लोकांची कमाल हेच शेवटी सत्य असतं. कुणाला महत्व द्यायचं हे प्रसारमाध्यमं ठरवत असेल तरी कशाला महत्व द्यायचे हे लोकच ठरवतात. भविष्यात चांगला दिवस जाईल असं असलं तरी झालेले हाल ज्याचे त्यालाच सोसावे लागतात.

प्रसारमाध्यमांनी ‘जुने ते सोनं’ तरुण पिढीसमोर आणून संस्कार करायला काय हरकत आहे. टि.व्ही. चा रिमोट चिमुरड्यांच्या हाती गेला आहे. कार्टुन पाहून डोळ्याच्या बाहुल्या लहान होणे, एकलकोंडे होणे असले विकार प्रसारमाध्यमांकडून होत आहेत. प्रसार माध्यमांच्या प्रलोभनापुढे तरुण पिढी हतबल झालीय, पालक असाहय्य आहेत. पुण्यतिथी, नेत्यांच्या मृत्यूला जोडून सुट्टी घेऊन विकेंड एन्जॉय करण्याचे प्लॅन्स्, हेच जीवनाचे इतिकर्तव्य आहे, असे अनेकांना वाटत आहे.

प्रसारमाध्यमांतून वास्तूशास्त्रवाले, कोचिंगवाले, भविष्यवाले, संत, महात्म्ये आपले विकार, संस्कार म्हणून बिंबवत आहेत. हीच आजची शोकांतिका आहे. संस्काराच्या टिपकागदाने विकार टिपलेच पाहिजेत, नाही तर रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही.

— डॉ. अनिल कुलकर्णी 
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन,
कोथरुड, पुणे ४११ ०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 30 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..