आज १२वीच्या मुलांची JEEची परिक्षा होती. पेपर ९.३०चा पण हजेरी मात्र ७ वाजता लावायची होती. माझा मुलगा या परिक्षेला बसल्याने मी त्याला सोडायला गेलो होतो.
कुठल्याही परिक्षा केंद्रावर असते तसं चित्र होतं. मुलांपेक्षा त्यांना सोडायला आलेल्या आई-बाबांची गर्दी जास्त होती व टेन्शनही मुलांपेक्षा त्यांनाच जास्त होतं. सर्वत्र गडबड उडाली होती.
ठिक ८ वाजता मुलांना केंद्रात प्रवेश द्यायला सुरूवात केली आणि आधीच असलेल्या गडबजीत आणखी गोंधळ उडाला. मुलांना त्यांच्यासोबत काहीही न्यायची परवानगी नव्हती. पेनही न्यायचं नाही. विमानतळावर होते तशी काटेकोर तपासणी होत होती. सोबतची सॅक (ही हल्ली अनिवार्य गोष्ट झालीय. काय असतं एवढं त्यात काय माहित..!?), पैशांचं पाकीट, सुट्टे पैसै, रेल्वे पास, कंबरेचा पट्टा एवढंच काय, घाम पुसण्यासाठी लागणारा रुमालही नेऊ देत नव्हते. काय, तर म्हणे नियम आहे..!
ठिक आहे. नियम आहे तर आहे, त्याचं पालन करायलाच हवं. पण असा नियम का केला याचं लाॅजिकल उत्तरच कोणाला देता येईना. काॅपी रोखावी म्हणून असा नियम असेल, तरं ही परिक्षा पूर्णपणे लाॅजिकवरच अवलंबून असते. अख्खं पुस्तक समोर घेऊन परिक्षेला बसलो तरी काॅपी करणं अवघड अशा पद्धतीची ही परिक्षा असते.पूर्णपणे बुद्धी आधारीत या परिक्षेसाठी असे निर्बुद्ध (माझ्या मते) नियम का बनवतात कोणास ठाऊक..!
आपल्या देशाचीच ही शोकांतिका आहे. तुम्ही फक्त नियम पाळायचा, तो नियम का केलाय हे विचारायचं नाही. असं असल्यामुळेच बहुतेक लोकांचा नियम तोडण्याकडेच कल असतो. आपल्याकडे प्रश्न विचारायलाच बंदी, मग प्रश्न पडणारच कसे..बरं, त्यातून पडलाच एखादा प्रश्न आणि तो तिथल्या कुणाला विचारलाच, तर त्याचं उत्तर फक्त “उपर से आर्डर है” येवढंच मिळतं. आजच्या JEE परिक्षेबद्दल जे लिहीलंय ते असं उत्तर मिळाल्यामुळे किंवा पटण्यासारखं उत्तर न मिळाल्यामुळेच.
ज्या समाजात प्रश्न विचारायला बंदी (आपल्याकडे कायद्याने बंदी नाही. ‘मी सांगतो ते ऐक, जास्त बोलू नकोस’ असं ऐकण्याची लहानपणापासून सवय असल्यामुळे, आपल्याला प्रश्नच पडत नाहीत. अर्थात यात अपवाद असतीलंच, पण ते अपवादच..!) असते तिथे प्रगती कशी होणार..! म्हणून कदाचित आपल्याकडे म्हणावे तसे संशोधक निपजत नसावेत.
सर्व समाज आणि शिक्षणव्यवस्था ‘नोकर’ तयार करण्यात मशगुल. सांगीतलेलं ऐकायचं, प्रश्न विचारायचे नाहीत, मग ‘सर्व्हट’च मिळाणार आपल्याला, ‘मास्टर्स’ नाहीत. हे बदलायला हवं सारं हे सर्वांनाच वाटत असते हे खरं असलं तरी सुरूवात कोण करणार हा प्रश्न आहे आणि तो तरी पडलाय का कुणाला काय माहित?
हिच आपली शोकांतिका आहे. शिक्षणव्यवस्थेत प्रश्न विचारण्याची सोयच ठेवलेली नाही. विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या येवढंच विचारतात. धडा वाचून तुम्हाला काय प्रश्न पडला असं विचारायला हवं खरं तर..
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply