आजची कथा : प्रश्नोपनिषद
पूर्व प्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स
दीपावली २०००
” कूल डाऊन भांडारकर , कूल डाऊन ”
अशी कथेची सुरुवात केली आणि नंतर दोन दिवस कथेचा एक शब्दसुद्धा लिहिला नाही.म्हणजे लिहिताच आलं नाही काही. पेन आणि पॅड हाती घेतलं की डोळे भरून यायचे. अस्वस्थता यायची. वाटायचं , हे कथानक आपण लिहायलाच हवं का? भांडारकर आणि त्यांची बायको राधा यांची मनःस्थिती उलगडायला हवीच का ? बुद्धिमान असणाऱ्या , सातत्याने मेरीटमध्ये येणाऱ्या , विचारवंत असणाऱ्या , कुटुंबसंस्थेला जपण्यासाठी धडपडणाऱ्या , प्रवाहाविरुद्ध पोहणाऱ्या , काळाची पावले ओळखून त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडविणाऱ्या विशालचं दुःख मांडायलाच हवं का? नोकरी मिळविण्यासाठी , लाखो रुपयांची लाच मागणाऱ्याना , विरोध करता न आल्यानं आणि गुणवत्तेची कदर न करणाऱ्या व्यवस्थेला , चार शब्द सुनवता न आल्यानं , हताश होऊन बळी पडणाऱ्या तरुणाईचं दुःख वेशीवर टांगायलाच हवं का? असे असंख्य प्रश्न माझ्या डोळ्यासमोर उभे राहत होते. प्रश्नोपनिषद मनात वादळ निर्माण करीत होतं.
आजूबाजूला बळी पडणारी नवीन पिढी दिसत होती. मध्यमवर्गीय कुटुंब व्यवस्था नोकरीच्या आशेनं कर्जबाजारी होताना आणि नंतर उद्ध्वस्त होताना दिसत होती. सगळं वास्तव त्या प्रश्नोपनिषदातून मनाला हलवून टाकत होतं. त्यामुळं कथेला शीर्षक सुचलं होतं . प्रश्नोपनिषद
कथानक थोडं वेगळं होतं.
मध्यमवर्गीय तेव्हा मुंबईतून उपनगराकडे हाकलला जाऊ लागला होता. भांडारकर असेच एक मध्यमवर्गीय. कर्ज काढून उपनगरात ब्लॉक घेऊन , लोकलच्या रोजच्या गर्दीत स्वतः कणाकणानं मरायला झोकून देणारे. विशालला नोकरीची संधी आलेली पण दीड लाखाची लाच मागितल्यानं तो हबकलेला. पण नोकरी चांगली म्हणून भांडारकर त्यासाठी आणखी कर्ज काढतात. ते पैसे दिल्यानंतर विशालकडे मॅनेजमेंटची पैशांची वाढीव मागणी होते. वडिलांची ओढाताण तो पाहतो .
घरातील असेल नसेल ते विकून भांडारकर त्याला पैसे उपलब्ध करून देतात आणि विशाल जेव्हा ते द्यायला जातो तेव्हा त्याला कळतं की मेरीटमध्ये न बसणाऱ्याला , मॅनेजमेंटने जास्त पैसे घेऊन विशालला डावललंय. तो उद्ध्वस्त होतो . सगळं कुटुंबच उद्ध्वस्त होतं.
कथा इतकीच आहे. पण मला त्यातून बरेच कंगोरे उलगडायचे होते.
व्यवस्था माणसाला , माणुसकीला , भावनांना संपवून टाकते. क्षितीज भासमान असतं आणि ते कधीच हाती लागत नाही .
उमेद संपावणारी मंडळी आपल्या आजूबाजूला भरपूर असतात. भरारी घ्यायला झेपावणाऱ्यांचे पंख छाटण्यात अनेकांना आसुरी आनंद मिळत असतो आणि एखाद्या घरातल्या तरुणाची आत्महत्या ही घरातल्या सगळ्यांना मानसिक , शारीरिक दृष्ट्या संपवून टाकणारी असते. प्रश्नोपनिषद संवेदनशील माणसाला सैरभैर करून सोडते. कथा लिहिताना मी याचा अनुभव घेतला .
सगळी कथा ठाणे रेल्वे स्टेशनवर घडते. त्यामुळे आपल्याच नादात असणारी आणि सतत पळणारी गर्दी , कोलाहल , ओव्हरफ्लो होणाऱ्या लोकल्स , त्यात घुसण्यासाठी होणारी जीवघेणी कसरत , पोलिसांची , दंडगटांची अरेरावी , मग्रूर मस्तवाल रिक्षावाले , टोळ्यांनी हिंडणारे आणि नाडणारे तृतीयपंथी , त्यातच चिकाटीने व्यवसाय करणारे फेरीवाले आणि या सगळ्यात सतत मागे पडत जाणारे भांडारकर मला व्यवस्थित रेखाटता आले. मुलाच्या आठवणीनं व्याकुळ होणारं त्यांचं मन आणि रेल्वेच्या रुळांची रक्तमाखली आठवण मांडता आली. तिन्ही व्यक्तिचित्रे रेखाटताना वर्तमानातले अनेक संदर्भ उपयोगात आले. स्टेशन हे स्थळ निवडल्याने एक प्रकारची गतिमानता आली. व्यवस्थेतला पोकळपणा आणि समाजाची भावनाहीनता मांडता आली.
कथेच्या शेवटी , स्टेशनबाहेर बेरोजगारांचा मोर्चा निघालेला असतो आणि त्यातून दंगल सुरू झालेली असते .
घरी जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या भांडारकराना , दंगलीतील इसम म्हणून पोलीस बेदम मारहाण करतो .
आणि ते निपचित पडल्यावर कर्तव्य केल्याच्या समाधानात पोलीस निवांत होऊन तंबाखू मळू लागतो .
इथे कथा संपते आणि प्रश्नोपनिषद खऱ्या अर्थाने सुरू होते …
आपला प्रतिसाद अपेक्षित आहे .
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
Leave a Reply