प्रसिद्ध लेखिका, प्रवास वर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचे १ मार्च २०२५ रोजी निधन झाले.
मीना प्रभू यांचा अल्पपरिचय –
जन्म.२७ ऑगस्ट १९३९ पेशाने भुलतज्ञ असलेल्या प्रभू यांनी आपल्या लेखनाने प्रवासवर्णनाला एक वेगळेच वलय प्राप्त करून दिले होते.
मीना प्रभू या मूळच्या पुण्याच्या होत्या.मीना प्रभू यांचा जन्म आणि शिक्षण पुण्यात झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण स. प. महाविद्यालयात झाले. बी.जे. मेडिकल कॉलेज मधून त्यांनी एमबीबीएस केले होते. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डीजीओ झाल्या. १९६६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्या. तिथे सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले.
मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या डॉ. मीना प्रभू यांची प्रवास वर्णनाबरोबर कादंबरी आणि कवितासंग्रहही प्रकाशित झाले आहेत. पण त्यांची मराठी साहित्यात ओळख होती ती प्रवासवर्णनकार म्हणूनच. पाच खंडात मुशाफिरी करून यथार्थ वर्णन मीना प्रभू यांनी केले. त्यांचे पहिले पुस्तक होते ‘माझं लंडन’.
या पुस्तकाने मराठी साहित्यात एक नवा प्रवाह रूढ केला. मराठी माणसाला आता लंडन पूर्वीइतके अप्राप्य राहिलेले नाही. हे पुस्तक आले तेव्हापेक्षा जग अधिक जवळ आले. पण मीना प्रभू यांच्या या पुस्तकाची जादू मात्र आजही कायम आहे.
पुढे मीना प्रभूंनी डझनभरहून अधिक प्रवासवर्णने लिहिली. त्यामध्ये त्यांनी जगातील निरनिराळ्या ठिकाणांची ज्ञान देणारी व रंजन अशी माहिती दिली. त्यांची ‘माझं लंडन’, ‘इजिप्तायन,’ ‘तुर्कनामा,’ ‘ग्रीकांजली,’ ‘चिनी माती’ अशी अनेक पुस्तके लोकप्रिय झाली.
मीना प्रभू यांनी गोवा येथील महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले होते. तसेच मीना प्रभू यांना दि. बा. मोकाशी पारितोषिक-२०१०, गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार-२०११, न. चिं. केळकर पुरस्कार-२०१२, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार देखील मिळाले. त्यांनी पुण्यात २०१७ मध्ये ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प सुरू केला होता.
मीना प्रभू यांची पुस्तकं.
माझं लंडन : लंडनचा इतिहास आणि संस्कृतीचा आढावा, माय लंडन (हिंदीमध्ये), डायाना चार्ल्स : मुखवटयांमागचे चेहरे (कादंबरी), सुखनिधी तुझा माझा (कवितासंग्रह)
दक्षिणरंग : दक्षिण अमेरिकेतील प्रवासवर्णन, चिनीमाती : नवीन आणि जुन्या चीनबद्दलची माहिती, चिनी संस्कृती, इतिहास यांचे विश्लेषण, मेक्सिको पर्व : सांस्कृतिक, भौगोलिक स्वरूप आणि जीवनशैली, इजिप्तायन : आहार, वारसा, सांस्कृतिक, इतिहास, गाथा इराणी : इराण, तुर्कनामा : तुर्कस्तान, ग्रीकांजली : कला, साहित्य आणि संस्कृती अशा तीन अंगाने रोमबद्दलची माहिती, रोमराज्य : अॅमस्टरडॅम ते रोम (१), नेपल्स ते व्हेनिस (२), वाट तिबेटची : तिबेटचं खरं स्वरूप शोधण्याचा प्रयत्न, न्यूयॉर्क-न्यूयॉर्क : एका नगरातील जग (न्यूयॉर्कची सगळी माहिती), जलपर्यटन, पूर्वेकडील देशांतील भटकंती, आफ्रिका खंडातील पर्यटन.
संकलन. संजीव_वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता
Leave a Reply