नवीन लेखन...

‘प्रताधिकार’च्या नावानं चांगभलं

गेल्या वर्षी, २५ एप्रिल रोजी ‘गंध पुण्याचा, गेला सांगून.’ हा ललित लेख मी लिहून फेसबुकवर अपलोड केला. दोनच दिवसात शेकडों रसिकांनी वाचून, तो आवडल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. या लेखात पुण्यातील ‘काही खास ठिकाणं’ फक्त वासावरुन ओळखणाऱ्या पुणेकराचं वर्णन केलेलं आहे.
हा लेख वाचून कित्येकांनी मला फोन करुन, पुण्याची सफर घडविल्याबद्दल आनंद व्यक्त केला. एका ज्येष्ठ नागरिकाने हा लेख परदेशातील आपल्या मुलाला पाठवण्यासाठी, माझी परवानगी मागितली.
गेल्या चार दिवसांपासून हाच लेख ‘सुनील इनामदार – संग्रहक’ अशा नावाने माझ्यासह अनेकांच्या व्हाॅटसअपवर फिरत आहे..
मूळ लेखाला धक्का न लावताच, सुनील इनामदारने, इमानदारीत लेखकाचं नाव व संपर्काचा मोबाईल नंबर कट केलेला आहे.
संग्रह एखाद्या दुर्मीळ वस्तूंचा केला जातो. ती वस्तू कुठून आली किंवा तिचा खरा मालक कोण हे संग्राहकाला माहीत नसते. लेखांचा, संकलक किंवा संपादन करणारा असू शकतो. बरं या सुनीलला आपण शोधूही शकत नाही. फेसबुकवर नाव टाकले तर, शेकडो सुनील समोर येतात.
थोडक्यात. आजच्या डिजिटल जगात कुणीही आपली पोस्ट, स्वतःच्या नावावर अपलोड करु शकतो. माझ्याच पोस्टमध्ये मला न विचारता माझ्याच एका मित्राने, स्वतःची दोन वाक्यं टाकून ती स्वतःच्या नावाने अपलोड केली होती.
एका उमेदवाराने अशीच माझी कथा स्वतःच्या फेसबुकवर माझा संपर्क काढून, अपलोड केलेली मी पाहिली. त्याला त्याचा जाब विचारल्यावर, त्याने ‘तुमचं नाव ठेवलेलं आहे’, असं स्पष्टीकरण दिले.
एकदा फेसबुकवर एकाने स्वतःच्या नावाने अपलोड केलेली दीर्घकथा माझ्या वाचनात आली. ती कथा, भाषाशैलीवरुन ज्येष्ठ लेखक जयवंत दळवी यांचीच आहे, हे मी ओळखले. प्रतिक्रियेमध्ये मी या कथेवरुन, चांगला चित्रपट होऊ शकतो. असा अभिप्रायही नोंदवला. मात्र त्या व्यक्तीला आपण जाहीरपणे, चौर्यकर्म करतोय, याचा काही एक खेद नव्हता..
माझे मित्र, ज्येष्ठ एकपात्री कलाकार, विडंबन काव्य लेखन करणारे, बण्डा जोशी यांच्या अनेक विनोदी कविता, सर्वदूर गाजलेल्या आहेत. त्यांचीच ‘मी फुगा, तू हवा’ ही कविता अनेकांनी आपल्या नावावर फेसबुक व व्हाॅटसअपवर, अनेकदा अपलोड केलेली आहे. त्यांनी यासंदर्भात अनेकदा निवेदन देऊनही, काहीही फरक पडलेला नाही.
एका विद्यमान प्रकाशकानं, एका लेखकाचं ‘शुद्धलेखन’ विषयावरचं पुस्तक त्याची रितसर परवानगी न घेता मोठ्या आकारात छापून त्याच्या समोर ठेवलं. त्याबद्दल लेखकानं विचारणा केली असता, मी माझ्यासाठी ही प्रत तयार केलेली आहे, असे सांगून बोळवण केली..
मी जिथे काम करतो, त्याचं बिल्डींगमध्ये कवयित्री विमल लिमये रहात असत. त्यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती.’ ही कविता अनेकांनी स्वतःच्या नावावर वर्तमानपत्रात, दिवाळी अंकांत, पुस्तकात, जाहिरातीत, शुभेच्छापत्रात कवयित्रीची रितसर परवानगी न घेता प्रकाशित केलेली आहे! हीच कविता निर्माती स्मिता तळवलकर यांनी एका मराठी मालिकेत वापरली. विमल लिमये यांनी त्यासंदर्भात कोर्टाकडे धाव घेतली. कोर्टाच्या तारखा पडत राहिल्या. शेवटी निर्मातीने ‘ही कविता मीच लिहिलेली आहे’ असं सांगणारी व्यक्ती, वकीली चातुर्याने कोर्टापुढे उभी केली! परिणामी कवयित्री विमल लिमये यांना, मनस्तापाशिवाय काहीही मिळाले नाही.
आजकाल सर्वांना आयतं हवं, स्वतः काहीही न लिहिता दुसऱ्याचं लेखन स्वतःच्या नावावर खपवणारे व स्वतःला लेखक म्हणवून घेणारे, उदंड झाले आहेत. परदेशात काॅपीराईटचा भंग केल्यास, शिक्षा आहे. भारतात अजून तरी सवलत आहे. त्याचा फायदा अजून काही वर्षं तरी, ही मंडळी घेणारच!!
अशाच माझ्या लेखांच्या बाबतीत दोघांचे अनुभव, अविस्मरणीय आहेत.. पहिले नाशिकमधील रहिवासी, मेघःश्याम सोनवणे. हे गृहस्थ भारतीय हवाई दलात वीस वर्षे सेवा करुन निवृत्त झालेले आहेत. २०१८ पासून दररोज पहाटे, वाचनात आलेली एक सकारात्मक कथा ते आपल्या मनोगतासह वैयक्तिक ८००० संपर्कावर, ५००० फेसबुकवर फाॅलोवर, ११८ व्हाॅटसअप ग्रुपवर, टेलिग्रामवर, लेखकाच्या नाव व संपर्कासह शेअर करतात. आलेल्या प्रतिक्रिया लेखकाला पोहोचवतात. आणि या कार्यातून निखळ, निरपेक्ष आनंद मिळवतात..
दुसरे मित्र आहेत, नाशिकचेच. दत्ता सरदेशमुखजी! आकाशवाणीच्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर व्हाॅटसअपवर येणाऱ्या उत्तम लेखांचे, कथांचे ते आपल्या खास शैलीत अभिवाचन करतात व त्याची क्लीप व्हाटसअपवर अपलोड करतात.
अशाप्रकारे त्यांनी माझे लेख व कथांचे अभिवाचन केलेले आहे. अशा या दोघांही सकारात्मक कार्य करणाऱ्या, सुहृदयी मित्रांना मनःपूर्वक धन्यवाद!!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२५-१-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..