नवीन लेखन...

प्रथम ट्रस्ट, अलिबाग

Pratham Trust, Alibaug

लहान मुलांना शिकवताना अगदी त्यांच्याप्रमाणे मुल होवून, त्यांच्या गरजा, समस्या, व आवडी समजाऊन घेऊन हसत-खेळत शिकवावं लागतं. त्यांच्या मनाचा चंचलपणा एखाद्या फुलापाखरालाही लाजवेल असाच असतो. त्यामुळे वर्गात जरी त्यांचे कान व डोळे शिक्षकांच्या शिकवण्याकडे असले, तरी बर्‍याचदा त्यांचं मन हे सतत कुठल्यातरी स्वप्नांच्या व रम्य कल्पनांच्या फुलांभोवती पिगा घालत असतं. शिक्षकांनी कोरडया भाषेत व कठोर शैलीत शिकवलेलं ज्ञान त्यांच्या कधीच पचनी पडत नाही. परंतु हेच जर त्यांच्या मोठया ताईने किवा दादाने प्रेमाने, मायेने व हसत-खेळत शिकवले तर त्याचा प्रभाव मुलांच्या मनावर दिर्घकाळापर्यंत राहतो. मुलांना त्यांच्या कलाने शिकवावं लागतं, त्यांच्या छोटया मोठया चुकांना माफ करावं लागतं, नैराश्याने त्यांना ग्रासलं तर गोंजारावं लागतं. त्यांच्या मनात आत्मविश्वासाची ज्योत सतत तेवती ठेवावी लागते परंतु शाळेत शिक्षक व मुले यांच्यात वयाच फार अंतर असल्यामुळे साहजिकच शिक्षकांच्या मनात आपल्या विद्यार्थ्यांकडुन खुप अपेक्षा असतात, त्यांनी आपण शिकवलेलं लवकर आत्मसात करावं, लगेच पाठ करावं व सांगितले जाईल तेव्हा ते कागदावर उतरवून दाखवावं असा शिक्षकांचा आग्रहच नाही तर अट्टाहासच असतो. मुलांना शिकवताना जर आदळआपट केली, वारंवार शिव्या घातल्या, इतर मुलांशी त्यांची तुलना केली, वारंवार वर्गासमोर त्यांचा अपमान केला, पट्टीने त्यांना झोडुन काढलं तर याचा त्यांच्या मनावर खुप खोल परिणाम होतो, व त्यांचं सारं भावविश्व, व त्यांच्या चेहर्‍यांवरचं गोंडस हास्य, त्यामुळे नासून जाण्याची शक्यता निर्माण होते. शाळेतल्या वर्गात एका तुकडीत ५०-६० मुलं शिकत असल्यामुळे जी मुलं शिक्षकाच्या अपेक्षांवर खरी उतरतात, त्यांच्या डोक्यात मानाचा शिरपेच खोचला जातो व जी मुलं या अपेक्षा पूर्ण करत नाहीत त्यांना नालायक ठरवलं जातं वारंवार अपमानित केलं जातं. यातील काही मुले ही उनाडक्या करणारी असतात परंतु बरीच अशीही असतात की, ज्यांना शिकण्याची व त्यासाठी परिश्रम घेण्याची भरपूर इच्छा असली तरीही शिक्षकांच्या शिकवण्यातील त्रुटींमुळे म्हणा किवा घरच्या प्रतिकुल वातावरणामुळे म्हणा, आत्मविश्वासाचे खच्चीकरण झाल्यामुळे म्हणा किंवा अभ्यासाबद्दल व परीक्षांबद्दल मनात भीतीचे मळभ दाटल्यामुळे म्हणा ते अभ्यासात, इतरांपेक्षा मागे पडलेले असतात. त्यांना फक्त एका प्रेमळ, दयाळु व त्यांच्यातील खेळकरपणाला व खोडकरपणाला समजून घेवून शिकवणार्‍या शिक्षकाची गरज असते.

अलिबागमधील प्रथम ट्रस्टने अशाच काही अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रथम आणण्याचा जणु विडाच उचलला आहे. अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील अनेक पैलु हेरुन, त्यांच्यामधील जिद्दीला व आत्मविश्वासाला नवसंजीवनी देण्याचे महान कार्य ‘प्रथम’ अनेक वर्षांपासून रायगड जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये करत आहे. प्रथम वरील विश्वासाने, आता स्वतः शिक्षकच अशा काही अभ्यासात मागे पडलेल्या व परीक्षांमध्ये सतत नापास होणार्‍या मुलांना निवडून ‘प्रथम’ च्या हातांमध्ये सोपवतात व निश्चितं होतात ‘प्रथम’ च्या शिक्षीकांना बालसख्या असे संबोधले जाते व या सुंदर नावाला अनुसरुनच त्या आपल काम अतिशय मनापासून कित्येक वर्षे करीत आहेत. या बालसंख्या गावोगावी जावून अंगणवाडीमधील मुलांचा अभ्यास घेतात, त्यांना गाणी शिकवतात, गोष्टी सांगतात, त्यांच्याकडुन कवितांना चाली लावून घेतात, त्यांचे विवीध मैदानी व स्मरणशक्तीचे खेळ घेतात, त्यांना विविध विषयांवरची पुस्तक वाचायला देऊन अंत:र्मुख व्हायला लावतात, वैयक्तिक स्वच्छतेच्या व समाजात वावरण्याच्या चार गोष्टी सांगतात.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मात्र या बालसख्यांच्या कामाच स्वरुप थोडं वेगळ असतं. ४ ते १२ या वयोगटांमधील नापास झालेली किंवा वर ढकलण्यात आलेली मुले या बालसख्याकडे सोपवण्यात येतात. या सर्व मुलांचा क्रमिक अभ्यासक्रम घेऊन त्यांना परिक्षेत उत्तीर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जाते. सर्वात आधी या मुलांच्या मनातील परिक्षांबद्दलचा भितीचा बागुलबुवा प्रयत्नपूर्वक काढून टाकला जातो. मुलांना अतिशय रोचक व मनाला भिडतील अशा अभ्यास करण्याच्या युक्त्या सांगणे, स्वतः त्यांच्यासोबत बसून अगदी खेळीमेळीने त्यांचा अभ्यास करुन घेणे, अभ्यास झाल्यानंतर वेगवेगळया विषयांवरची रसदार पुस्तकं, रंजक गोष्टी, गाणी व कविता त्यांना वाचून दाखवणे, त्यांच्या छोटया छोटया निबंध, पाठांतर व वक्र्तृत्व स्पर्धा आयोजित करणे अशा अनेक उपक्रमाने परिपूर्ण असलेली ही ‘प्रथम’ ची शाळा सामान्य शाळेच्या आधी किवा नंतर २-३ तास घेतली जाते व या शाळेने मुलांना मानसिक व शैक्षणिक आधार देण्याबरोबरच अभ्यासाच्या संकल्पनाच त्यांच्यासाठी बदलून टाकल्या आहेत.

प्रथम ट्रस्टकडून या मुलांना अतिशय वेगवेगळया प्रकारचं साहित्य विनामुल्य उपलब्ध करुन दिलं जातं. या ट्रस्टने निर्माण केलेल्या पुस्तकांमध्ये अक्षरांबरोबरच रंगीबेरंगी चित्रे, फोटोज, व अभ्यासाशी संबंधित असलेल्या अनेक गंमतीदार उदाहरणांचा सामावेश असतो, ज्यामुळे ही पुस्तके मुलांच्या मनास भावतात, सारखी वाचावीशी वाटतात. त्यामुळे अभ्यास करणं हा या मुलांसाठी एक आल्हाददायक व सुखद अनुभव ठरतो. याशिवाय बालसख्या या मुलांशी वैयक्तिरित्या संवाद साधतात, त्यांची भिती दुर करतात, व त्यांच्याशी मित्रत्वाचं निर्माण करुन त्यांच्याकडुन अभ्यास करवून घेतात.
प्रथम ट्रस्टने अनेक सरकारी शाळांमध्ये फिरती वाचनालयेसुद्धा स्थापन केली आहेत. जिथे मुलांसाठी बडबडगीते, विनोदी, हलकी-फुलकी पुस्तके यांच्याबरोबरच त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावणारी वैचारिक पुस्तके, कांदबर्‍या, कला, क्रिडा, विज्ञान, अंकगणित, चालू घडामोडी, देशभक्तीवर, प्रवासवर्णने अशा अनेक प्रकारची पुस्तक साठवून ठेवली गेली आहेत. मुलांना सतत त्यांच्या आवडीची पुस्तके पुरवून त्यांची शब्दसंपदा वाढवली जाते व निरनिराळी शब्दकोडी घालून ही संपदा कागदावर दाखवण्याची त्यांना संधीसुध्दा दिली जाते. यामुळे मुलांच्या अभ्यासावर निश्चीतच चांगला परिणाम होतो.
‘प्रथम’ ने आपल्याच शिंपल्याआत राहणं पसंत करणार्‍या मुलांना खुलवून संपुर्ण सागरामध्ये मुक्त विहारण्याची व त्या सागराच्या तळाशी दडलेल्या अनेक रत्नांना वेचण्याची नामी संधी उपलब्ध करुन दिली आहे. या मुलांच्या आकलन, लेखन वाचन, पाठांतर, मनन व चितन या प्रक्रियांशी संबंधित अनेक समस्यांना व अडथळयांना दुर केले आहे व अभ्यास करण्याची त्यांची गती व क्षमता कित्येक पटींनी वाढवली आहे. अभ्यासाव्यतिकरक्त इथे अनेक इतर कला जोपासल्या जातात व मुलांना त्यांचे विचार व एखाद्या झर्‍याप्रमाणे खळखळणारी त्यांची निर्मळ स्वप्ने चित्रांद्वारे, संगीताद्वारे, किवा हस्तकलेद्वारे इतरांपुढे मांडता येतात.

गणित, विज्ञान व इंग्रजी या तीन विषयांवर इथे जास्त लक्ष केंद्रित केलं जातं, भारत नौदल सेनेचे सेवानिवृत्त प्रमुख श्रीरामदास व त्यांच्या पत्नी प्रथम ट्रस्टच्या संघटना उभारणीपासून ते विविध योजनांसाठी लागणारे भांडवल जमवण्यापर्यंत सर्व काम पाहत आहेत.

— अनिकेत जोशी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..