१९८२ ची गोष्ट आहे. माझा काॅलेजमधील मित्र प्रमोद संचेती याने जळगावला गेल्यानंतर मला दिलेले वचन पाळले. तो काॅलेज संपताना म्हणाला होता, मी जेव्हा व्यवसाय सुरु करेन त्याचं जाहिरातीचं काम मी तुलाच देईन. त्याने जळगावला गेल्यानंतर ‘पिंच’ नावाचं जिऱ्याच्या स्वादाचं पेय निर्मिती प्रकल्प सुरू केला. ‘पिंच’च्या जाहिराती, ब्लाॅक करून त्याला कुरीयरने पाठवले. त्याला सिनेमा थिएटरमध्ये दाखवण्यासाठी स्लाईड्स करुन हव्या होत्या. त्यासाठी ‘पिंच’ पिताना दाखविण्यासाठी एक माॅडेल आवश्यक होती.
त्यावेळी रमेश, व्ही. डी. वेलणकरांकडे काम करत होता. तेथील सुरूची हसबनीसच्या ओळखीने प्रतिभा हरिश्चंद्रेचा परिचय झाला. तिची फोटोसाठी तयारी होती.
एके दिवशी ती सदाशिव पेठेतील घरी आली. तिला फोटो कसे पाहिजेत ते सांगितलं. त्यासाठी स्पोर्ट्सच्या दुकानातून एक जर्किन खरेदी केलं. सहकार नगरमधील माझा मित्र, पराग वैद्यच्या काकांच्या बंगल्यावर प्रतिभा, तिची धाकटी बहीण विद्या व मी रिक्षाने गेलो. परागच्या काकूंनी वरचा हाॅल मोकळा करून दिला. मी ट्रान्सपरन्सीच्या रोलवर ‘पिंच’ पिताना प्रतिभाचे भरपूर फोटो काढले.
स्लाईड तयार झाल्यावर प्रमोदला पाठविल्या. संचेती कामावर खुष झाला. या कामामुळे प्रतिभा ही ‘नावडकर आर्टस्’ची पहिली माॅडेल ठरली.
एका रविवारी प्रतिभाचं फोटोसेशन करण्यासाठी मी तिला घेऊन कमला नेहरू पार्कमध्ये गेलो. तिथे काही फोटो काढल्यानंतर पुणे विद्यापीठात गेलो. तेथील बागेतील फुलांच्या पार्श्र्वभूमीवर भरपूर फोटो काढले. प्रतिभानं छान लुक दिल्यामुळे सर्वच फोटो अप्रतिम आले.
श्रीकृष्ण करमरकर यांच्या ‘अवनी’ दिवाळी अंकाचे काम आम्ही ८२ पासून करीत होतो. त्यांना दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठासाठी सुंदर चेहरा असलेल्या मुलीच्या फोटो हवा होता. त्यांना मी माझ्याकडील प्रतिभाचे फोटो दाखवले. त्यातील एक करमरकरांनी पसंत केला. तो दिवाळी अंक मार्केटमध्ये आकर्षक ठरला.
बाजीराव रोडला शिल्पा वाचनालय नावाची एक लायब्ररी आहे. जोशी बंधू ती चालवायचे. जोशी बंधूंशी माझी घनिष्ट मैत्री होती. जोशी प्रत्येक मासिक हाताळून खराब होऊ नये म्हणून त्याला जादा कव्हर लावायचे, त्या कव्हरचा खर्च काढण्यासाठी कव्हरवर पाठोपाठ जाहिराती छापायचे. त्या जाहिरातींची डिझाईन आम्ही करायचो. त्यांनी लायब्ररी बरोबरच काॅलेजच्या पुस्तकांची लायब्ररी सुरू केली. त्याच्या डिझाईनसाठी हातात पुस्तकं घेतलेल्या मुलीचा फोटो आवश्यक होता.
प्रतिभाला पुन्हा एकदा बोलावून घेतले. ‘गुणगौरव’च्या टेरेसवर तिचे फोटोसेशन केले. शिल्पा वाचनालयच्या जोशींना ती जाहिरात फार आवडली. खूप वर्षे ते कव्हर वापरले जात होते.
दादा कोंडकेंच्या ‘मला घेऊन चला’ चित्रपटात मंजुषा जोशी आणि इतर मुलींच्या ग्रुपमध्ये प्रतिभाने दादांबरोबर काम केले. तिला चंदेरी दुनियेचे विशेष आकर्षण होते.
प्रतिभा रेणुका स्वरुप शाळेमध्ये असल्यापासून हुशार होती. तिला एक मोठा भाऊ व धाकटी विद्या, शिक्षिका आई व वडील. ते रहायचे घोरपडे पेठेत. आम्ही दोघे कधी तिच्या घरी जात असू. काॅलेजनंतर प्रतिभाचं लग्न झाले. ती नगरला गेली. आई निवृत्त झाल्यानंतर धनकवडीच्या वरती आंबेगाव पठारावर भाऊ व विद्या रहायला आले. काही वर्षांनंतर तिचा भाऊ गेला. नंतर वडील गेले. विद्याचं लग्न झाले. तिला आम्ही सदाशिव पेठेत भेटायला जायचो.
प्रतिभाला दोन मुली व विद्याला दोन मुली. विद्याकडे गेल्यावर ती प्रतिभाशी फोन लावून देत असे. तिच्याशी बोलणं कमी आणि हसणंच जास्त व्हायचं. मोहन नगरला प्रतिभाकडे एक दोन वेळा गेलो होतो, गप्पा झाल्या. ती बडबडी आणि तिचे मिस्टर अबोल. इतक्या वर्षांत तिची तब्येत लठ्ठ झाली होती.
अलीकडे मी रोज लेखन करताना दोन दिवसांपासून तिच्यावर लिहायचा विचार करीत होतो, तर आज सकाळीच विद्याचा फोन आला. ‘ताई गेली, कालपासून काही तासांच्या अंतराने तीनवेळा हार्ट ॲटॅक आला. पहाटेचा तीव्र स्वरुपाचा होता.’ मी सुन्न झालो. माझ्या फोटोग्राफी कारकिर्दीतील पहिली माॅडेल, गेल्या अडतीस वर्षांपासूनची प्रतिभेची ‘प्रतिमा’ काळाआड गेली.
त्यानंतर एका खाद्य तेलाच्या डब्यावरील लेबलसाठी माॅडेल हवं होतं. मंजुषा जोशी ही नाटकांच्या डिझाईनच्या निमित्ताने परिचयाची होती. तिला विचारले, ती तयार झाली. पुन्हा एकदा पराग वैद्यच्या काकांच्या बंगल्यावर जाऊन फोटोसेशन केले. मंजुषाचे गॅस शेगडी समोरच्या हातात झारा घेतलेल्या फोटोंशिवाय इतरही सोलो फोटो काढले. सर्व फोटो छान आले. आज त्याच मंजुषाने सिने-नाट्य सृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अलका ॲडव्हर्टायझिंगचे काम करताना एका जाहिरातीत अंगणात रांगोळी काढणाऱ्या स्त्रीचा फोटो आवश्यक होता. त्यासाठी सिने अभिनेत्री रजनी चव्हाणशी संपर्क साधला. तिचा असिस्टंट गुरव यांच्यासह आम्ही तिघेही रिक्षाने वैद्यच्या बंगल्यावर गेलो. फोटोसेशन केले. जाहिरात अतिशय छान झाली. वर्तमानपत्रात ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
या सुमारे अडतीस वर्षांच्या कालावधीत जाहिरातींसाठी या तीनच माॅडेलचे मी फोटो काढले. बाकी नाटकांसाठी, चित्रपटांसाठी भरपूर फोटो काढले… तरीही पहिली प्रतिमा आता अनंतात ‘आऊट ऑफ फोकस’ झालेली आहे…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२३-९-२०.
Leave a Reply