

थोडक्यात काय तर स्वतःवर प्रेम करायला शिका… पण मग त्यासाठी आरशात कशाला बघायला हवं?
आपण कसे दिसतो हे बघायला? पण आपण कसे दिसतो हे बघून आपण आपल्यावरच प्रेम करतो का? मला तरी नाही वाटत तसं….
पण झालं असं की आता जेव्हा जेव्हा मी आरशात बघते तेव्हा प्रत्येक वेळी मला तो संदेश आठवतो ; आणि मग मी जरा जास्तच न्याहाळून बघते माझं आरशातलं प्रतिबिंब … आणि गंमत म्हणजे कितीही वेळा बघितलं तरी कंटाळा नाही येत !
अशाच एका whatsapp संतांनी अजून एक पोस्ट पाठवली… त्यानुसार आपण जसे असतो त्यापेक्षा पाच पटींनी जास्त सुंदर प्रतिबिंब दिसतं आरशात ! हे वाचल्यामुळे स्वतःबद्दल, स्वतःच्या प्रतिबिंबाबद्दल थोडी शंका ही आली मनात….
या सगळ्या पार्श्वभूमीवर एका सकाळी आरशासमोर उभी असताना माझी नजर माझ्या चेहेऱ्याचा आजूबाजूला दिसणाऱ्या आरशावर गेली आणि मनात विचार आला…. सकाळी सकाळी माझं आरशात दिसणारं रुपडं बघून मी खुश होते, माझा दिवस चांगला जातो…. पण हा आरसा ? त्याचं काय होत असेल? म्हणजे त्यालाही वाटत असेल का – सकाळी उठून माझा चेहेरा बघावा असं? जर त्याला तेव्हा समोर दिसणारं दृश्य आवडत नसेल तर? मला बघितल्यानंतर जर त्याचा दिवस वाईट जात असेल तर?
पण त्याला जरी काहीही वाटत असलं तरी त्याच्याकडे काही पर्याय नाहीये…. त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक वस्तूचं प्रतिबिंब दाखवण्या शिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये.…. त्याचं एकच काम आहे… त्याच्या समोर जे काही असेल त्याला पाचपटीनी सुंदर करून त्याचं प्रतिबिंब दाखवायचं… आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे – हे करत असताना स्वतः त्यापासून अलिप्त राहायचं ! त्या वाढवून दाखवलेल्या प्रतिबिंबात स्वतःचं काहीच मिसळायचं नाही…. आणि त्याहूनही कमालीची गोष्ट म्हणजे – आपण स्वतः नेहेमी स्वच्छ राहायचं… त्या प्रतिबिंबाचा कोणताही गुण किंवा अवगुण स्वतःला चिकटू न देता !!!
जेव्हापासून ही जाणीव झालीये ना; तेव्हापासून आरशासमोर उभी राहिले की मला फक्त आरसाच दिसतो…. माझ्या प्रतिबिंबपेक्षा कितीतरी पटींनी सुंदर आणि स्वच्छ !!!
–प्रिया जोशी
हैदराबाद
२८.१२.२०२०
Leave a Reply