आता माझ्या मनात मानवी प्रतिकृती निर्माण करावी असे विचार येऊ लागले. जोपर्यंत उंदीर, सशांवर भागत होतं, तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण एखादा माणूस निर्माण करायचा ही फार गंभीर, धोकादायक आणि अवघड, जवळजवळ अशक्यप्रायच गोष्ट होती. यासाठी मला कुणीतरी विश्वासू मदतनीस लागणार होता. माझ्या शोधाची घरातच काय पण इतरत्रही कुणाला माहिती नव्हती. एक वेडा शास्त्रज्ञ म्हणून कुणी माझ्याकडे फार लक्ष देत नसे. घरचं गडगंज असल्यामुळे उदरनिर्वाहाची काहीच चिंता नव्हती. मी घरी आहे याचंच आईला कौतुक होतं. जिवावरच्या दुखण्यातून ती उठली होती आणि आता माझा मुलगा, म्हणजे तिच्या नातवात ती दंग होती.
माझं संशोधन विद्यापीठाकडे पाठवून द्यावं असा विचार मी करू लागलो. कारण मानवी जीवनावर मुलभूत परिणाम करू शकणाऱ्या या क्रांतिकारक संशोधनास प्रतिष्ठा आणि मान्यता मिळवणं हे मला एकट्याला अशक्यच होतं. त्यामुळे तशी तयारीही मी सुरू केली आणि एक दिवस माझी मानवी प्रतिकृतीची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याची संधी मला दिसली!
माझा मोठा भाऊ आमदार होता आणि त्याच्याच पक्षाचं सरकार सत्तेवर होतं. मला त्या गोष्टीत फारसा गंध किंवा स्वारस्य नव्हतं, पण एकदा जेवणाच्या वेळी तो जरा चिंताक्रातं दिसला. सहसा मी घरी जेवत नसे. माझं जेवणखाण प्रयोगशाळेत होत असे आणि माझी बायको ते स्वतः आणून देत असे. इतर सर्वाना मी बंदी केली होती, पण माझा प्रयोग यशस्वी झाला आणि मी थोडा मोकळा झालो. आता मधून मधून जेवायला घरातही यायला लागलो होतो.
तर जेवताना दादा चिंताक्रांत दिसला म्हणून त्याला विचारलं, “काय रे, काय समस्या आहे? असा चिंताग्रस्त का दिसतोस?”
तो म्हणाला, “बाजी, आमचं सरकार गडगडणार असा रंग दिसतोय. मला मंत्री व्हायची संधी आहे पण तोपर्यंत हे सरकार तर टिकलं पाहिजे!”
“म्हणजे काय, मला नाही समजलं दादा.” मी म्हणालो. राजकारणाच्या गोष्ट मी फारशा विचारत नसे. खरंतर माझ्या संशोधनाव्यतिरिक्त आजूबाजूला काय घडामोडी चालल्या आहेत त्यांचा मला गंधच नसे. मी जगापासून अलिप्तच होतो म्हणा ना!
दादा म्हणाला, “बाजी, आमचे आमदार फोडून विरोधी पक्ष विश्वासदर्शक ठरावामध्ये आम्हाला पाडणार आणि नवीन सरकार येणार असा रंग दिसत आहे. एका आमदारासाठी आमची संख्या कमी पडेल असं वाटतं. एक आमदार ऐन मतदानाच्या वेळी गायब होईल अशी शंका आहे किंवा त्याला पळवून तरी नेलं जाईल असं वातावरण आहे. तो जर पळाला तर मग आम्ही संपलो.’
“तो जर मतदानापुरता मिळाला तर तुमचं काम होईल का?” मी विचारलं.
दादा माझ्याकडे आश्चर्याने पाहायला लागला. मी भ्रमिष्ट आहे अशीच सगळ्यांची समजूत! पण मी इतका पोचलो असेन असं त्याला वाटलं नव्हतं.
“बाजी तू काय बोलतोस हे कळतंय का तुला? एखादा आमदार पळवून नेला तर ऐनवेळी काय त्याचं भूत उभं करायचं का मतदानाला? त्या उंदीरसशांच्या सहवासात तू वेडा झाला आहेस वेडा! उगाच काहीतरी बरळू नकोस. या राजकारणाच्या गोष्टी तुला नाही समजायच्या. गप जेव!” मी हसलो. “दादा, त्या आमदाराचं भूत मिळालं तर चालेल तुला?” एकदम चटका बसल्यासारखा तो म्हणाला, “बाज्या काय वेडबिड लागलंय का काय तुला? का माझी चेष्टा करतोयस?”
आम्ही दोघंच डायनिंग टेबलावर होतो म्हणून बरं झालं.
“दादा आज संध्याकाळी माझ्या प्रयोगशाळेत ये, मग दाखवतो तुला एक गंमत!”
संध्याकाळी तो आल्यावर मी त्याच्या डोळ्यांसमोर छोट्या कुपीत रक्ताचा थेंब टाकला आणि त्या थेंबातून सूक्ष्म प्रतिकृती निर्माण होताच ती मोठ्या कुपीत टाकली. प्रथम हळूहळू उंदराचे पाय तयार झाले. वरवर वाढत तासाभराने संपूर्ण उंदीर झाला! कुपीचं तोंड उघडताच तो बाहेर पडला, तुरुतुरु धावला आणि थोड्याच वेळानंतर जसा निर्माण झाला तसा डोक्याकडून पायाकडे अदृश्य होत होत शेवटी टेबलावर फक्त एक रक्ताचा थेंब उरला. हे सगळं पाहून दादाला भोवळ आली आणि तो खुर्चीतच निपचित पडला. थोड्या वेळाने भानावर आल्यावर तो माझ्याकडे डोळे फाडफाडून पाहायला लागला.
“काय दादा, कसं होतं भूत?” मी.
“बाज्या, अजब चमत्कार केलास! अरे, पण हा उंदीर होतो माणूस नाही आणि माणूस केलास तयार अन् भर सभागृहात बारीक बारीक होऊन त्याचा रक्ताचा थेंब झाला तर लोक मला जिवंत ठेवतील का? भयंकर अगदी भयंकर प्रकार! नाही बाज्या, हे भूत मला परवडण्यासारखं नाही!”
“अरे दादा, ऐकून तर घे, अरे, हा तुला एक नमुना दाखवला. असे उंदीर आठ-आठ, दहा-दहा दिवसच काय, जास्त दिवसही जिवंत राहतात. तो पाहा, त्या पिंजऱ्यातला उंदीर! तो महिनाभर जिवंत आहे आणि त्याच्याच शेजारी तो ससा आहे ना तो पण महिन्याचा झाला.
-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ’ या कथासंग्रहातून)
Leave a Reply