दादाचा विश्वासच बसेना. ती त्याला संशोधनाची माहिती सांगितली. आता मी प्राणी किंवा माणूस एक दिवसापासून एक वर्षापर्यंत जिवंत ठेवू शकतो इतकी प्रगती केली आहे हेही सांगितलं. त्याला हे पण स्पष्ट केलं की हे अत्यंत गुप्त संशोधन आहे आणि याची वाच्यता कुठेही करू नकोस. नंतर घरातल्या देवासमोर बेलभंडारा उचलून मी त्याच्याकडून गुप्ततेची शपथ वाहून घेतली.
एवढं होऊनही तो तयार होईना. मी त्याला खूप धीर दिला आणि माझी योजना समजावून सांगितली आणि मी सांगेन तसं केलं तर ही गोष्ट कुणालाही कधीच कळणार नाही अशी खात्रीही दिली. शेवटी एकदाचा तो तयार झाला. त्यानंतरही दोन-चार दिवस तो अस्वस्थच दिसत होता. बहुतेक त्याला रात्री झोपही येत नसावी. पण जसजशी विश्वासदर्शक ठरावाची तारीख जवळ येऊ लागली तसंतसं त्याचं मन तयार होऊ लागलं!
तो संध्याकाळी माझ्या प्रयोगशाळेत आला. मी त्याला मानवी प्रतिकृतीसाठी केलेली कुपी दाखवली. ती बघूनच तो थरथरायलाच लागला. मी म्हणालो, “अरे, ही नुसती पेटीच तर आहे. त्याला काय घाबरतोस? ये बस इथे!” एका खुर्चीकडे बोट दाखवून मी म्हणालो.
तो बसला. त्याला दरदरून घाम फुटला होता. मग मी त्याला सगळ्या प्रयोगाची माहिती दिली आणि ज्या माणसाची प्रतिकृती, जिवंत प्रतिकृती बनवायची, त्याचं रक्त कसं मिळवायचं याचा आम्ही विचार करू लागलो.
दादा म्हणाला, “बाज्या नक्की कोण फुटणार हे आजच सांगता येणार नाही. कारण तीन-चार जणांवर संशय आहे. त्याच्यातला कुणीही फुटू शकतो. अजूनही दादा हा प्रयोग टाळायचा प्रयत्न करत होता, पण मीही आता ही संधी सोडायची नाही असं पक्क ठरवलं होतं. माझी योजना शंभर टक्के यशस्वी होणार याची मला पूर्ण खात्री होती कारण माझं संशोधन परिपूर्ण आहे यावर माझा विश्वास होता. थोड्या चर्चेनंतर मी त्याला एक कल्पना सूचवली.
“दादा, अरे तुमच्या पक्षाच्या वतीने एखादं रक्तदान शिबीर घ्या. त्यात त्या तीनचार संशयित आमदारांना बोलवा. त्यांच्या रक्ताचा एकेक थेंब मला पुरे होईल!”
“हां, ही छान कल्पना आहे. हे मी करतो. पण बाज्या, मला फार काळजी वाटते रे. जर काही फसलं ना, तर काय होईल याच्या नुसत्या विचारानेच माझी झोप पार उडाली गड्या!”
मी त्याला धीर दिला. दुसऱ्याच दिवशी दादाने रक्तदान शिबीर घेतलं आणि त्या चार आमदारांच्या रक्ताचं सँपल मी नावनिशीवार प्रयोगशाळेत जपून ठेवलं.
माझ्या अंदाजाप्रमाणे मानवी प्रतिकृतीसाठी मला फक्त सहा तासांचा अवधी हवा होता.
मतदानाचा दिवस आला आणि आदल्या दिवशीच एक आमदार गायब झाला. खूप शोधूनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. सरकार पक्षात दाणादाण उडाली. आमदारांच्या, मंत्र्याच्या गाठीभेटींना उत आला. वर्तमानपत्रांनी तर सरकार कोसळणार असे मळथेच बातम्यांना दिले!
ठरल्याप्रमाणे दादाने मुख्यमंत्र्याची भेट घेतली आणि “काय वाट्टेल ते झालं तरी मी गायब आमदाराला मतदानाच्या वेळी हजर करतो. तुम्ही बिलकुल काळजी करू नका.” असं आश्वासन दिलं. त्यांचा विश्वासच बसेना. त्यांना तर शंका आली की दादाच तर या नाटकात सामील नाही?’
तरीही ते म्हणाले, “थोरात, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हे सरकार तरलं तर तुम्हाला कॅबिनेट मंत्रीपद निश्चित!”
मतदानाच्या आदल्या रात्री मी आणि दादा प्रयोगशाळेत गेलो. उद्या सकाळी अकरा वाजता मतदान म्हणजे पहाटे पाच वाजेपर्यंत आमदार तयार व्हायला हवा होता! माझ्याकडे मुबलक वेळ होता. पहाटे पाचनंतर आमदारसाहेबांना घेऊन दादाने थेट अकरा वाजता विधानभवन गाठायचं असा आमचा बेत ठरला!
मानवी प्रतिकृतीचा हा माझा पहिलाच प्रयोग होता. कितीही खात्री असली तरी प्रयोगच तो! मनातून मी थोडा धास्तावलो होतो हे खरं. दादाही अत्यंत बेचैन झाला होता. यातून काही भलतंच घडलं तर त्याची सर्व राजकीय कारकीर्द संपणार होती.
बरोब्बर रात्री दहा वाजता आमचा प्रयोग सुरू झाला. रक्ताच्या सँपलवरचं नाव आणि गायब आमदाराचं नाव यांची आम्ही पुन्हा पुन्हा तपासणी केली आणि रक्ताचा एक थेंब मी कुपीत सोडला! मी सूक्ष्मदर्शकातून पाहत होतो. सूक्ष्म प्रतिकृती सूक्ष्मदर्शकातून अंगठ्याएवढी दिसायला लागल्यावर मी दादाला म्हणालो, “दादा, तू बघ!” त्याने सूक्ष्मदर्शकाला डोळा लावला. मात्र तो आनंदाने ओरडायलाच लागला, “बाज्या, अरे हाच रे तो पळालेला आमदार! याऽऽहूऽ!” दादाने मला घट्ट मिठी मारली. छोटा आमदार एका कॅपसूलमध्ये बंदिस्त होता.
त्याला मी अगलदपणे मोठ्या कुपीतल्या कॅपसूलमध्ये सोडलं. कुपी काळजीपूर्वक सील केली आणि आम्ही दोघं कुपीच्या समोर दोन खुर्च्यांवर बसलो. डोळ्यांची पापणीही न हलवता! जणू आमच्यावर कुणी मोहिनी मंत्र टाकला होता अशा त-हेने आम्ही एकटक कुपीकडे पाहत होतो.
-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ ’ या कथासंग्रहातून)
Leave a Reply