एक तरुण लहानपणापासून मातीशी खेळण्यात मश्गुल असायचा. तो संवेदनशील, रागीट पण हुशार होता. काम करताना उपमर्द झाला तर तो तात्काळ प्रतिक्रिया द्यायचा आणि इतरांना अशावेळी हातभर दूर ठेवायचा.
एके दिवशी संतप्त होऊन आणि चेहेऱ्यावर स्पष्ट दिसेल असा ताण घेऊन तो त्याच्या मित्राकडे गेला- कारण होतं वरिष्ठांचे त्याच्याशी असंवेदनशील वागणे ! हा मित्र त्याचा प्रशिक्षक होता.
शांतपणे ऐकून घेत मित्राने त्याच्या हातात मातीचा एक गोळा दिला आणि म्हणाला- ” मला तुझी सर्जनशीलता बघायचीय. मला या मातीच्या गोळ्यातून एक सुंदरशी फुलदाणी करून दाखव बरं ! ”
तरुणाला हा प्रशिक्षणाचा भाग वाटला. उत्साहाने तो कामात गढून गेला. कदाचित यामुळे आपल्या रागावर काबू मिळायला मदत होईल असे त्याला वाटले असावे. त्याने एक सुंदर,सुबक फुलदाणी तयार केली आणि भट्टीत वाळण्यासाठी ठेवली.
दुसऱ्या दिवशी फुलदाणी घेऊन तो मित्राला दाखविण्यासाठी गेला, त्यावेळी त्याच्या चेहेऱ्यावर आदल्या दिवशीच्या रागाचा लवलेशही नव्हता. मित्राने मंद हसत त्याच्या हातात हातोडी दिली.
” फोड ही फुलदाणी” त्याने सांगितले.
बावचळून प्रतिवाद करीत तरुण म्हणाला- ” पण अशाने ही सुंदर, नाजूक फुलदाणी तुटेल नं ! ”
मित्राने आपला आग्रह सोडला नाही.
वैतागून तरुणाने हातोडी त्याच्या हातून हिसकावत फुलदाणीवर आघात केला. ती क्षणार्धात चक्काचूर झाली.
” बघ, माझे कालचे सगळे प्रयत्न वाया गेले तुझ्यामुळे.” तो रागावून म्हणाला.
मित्र शांतपणे दुसऱ्या खोलीत गेला आणि त्याने आणखी एक मातीचा गोळा आणून तरुणाच्या समोर ठेवला.
” मी दुसरी फुलदाणी तयार करून पुन्हा वेळ वाया घालवावा अशी तुझी इच्छा दिसतेय.” यावेळी त्याच्या स्वरातून थोडासा उद्धटपणा डोकावला.
मित्राने सहृदयपणे त्याच्या कडे पाहिले आणि म्हणाला- ” आता या मातीच्या गोळ्यावर हातोडीने प्रहार कर.”
“आनंदाने ” म्हणत तो यावेळी पुढे सरसावला.
सर्वशक्तीनिशी त्याने हातोडी मातीच्या गोळ्यावर मारली. एक भलीथोरली भेग उमटली होती.
” खूष ? झालं समाधान? ” त्याने स्वरात जाणवेल इतपत आणलेला तिरस्कार मित्राला कळला नसेल तर नवल!
” काय साध्य झालं ? क्षणभराने त्याने विचारलं. पण आता आवाजात कुतूहल डोकावत होतं.
मित्राने हळुवार हातांनी खाली विखुरलेले फुलदाणीचे तुकडे गोळा करीत त्या तरुणासमोर धरले.
” दिसतेय का आता एकसंध फुलदाणी तुला? ही तुझ्या हृदयासारखी आहे. आपल्याला वाटत असतं – आयुष्यातील नैराश्याला सामोरे जाण्यासाठी असे कडक/ कठोर असावे लागते. अशावेळी राग,कडवटपणा, वैफल्य अशा भावना उफाळून येतात. खरंतर अशी आघातांची प्रतिकूलता आपल्याला विखरून टाकते.
मित्राने मग मातीचा गोळा हाती धरला. त्यांवर एक भेग होती पण अन्यथा तो अभंग होता.
” मनाला मृदू कर, सहृदय हो या चिकणमातीसारखा ! आघात झाला तरी माती घट्ट, एकजीव राहते. मृदू हृदय कायम माफ करीत असते, प्रेम करीत असते आणि शक्यतो विरोध करीत नसते. मातीला वेदना जाणवल्या तरी ती मोडत नाही. ”
तरुणाला काहीसे पटले आणि त्याने मान डोलावली. पण तो पूर्णपणे कन्व्हिन्स झाल्यासारखा वाटत नव्हता.
मित्राने कारुण्याने त्या तरुणाकडे बघितले आणि म्हणाला- ” बदलाला सामोरे जाण्याचे धैर्य तुला लाभो, हीच प्रार्थना ! ”
पण स्वतःला एकदा विचार-
१) तुझं हृदय इतकं कठोर आहे का की एखाद्या घावाने ते चक्काचूर होईल?
२) बाह्य घटकांचा आवश्यकतेपेक्षा अधिक प्रभाव तुझ्यावर पडतो का?
३) मग आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तुझी भविष्यातील रणनीती काय असेल
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply