
मुंबई शहरात पळणाऱ्या सार्वजनिक बस एस्टीचे चालक, वाहक हे सदैव आपल्या मुजोरीत असतात. एखाद्या प्रवाशाला उतरायला उशीर झाला की वसकन त्याच्या अंगावर येणे, तिकीट देताना पैसे घेताना गुरकावून बोलणे, बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाने पहिल्या पायरीवर पाय ठेवेपर्यंत, घंटा वाजवून बस सोडणे, स्टॉपवर बस न थांबवता, पुढे उभी करणे, बारीकसारीक कारणांवरून वाद घालणे, ज्येष्ठ नागरिकांच्या जागेवर कुणी तरुण प्रवासी बसलेला असेल आणि ज्येष्ठ प्रवासी उभे असले, तरी त्याच्याशी आपला काहीही संबंध नसल्यासारखे वागणे या गोष्टी आपण नित्यनेमाने पहात असतो.
अगदी क्वचित प्रसंगी मात्र खूप चांगला, सुखावणारा अनुभव येऊन जातो. त्या दिवशी असच झालं, मी बोरीवलीहून ठाण्याला जाणारी TMT ची वातानुकूलित बस पकडली. आत येऊन तोल सांभाळत पैसे काढण्यासाठी मी खिशात हात घालताच, कंडक्टरने अगदी आपलेपणाने मला आधी बसून घ्यायला सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला उठवून मला बसायला जागा दिली. बरं, मी ज्येष्ठ म्हणून माझ्याशी तो चांगला वागत होता असंही नाही, तर प्रत्येक प्रवाशाशी तो तितक्याच आपलेपणाने बोलत होता. हे सगळं पाहून मला भरूनच येत होतं. तिकीट ठाणे सांगितल्यावर त्याने विचारलं, “ठाण्याला कुठे जायचंय तुम्हाला ?” मी ठिकाण सांगितल्यावर तो म्हणाला, की अमुक स्टॉपवर उतरा म्हणजे तुम्हाला अधिक जवळ पडेल. अर्थात मला काही हा प्रवास अनोळखी नव्हता, तरीही त्याच्या आपुलकीने भरून येत होतं. तसं पाहिलं तर मी कुठे उतरावं आणि उतरल्यावर कसं जावं या सगळ्यांशी त्याचं काहीही देणं घेणं असण्याची गरज नव्हती. पण आपलेपणा, चांगुलपणा, प्रवाशांशी व्यवहार कसा असावा हे प्रशिक्षण देऊन येत नसावं तो अंगभूतच असावा लागतो.
मी तिकीट काढून व्यवस्थित स्थानापन्न झालो. दहिसर टोलनाका पार करून बस काशिमीराला थांबली. एक व्यक्ती रिक्षातून उतरता उतरता बसला हात दाखवत होती. बस थांबली, दरवाजे उघडले, पण रिक्षावाल्याकडे मोड नव्हती. आम्ही आतून हे पहात होतो. मी मनात म्हटलं आता दरवाजा बंद करून आणि खाडकन एक्सलेटर टाकून हा बस पुढे नेणार. पण दृष्टीला पडलं ते भलतंच.
ड्रायव्हरने आपल्या खिशातून सुटे पैसे काढले आणि त्या व्यक्तीला म्हटलं, “हे घ्या, आधी द्या त्याला.”
मी थक्क होऊन पहात होतो. त्या व्यक्तीने रिक्षाचे पैसे चुकते केले आणि तो बसमध्ये चढला. ड्रायव्हर हसून म्हणाला, “आधी बसून घ्या, तिकीट काढा, मग सावकाश द्या माझे पैसे.” अर्थात उतरण्यापूर्वी त्याने पैसे दिले वगैरे सगळं झालं. मी विचार करू लागलो, खरंच हे काय आहे ? हा यांच्या प्रशिक्षणातून आलेला व्यावसायिक भाग आहे, की ही मुळातच चांगली माणसं आहेत ? कारण याआधीही एक दोन वेळा या रुटवर मला असाच चांगला अनुभव आला होता.
सगळ्या प्रवाशांना तिकीट दिल्यावर ड्रायव्हर कंडक्टरच्या गप्पा सुरू झाल्या, त्या ही अध्यात्मावर. माझी सीट ड्रायव्हरच्या मागचीच असल्याने मी त्यांचं बोलणं छान enjoy करत होतो. मनात आलं, काय लागतं चांगलं बोलायला चांगलं वागायला ?. संबंध तरी किती ? तर तिकीट देण्यापुरता आणि बसचं दार उघडून आत घेण्यापुरता. पाऊण एक तासात ते त्यांच्या आपण आपल्या वाटेला लागणार. पण तेव्हढ्या वेळात चांगलं वागणं आणि बोलणं यामधून एकमेकांशी जोडलं जाणं, हे खरंच किती छान आहे. इतकं प्रत्येकाला समजून चुकलं तर जीवन किती सुंदर होऊन जाईल.
त्या गीतात म्हटलंय तसं, “हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे – माणसाने माणसाशी माणसापरी वागणे.” इतकं जरी घडून आलं तरी,
“हृदया हृदय एक जाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले” हा भाव सर्वत्र दाटून येईल.
माझ्या स्टॉपवर उतरताना, दोघांचाही अगदी प्रेमाने निरोप घेतला, आणि खूप समाधानाने वाटेला लागलो. क्वचित असं सुखावणारं काही अनुभवायला मिळतं आणि, अजूनही आशेला जागा आहे हे मनापासून जाणवायला लागतं.
प्रासादिक म्हणे
-प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply