प्रवासाचा टप्पा फार मोठा असतो. त्यामुळे तो टप्या टप्प्याने करावा लागतो. पहिला प्रवास सुरू होतो आपल्या जन्माला येणे. कुठे. कुणाकडे. कशासाठी. वगैरे काहीच माहिती नसते. आता प्रवास म्हटला की तयारी आलीच. मात्र या वेळी आपण काहीच करायचे नसते. सगळे धावपळ करतात. तयारीही तेच करतात. आलो जगात की आपले स्वागत. खर तर या पूर्वीही स्वागताचा कार्यक्रम झालेला असतो पण आपण तिथे प्रत्यक्ष नसतो. पण आता सगळे आंनदात असतात. आपण केंद्र स्थानी म्हणून कौतुक. एक सारखे आपल्या भोवतीच असतात. नामकरण झाले की या नावाने जगातील प्रवासाला सुरुवात होते. एकेक प्रश्नांची उत्तरे सापडतात. अनेक अनुभवानी दुनियादारी समजते.
शाळेला सुट्टी लागली की मामाच्या गावाला जायचे. या प्रवासात आज्जी आजोबा यांची माया. मामामामीचे प्रेम. भावंडांचा सहवास. मस्त असते. पण परत येतांना जड जाते. जातानाचा आनंद उत्साह नसतो. मग अनेक कारणांमुळे आईबाबा बरोबर. देवदर्शन. लग्न कार्य. किंवा सहल या प्रवासात आणि शाळेची सहल यात आपण भोपळ्यात बी खुशाल असे असतो. आपली सोय घरचे किंवा शिक्षक करतात. मुले मुली शिकायला बाहेर गावी जातात. हा प्रवास मात्र एकट्याने करावयाचा असतो. तयारी करताना आपल्याला जबाबदारीने वागावे लागते. तिथे काय. कसे असेल याचा अंदाज नसतो. कधी चांगले तर कधी वाईट अनुभव येतात. आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी हा प्रवास फारच महत्वाचा असतो. मुलींना या नतंर सासरी जाण्याची प्रवासाची सुरुवात करावी लागते. या वेळी तिच्या मनातील विचार. भावना. स्वप्न आणि बरेच काही याचा हलकल्लोळ असतो. प्रत्यक्षात निघतानाच्या भावना. एक अंक संपवून दुसर्या अंकातील अनेक भूमिका पार पाडावी लागतात. इथेही कधी कधी खूप चांगला तर कधी कधी वाईट अनुभव येतात.
सगळे काही निभावून नेले. सुखाचा संसार केला. जबाबदारीतून मुक्त झाल्यावर. प्रवासात दोघेच किंवा मुलासोबत रहावे लागते. ईथे ही अनेक बाबी असतात. आणि मग वानप्रस्थाश्रम सुरू होतो. आणि शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असेल तर चारी धाम प्रवास केला जातो. कधी कधी परदेशात जावे लागते. तेथील संस्कृती. धर्म. भाषा. हवामान अन्न पाणी सगळेच एकदम वेगळे. नको वाटते. पण मुलांच्या सहवासाची ओढ असते म्हणून तेवढ्याच आनंदासाठी सगळे जुळवून घेतले जाते. आता प्रवास सुरू होतो तो शेवटचा. इथे कसलीच पूर्व तयारी वगैरे काहीच करायचे नसते. बरोबर काहीही न्यायचे नसते. कुणाला अचानक जावे लागते तर कुणी तिकिट काढून बसलेले असतात. आरक्षण झाले आहे. फक्त गाडी यायची आहे. त्यामुळे रिकाम्या हाताने आलो तसेच जायचे आहे. फक्त एक गोष्ट मात्र नक्की की. जाण्यापूर्वी प्रामाणिक पणे सगळे काही स्विकारावे लागते. देवाच्या घरी जातानाही हसतमुखाने गेलो तर त्यालाही बर वाटत असेल नाही का?
धन्यवाद.
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply