२१ ऑगस्ट २००९ ची संध्याकाळ. युरोप दूर वर असताना ‘पिसाचा मनोरा’ फ्लॉरेन्स चे सौंदर्य मनात साठवत असतानाच आम्ही City of Water म्हणून प्रसिद्ध असलेल्या इटलीतील व्हेनिस शहरात जाऊन पोचलो. नजरेला पहिल भिडलं, ते म्हणजे निळशार पाणी, निळं आकाश आणि कॅनलच्या दोन्ही बाजूला गोथिक, रोमन आर्कीटेक्चर विविध रंगांची घरं. मन एकदम प्रफुल्लित झालं.
व्हेनिसमध्ये The Highest Bell Tower, तिथलं प्रसिद्ध म्युझिअम व्हेनिसमध्ये पाहिल्यानंतर ‘पियाझा सान मार्को’ हया जगप्रसिद्ध असलेल्या प्रचंड मोठया Square अर्थात चौकात आम्ही गेलो. वास्तुशास्त्र, कला आणि त्याचबरोबर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक तिथे आले होते. ठिकठिकाणी वाद्यवृंद मनोरंजन करीत होते. सर्वांचा आनंद अगदी शिगेस पोचला होता.
पण मला प्रबळ इच्छा आणि उत्सुकता होती ती व्हेनिस मधल्या सुप्रसिद्ध ‘गोंदोला’ बोटीतून फेरफटका मारायची. प्रत्यक्ष नजरेने तिथल्या ‘गोंदोला’ बोटी पाहून द ग्रेट गॅमब्लर चिटपटातील अमिताथ बच्चन-झिनत अमानच्या ‘दो लब्जों की है दिल की कहानी’ हया गाण्यातील दृष्येच डोळयासमोर तरळली.
रीआत्तो ब्रीजजवळ असलेल्या Stand जवळ आम्ही गोंदोलो बोटीचे तिकीट बुक केले आणि प्रवेशाच्या (Entry) ओळीत जाऊन उभे राहिलो. एका वेळी ८-१० जणांना सामावून घेत होते. माझा नंबर आला. तेव्हा मला एकटीलाच बोलाविले व मिस्टर गोखल्यांना नंतरच्या फेरीतून येण्यास सांगितले. त्याबरोबर मी बोटीत न चढता हयांच्याबरोबर जाण्यासाठी काठावरच थांबले. मन थोडं खट्टू झालं.
आजूबाजूचं सौंदर्य नजरेने टिपत असताना काही मिनिटातच एकदम आरडाओरडा ऐकायला आला. समोर बघितलं तर मी सोडून दिलेली ‘गोंदोलो बोट’ पाण्यात पूर्णपणे उलटली होती. सर्वजण गंटागळया खात होते. जीवाच्या आकांताने ओरडत होते. लहान मुलं जोरजोराने रडायला लागली होती. त्या बोटीत अमेरिकेतून ५,६ स्त्रीया टूरसाठी आलेल्या होत्या. त्यांच्या डोक्यावरील हॅटस्, पासपोर्ट, पैसे आणि मौल्यवान वस्तू असलेल्या पर्सेस, हॅन्डबॅग्ज पाण्यावर अस्ताव्यस्त तरंगायला लागल्या होत्या आणि त्यांत भर म्हणजे काठावरील लोकांनी सुद्धा मोठया आवाजात त्यांना सूचना द्यायला सुरुवात केली. सगळीकडे हलकल्लोळ माजला. रंगाचा बेरंग झाला. उत्साह सोडाच एकदम गोंधळाच, अस्वस्थतेचं, तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
सर्वजण आक्रोश करताच तिथल्या ५,६ expert तटरक्षकांनी क्षर्णाधात पाण्यात उडया मारल्या. एक एक पर्यटकाला बाहेर काढीत असताना माझ्या छातीत नुसतं धडधडत होतं. तटरक्षकांनी त्यांच्या तरंगणाऱ्या सर्व वस्तू एकत्र गोळा करुन सुद्धा आणल्या.
ही सर्व परिस्थिती पाहून मी नुसती थरथर कापत होते. भितीने माझ्या अंगावर काटा उभा राहिला. पोटात गोळा उठला. मी मिस्टरांशिवाय एकटीच गेले असते, तर ? काय अनर्थ घडला असता ? क्षणार्धात हजारो विचारांचे काहूर मनात दाटून आले.
आणि…. १ तास असाच गेला. पण मी मात्र गोंदोला बोटीत बसण्यास नकार दिला. क्रुझचे तिकीट काढून फेरीचा आनंद लुटला.
इंग्रजीतील Blessings in disguise म्हणीप्रमाणे हेच खरं !
— सौ. वासंती गोखले
Leave a Reply