नवीन लेखन...

ठाणे शहराचे स्वातंत्र्यपूर्व साहित्यिक योगदान 

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला चांगदेव काळे यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.


या विषयावर लेखन करताना सगळ्यात मोठी अडचण आली. जन्म स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४७ पूर्वी झाला आहे आणि त्यांचे साहित्यही त्याच काळात प्रसिद्ध झालेले आहे असा एक गट आणि ज्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला, परंतु त्यांचे साहित्य १९४७ नंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर प्रकाशित झाले, हा दुसरा गट. या दोघांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करताना बरीच साहित्यिक मंडळी दिवंगत झालेली आढळली. त्यामुळे त्यांच्याशी नाते जोडायचे, इतरत्र प्रकाशित असलेले साहित्यसंदर्भ धुंडाळणे अथवा त्यांच्याशी संबंधित असणारे बुजुर्ग शोधून त्यांच्याकडून आठवणींचे कवडसे हातात येतात का त्याचा प्रयत्न करणे, हाच मार्ग शिल्लक होता.

ठाणे तसे सर्वार्थाने समृद्ध आणि संपन्न. अनेक संदर्भाच्या खुणा अंगाखांद्यांवर मिरवणारे शहर, ह्याचे साक्षीदार असलेले दत्ताजी ताम्हणेंसारखे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, श्रीकृष्ण दळवी इतिहास संशोधक, कथामालेचे मधु नाशिककर, म. पां. भावे आणि पी. सावळाराम यांचे कुटुंबीय यांच्याकडून ठाण्याचे भूषण असलेल्या साहित्यिकांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून शंकर गोपाळ घैसास यांचे नाव कळले, घैसास हे मो. ह. विद्यालयात शिक्षक होते. विद्यार्थ्यांसाठी स्त्रीपात्रविरहित नाटके लिहून ती सादर करीत असत. प्रल्हाद जयंत (१९२३) जयद्रथ (१९२४), कंसारि विजय (१९२६) ही नाटके आणि श्रीकृष्ण चरित्र रहस्य (१९४९) अशी माहिती मिळाली. परंतु इतर तपशील मिळाला नाही. तसे दत्ताजींचे बंधू ग. बा. ताम्हणे हेही लेखक होते, त्यांचा तपशील मिळाला. महत्त्वाचे म्हणजे दत्ताजी स्वतः लेखन करीत असत. लहान मुलांसाठीची दोन भागातील पुस्तके, कूळकायदा, कर्ज निवारण या विषयांवर देखील त्यांचे लेखन आहे हा नवीन शोध होता. त्यांच्या काळात म्हणजे १९२२ ते १९६२ या काळात त्यांचे संपूर्ण कुटुंब ठाण्यातच राहात असे. त्यामुळे ठाण्याविषयीचा तपशील खूप आहे. त्यात साहित्यिकांचा भरणाही आहे. परंतु त्या साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित झाली नाहीत म्हणून ते साहित्यिक म्हणून ओळख मागे ठेवून गेले नाहीत.

तशी अनेक मंडळी ठाण्यात होती परंतु ती पुढे अन्यत्र निघून गेली. त्यांचा मागमूस सापडला नाही हेही दुर्दैवच! त्यामुळे लेखनात ‘साहित्यिक रत्ने’ फारशी गवसली नाहीत. जी गवसली त्यांचा अल्प परिचय पुढीलप्रमाणे आहे.

१) विनायक लक्ष्मण भावे
(इ.स.१८७१ ते १२ सप्टेंबर १९२६)
जन्म: रायगड जिल्ह्यातील पळस्पे या गावी झाला.
शिक्षण: मराठी व इंग्रजी शिक्षण ठाणे येथे झाले
(मुंबईच्या विल्सन कॉलेजातून बी.एस्सी. झाले.)

माध्यमिक शिक्षण घेत असताना त्यांना ठाणे येथे जनार्दन बाळाजी मोडक हे मुख्याध्यापक म्हणून लाभले. मोडक हे “काव्यइतिहास संग्रह” ह्या मासिकाचे संपादक होते. जुन्या ग्रंथाचा जीर्णोद्धार करणे, मराठी काव्ये जुन्या बखरी इतिहास विषयक लेख प्रसिद्ध करणे हे या मासिकाचे उद्दिष्ट होते. मोडकांचा सहवास आणि मार्गदर्शन यामुळे भावे यांना मराठी काव्ये आणि वाचनाची आवड अधिक बळावली. काव्यसंग्रहातील जुन्या कवितेच्या अध्ययनाचा जो नाद भाव्यांना लागला, त्यापायी त्यांना चार वर्षाचा हायस्कूलचा अभ्यासक्रम पार पाडण्यासाठी ७-८ वर्षे खर्चावी लागली.

कॉलेजात असताना भौतिकशास्त्राचा अभ्यास करीत, मात्र त्याचवेळी मराठी काव्याचा व्यासंग त्यांनी कायम ठेवला होता. ठाण्यात स्थायिक होऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने १८९३ साली ‘मराठी ग्रंथ संग्रहालय’ स्थापन केले. १९०३ सालापासून चार साडेचार वर्षे ‘महाराष्ट्र कवी’ या नावाचे मासिक चालवले. आणि इंग्रजी अमदानीच्या पूर्वी होऊन गेलेल्या मराठी कवींची बरीच अप्रकाशित कविता त्यातून त्यांनी प्रसिद्ध केली. प्राचीन मराठी काव्याचे इतक्या आवडीने आणि अव्याहत परिशीलन करूनसुद्धा भाव्यांची त्या काव्याबद्दलची भावना अखेरपर्यंत प्रेमाची, आपुलकीची आणि अभिमानाचीच राहिली. तिची परिणती भक्तिभावप्रेरित श्रद्धेत कधीच झाली नाही. त्यामुळेच तर त्यांच्या महाराष्ट्र सारस्वतात भक्तिभावजनित श्रद्धेऐवजी विवेचक रसिकताच प्रभावी स्वरूपात प्रतीत होते. इतर कवींच्या मानाने सारस्वतकार, भक्तिपरतेबद्दल मुख्यतः ख्याती नसलेल्या मुक्तेश्वरांच्या आणि शाहिरांच्या काव्याचे रसोद्घाटन करण्यात विशेष तन्मय झालेले दिसतात. ते सुद्धा त्यांच्या ठिकाणी श्रद्धेपेक्षा रसिकतेचाच उत्कर्ष झालेला असल्यामुळे. महाराष्ट्र सारस्वत १८१८ पर्यंतच्या मराठी वाङ्मयाचा इतिहास सर्वोत्कृष्ट आणि अभिजात प्रयत्न अर्थातच वि. ल. भावे यांचा. तेराव्या शतकातील महानुभावीय वाङ्मयापासून पेशवाईच्या अखेरच्या काळातील कवींच्या वाङ्मयापर्यंतच्या प्राचीन मराठी वाङ्मयाचा चोखंदळ विवेचकी वृत्तीने आणि जातिवंत रसिकतेने परिचय करून देणारा त्याचा ‘महाराष्ट्र सारस्वत’ (१९१९) हा ग्रंथ आजही प्राचीन मराठी वाङ्मयेतिहासावरील उपलब्ध ग्रंथात केवळ एकमेवाद्वितीय आहे. प्राचीन मराठी कविता परिश्रमपूर्वक मिळवून, अभ्यासून आणि तिच्यातील काव्यसौंदर्यात रंगून जाऊन, त्यांनी महाराष्ट्र सारस्वत हा ग्रंथ लिहून काढला. ‘महाराष्ट्र सारस्वत’ हा भावे यांचा पहिला ग्रंथ होय. त्याची पहिली आवृत्ती विष्णू गोविंद विजापूरकर संपादित ‘ग्रंथमाला’ ह्या मासिकात क्रमशः प्रसिद्ध झाली. (मार्च १८९८ ते मे १८९९) त्यानंतर ह्या ग्रंथाच्या पाच आवृत्त्या निघाल्या. ह्या ग्रंथाची पहिली आवृत्ती म्हणजे केवळ ९८ पृष्ठांचा एक निबंध होता. भावे यांनी पुढे त्यात कायम भर घातली. त्यामुळे हा ग्रंथ तिसऱ्या आवृत्तीपर्यंत ७४४ पृष्ठांपर्यंत वाढला.

‘चक्रवर्ती नेपोलियन’ हा त्यांनी १९१७ साली लिहिलेला चरित्रग्रंथही प्रसिद्ध असून मराठीतील चरित्रांत त्याने लक्षणीय भर घातलेली आहे. या ग्रंथाविषयी भावे स्वत:च मत व्यक्त करतात, की ‘प्रारंभापासून शेवटपर्यंत हे चरित्र म्हणजे अतिकुशल आणि प्रतिभासंपन्न नाटकच’ आहे. खरे पाहता या बादशहाचे चरित्र फार चित्तवेधक व ज्ञानबोधक आहे. परंतु ….. नीट सांगता आले नाही. भाषा अशी असावी की जो रस म्हटला तो उभा करावा, वर्णन असे यथातथ्य असावे, की प्रसंगाचे चित्र वाचकाच्या डोळ्यांपुढे मूर्तिमंत उभे राहावे व ज्यास पुस्तक वाचण्याचा मनापासून तिटकारा, त्यासह कथानक वाचता वाचता आवडच उत्पन्न व्हावी. त्या चरित्राच्या वाचनाने अचेतना चेतना येईल…. भावे यांचा हा विनय आहे. उलट ते कोणताही प्रसंग आपल्या लेखणीने डोळ्यासमोर जिवंत उभा करण्यात भावे सिद्धहस्त लेखक आहेत; याचा प्रत्यय हा ग्रंथ वाचताना येतो.

अज्ञानदासकृत अफझलखानाचा पोवाडा श्रीजयराजस्वामी (वडगावकर) कृत अपरोक्षानुभव (१९०५) तुकारामबुवांचा अस्सल गाथा (भाग १ व २, १९१९, १९२०), पंडित दामोदरकृत वच्छहरण (१९२४) आणि कवीश्वर भास्करकृत शिशुपालवध (१९२६) यांसारख्या प्राचीन साहित्याच्या संपादनाचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेले आहे.

२) खंडेराव त्र्यंबक सुळे
(१२ डिसेंबर १९०४ ते १६ एप्रिल १९७८)
समीक्षक
जन्म: ठाणे येथे

शिक्षण: प्राथमिक शिक्षण बी. जे हायस्कूल, ठाणे येथे. १९१८ मध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून एल्फिन्स्टन महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. पुढे १९२१ साली महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या गुजरात विद्यापीठात प्रवेश केला. या विद्यापीठातून ‘विज्ञानविशारद’ ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर महर्षि अरविंदांच्या आध्यात्मिक मार्गाकडे वळले. काही काळ पाँडेचरीला वास्तव्य केले. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात १९३० साली सत्याग्रहात सहभाग घेतला म्हणून अटक झाली. सक्रिय कार्यकर्ते म्हणून त्यानी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला.

सुळे यांना अनेक ज्ञानशाखांत रस होता. संस्कृत, साहित्याचा त्यांचा व्यासंग दांडगा होता. भेदक, चिकित्सक वाङ्मयदृष्टी व डौलदार भाषा हे त्यांच्या लेखनाचे विशेष होत. त्यांनी ‘शेष’ या नावाने ललित लेखन केले तर ‘स्कंद’ नावाने राजकीय स्वरूपाचे लेखन केले. ‘वीणा’ मासिकातून त्यांनी अनेक मर्मग्राही परीक्षणे लिहिली. ‘ज्योत्स्ना’ मासिकातून तसेच इतर नियतकालिकांतून त्यांच्या अनेक कथा प्रकाशित झाल्या. शेषसमीक्षा (१९७९) या पुस्तकात त्यांचे टीकालेख संग्रहित करण्यात आले आहेत. शेष यांची समीक्षा मार्क्सवादी समीक्षा दृष्टीला व विचार प्रणालीला अनुसरून केलेली आहे. ‘ख्रिस्तोफर कॉडवेलची सौंदर्य मीमांसा’ जनतेचा कवी (मायकोवस्की) बोरिस पॅस्टर नॅक आणि त्याची झिवॅगो इत्यादी त्यांचे लेख त्यांच्या मार्मिक वाङ्मयदृष्टीची ओळख पटवणारे आहेत. १९३८ साली ठाणे जिल्हा साहित्य संमेलन झाले, त्याचे सुळे हे अध्यक्ष होते.

३) गणेश बाळकृष्ण ताह्मणे
(दिनांक २५ डिसेंबर १९०५ ते दि.५ जुलै १९९४)
जन्म अलिबाग येथे
१९२२ ते १९६२ पर्यंत ठाणे येथे वास्तव्य,

साहित्याची आवड.कविता हा विशेष आवडीचा साहित्य प्रकार. सुमन व भारत सेवक या मासिकांचे सहसंपादक, बालविश्व मासिकाचे संपादक भग्न बासरी, रेंगाळणारे सुगंध, कोकणची पाऊल वाट ही पुस्तके प्रकाशित. कोकणची पाऊलवाट हे आत्मचरित्रात्मक पुस्तक. कोकण परिसराचे वर्णन स्वातंत्र्याचा लढा. एसीसी कंपनीत नोकरी करीत असताना आलेले अनुभव, १९२२ पासूनचे ठाणे आदींचा तपशील, वैयक्तिक अनुभवासोबत वाचायला मिळतो.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताह्मणे यांचे ते वडीलबंधू. दत्ताजींप्रमाणेच स्वांतत्र्य लढ्यात भाग घेतलेले. ठाण्यात ‘शारदा मंडळ’ नावाचे साहित्यिक कार्यक्रमासाठी स्थापन केलेले मंडळ; यात सक्रिय सहभाग. मराठी ग्रंथ संग्रहालय, कथामाला मध्यवर्ती समिती, राष्ट्र सेवा दल आदी ठिकाणी पदाधिकारी म्हणून सक्रिय. ठाणे पालिकेचे दोन वेळा निर्वाचित सभासद. तरी मूळ पिंड साहित्यिक. अनेक नियतकालिकांतून सतत लिखाण.

४) भगवंत दिनकर गांगल:
(१५ ऑगस्ट १९०७ ते ३० सप्टेंबर १९९७)
ठाणे येथे वास्तव्य.
मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजातून बी.ए.

त्यावेळचे साहित्याच्या अभ्यासाचे उत्तेजक वातावरण. अनंत काणेकर, वा.रा. ढवळे, वि.ह. कुळकर्णी अशा सहाध्यायी मित्रांचा सहवास, साहित्यप्रेमाने प्रेरित होऊन या क्षेत्रात काही धडपड करणारी मित्रमंडळी यामुळे; गांगल यांना लेखन प्रेरणा मिळाली. कथा-कांदबरी या वाचकप्रिय साहित्यप्रकारात गांगल यांनी लेखन केले. त्यातून सुबुद्ध मध्यमवर्गीयांच्या भावना आणि मनोजीवनाची हृद्य अशी चित्रे रंगविली.

प्रकाशित साहित्य: क्षणचित्रे (१९३८) शल्ये (१९४४) हे दोन कथासंग्रह आहेत. आसवांची माळ (१९३४), पिंजऱ्यातील पक्षी (१९३८), पाझर (१९४०) रंगाचे घर (१९४४) या कादंबऱ्या आहेत. क्षणचित्रे ही केवळ क्षणकाळच नव्हे, तर त्याहून बरीच अधिक स्थायी स्वरूपाचा परिणाम करणारी अशी सरस समाजचित्रे आहेत. समाजात पाहिलेले, ऐकलेले, अनुभवलेले, नजरेस पडलेले जीवन आणि त्यातून दिसणारे मनुष्यस्वभावाचे विविध नमुने त्यांच्या साहित्यातून प्रतिबिंबित झालेले दिसतात. उदा. अधोगती की उद्धार या कथात विधवांच्या असाहाय्यतेचे प्रत्ययकारी चित्र रेखाटले असून विधवाविवाहाची संयुक्तिकता त्याला प्रचाराचे स्वरूप येऊ न देता, कलापूर्ण रीतीने पटवून दिलेली आहे. त्या काळातल्या प्रचलित संकेतानुसार घटना प्रसंगांना प्राधान्य देणारी, प्रतीकात्मक सूचकतेचा वापर करणारी कथाच गांगल यांनी लिहिली. त्यामधून प्रेमळ सहृदय, ऋजू व्यक्तिमत्व आविष्कृत होईल याकडे त्यांचा कटाक्ष होता. तसेच मनोनिर्मित हळव्या दुःखात त्यांची कथा रमताना दिसते.

आसवांची माळ या कांदबरीत कमलेवर प्रेम करणारा दिवाकर, हा शांतेशी लग्न करावे लागले या कारणाने दुःखी होतो. शांतेसारखी शृंगारसुलभ वृत्तीची व त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यानुसार आपले वर्तन ठेवण्याविषयी सदैव दक्ष असलेली पत्नी लाभलेली असतानाही आपल्या विवाहपूर्व प्रेमभावनेला आवर घालावयाच्या ऐवजी शांतेला तो सारखा हिडीसफिडीस करीत राहतो. शेवटी मृत्युमार्गाने शांतेची विल्हेवाट लावून दिवाकर व कमलाचे मीलन घडवले जाते. अशा हळव्या तसेच वेगळ्या विचारांच्या उच्चशिक्षित युवकांच्या जीवनातला संघर्ष, परंपरा, रूढीवाद मांडण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या साहित्यातून केलेला दिसतो. मात्र प्रत्येक स्त्रीपुरुषाला आपल्या प्रेमभावनेशी इमान राखून आपल्या जन्माचा जोडीदार निवडण्याचे स्वातंत्र्य असावे, ही गोष्ट पटवून देण्याकरिता, या ‘आसवांची माळ’ कादंबरीत दाखविलेला प्रेमाचा प्रकार व्यक्तिविकास व समाजहित या दोन्ही दृष्टींनी श्रेयस्कर ठरू शकतो का?असा प्रश्न उभा राहतो.या कांदबरीतील प्रसंगाचा तुटकपणा, लिखाणाचा नवखेपणा आणि स्वाभाविक कल्पनांचा अभाव, या दोषांची माळ आहे याची प्रचिती मात्र येते.

या कादंबरीचा अपवाद वगळता पुढील लेखनात साध्या साध्या अर्थपूर्ण प्रसंगांतून घरगुती जिव्हाळ्याचे वातावरण तयार करीत. पात्रांच्या वास्तव आणि मनोजीवनाचे धागे एकमेकात कौशल्याने गुंफत आकर्षक शैलीने त्यांनी आपल्या कादंबऱ्या वाचनीय केल्या आहेत. १९२० नंतरच्या काळात नव्या जाणिवेतून सहजस्फूर्तीने लेखन करणाऱ्या काही लेखकांपैकी, ज्यांची स्मृती ठेवायला हवी असे भ. दि. गांगल हे एक लेखक होते. भ. दि. गांगल हे रेल्वे ऑडिट ऑफिसमध्ये मोठ्या हुद्यावर होते.

पिंजऱ्यातील पक्षी (१९२८) या कांदबरीचे कथानक दुहेरी आहे, अधिक वास्तव व कुशलपणे चित्रण झाले आहे. मुख्य विषय प्रेमविवाह हाच आहे. परंतु मनोहर-वासू या मित्रांची जोडी, वासूची घरची स्थिती, अक्काचे जीवन, मनोहर-मंदाचा स्नेह व प्रीती, त्याला भिन्नरंगी असा वासू-वसुंधरा यांचा प्रेमसंबंध या सर्व गोष्टींची जुळणी बरीच सफाईदार व भावपूर्ण झाली आहे. पिंजऱ्यातील पक्षी या प्रतीकाचा उपयोग, कथेच्या प्रारंभी व वसुंधरेने पुऱ्या केलेल्या वासुदेवाच्या लघुकथेत आशयपूर्ण केले आहे. या दोन्ही कथांच्या मानाने गांगलांची तिसरी कांदबरी ‘रंगाचे घर’ (१९४४) निकृष्ट आहे. स्वभाव चित्रण व मूलभूत प्रश्नांचे विवेचन या दोन्ही दृष्टींनी तीत कमीपणा आला आहे.

५) वसंत रामकृष्ण वैद्यः
(५ जानेवारी १९१२ ते १४ जानेवारी १९८०)
कवी, कथाकार
जन्म: महाड येथे
वास्तव्य ठाणे येथे, नोकरी ठाणे नगरपालिकेत.

वैद्य हे कवी म्हणून प्रसिद्ध होते. ‘बहर’ (१९३६) हा त्यांचा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला. १९३८ साली ‘विनोदिनी’ हा विडंबन गीतांचा संग्रह प्रसिद्ध झाला. १९४० साली ‘जीवनाकडे’ व ‘साद’ (१९६१) हे आणखी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. पालवी व गलोल हे बालगीतांचे संग्रह प्रसिद्ध झाले. त्या शिवाय जिरेटोप ही मुलांसाठी एकांकिका त्यांनी लिहिली. तसेच ‘स्वप्न राहिले अभंग’ हा नाट्यप्रकार ही त्यांनी हाताळला होता. पेरणी व पडत्या छाया हे दोन कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत.

६) पी.सावळाराम
(४ जुलै १९१४ ते २१ डिसेंबर १९९७)
जन्म: आषाढी एकादशीला. गोणखिंडी, ता.बाळवा, जि.सांगली

पी. सावळाराम यांचे संपूर्ण नाव निवृत्तीनाथ रावजी पाटील. राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे बी.ए. पर्यंत शिक्षण. पुढे बीटी करण्यासाठी सरसावले परंतु दुसरे महायुद्ध आणि चलेजाव चळवळ यांच्या लढ्यात ते स्वप्न साकार झाले नाही. धाकटे बंधू हिंदुराव पाटील हे त्यावेळी स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक. त्यामुळे सावळाराम यांच्या मागेही गुप्त पोलिसाचा ससेमिरा लागला होता. १९४३ साली विवाहानंतर ते ठाण्यात आले.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच काव्यलेखनाला सुरुवात केली होती. माधव ज्यूलियन यांचे मार्गदर्शन लाभल्याने निवृत्तीनाथाचा, पी. सावळाराम म्हणून कवी जन्माला आला. राघू बोले मैनेच्या कानात गं, चल ग सखे आंब्याच्या बनात ग, या गीताला वसंत प्रभूचे संगीत लाभले आणि कोलंबिया कंपनीने ध्वनिमुद्रिका प्रकाशित केली आणि महाराष्ट्राला पी. सावळाराम गवसला. गंगा यमुना डोळ्यांत उभ्या का? जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा। हे गीत तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.

भक्तिगीते, भावगीते, गवळण, लावणी, चित्रपट गीते अशा विविध प्रकारात त्यांची असंख्य गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात प्रकाशित झाली. ‘बाळा होऊ कशी उतराई’, ‘जो आवडतो सर्वांला’, ‘राधा कृष्णावरी भाळली’, ‘लेक लाडकी या घरची’, ‘जिथे सागरा धरणी मिळते’, ‘शेत बघा आलंय राखणीला’ अशी कितीतरी गाजलेली गीते त्यांनी लिहिलेली आहेत. त्यासाठी वसंत प्रभूंसारखे संगीतकार लाभले तर लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या अनेक थोर गायकांनी या गीतांना स्वरसाज चढविलेले आहेत.

१९४२ साली वि. स. खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी म्हणून कविता सादर करण्याची संधी मिळाली. १९५२ साली श्री. के. क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली उत्कृष्ट गीतरचनेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. १९६३ साली त्यांनी महाराष्ट्र राज्य तमाशा मंडळाचे अध्यक्षपद भूषविले. ‘देव जरी मज कधी भेटला’ या गाण्यासाठी त्यांना फाळके पुरस्कार मिळाला. तसेच काव्यक्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार देण्यात आला. नाट्यपरीक्षण मंडळाचे सदस्य आणि राज्य गृह निर्माण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.

सन १९६६-६७ या काळात सावळाराम यांनी नगराध्यक्षपद भूषविलेले होते. एक कवी नगराध्यक्ष होऊ शकतो याचा आचार्य अत्रेना अत्यानंद झाला व त्यासाठी त्यांना सावळारामांचे कौतुक केले होते.

सावळाराम यांनी गीत लेखनाबरोबर अनेक चित्रपटांचे संवाद, कथा, व पटकथा लेखन केलेले आहे. ठाण्यात झालेल्या १९८८च्या ६१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अग्रभागी होती. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे शाखेचे ते अध्यक्षही होते. ‘राम राम पाव्हणं’ हा त्यांच्या गीतलेखनाचा पहिला चित्रपट तर ‘भालू’ हा शेवटचा. दोन्ही चित्रपट रजतजयंतीपर्यंत चालले. असे असले तरी त्यांच्या काव्य व गीतांचा संग्रह ‘गंगा जमुना’ १९८४ साली प्रकाशित झाला. प्रसिद्धीच्या माध्यमात वावरत असूनही प्रसिद्धीमागे न धावणारे सावळाराम यांचा हा गंगा जमुना सुद्धा मित्रांच्या आग्रहाने प्रसिद्ध झाला. इतके ते प्रसिद्धी पराङमुख होते.

पी. सावळारामांच्या शेकडो गीतांचा वर्षाव, पारिजातकांच्या फुलांप्रमाणे असंख्य श्रोत्यांच्या कानांवर आणि रसिकतेवर झालेला आहे. भावगीत, चित्रपट गीत या सर्वच क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करणाऱ्या त्यांच्या लेखणीने त्यांनी ‘जनकवी’ या पदवीवरील अधिकार प्रस्थापित केला आहे. अशा शब्दांत कुसुमाग्रज यांनी सावळाराम यांचा गौरव केला आहे.

७) अरविंद महेश्वर ताटके
(३१ डिसेंबर १९२३ ते २४ जानेवारी २०१०)
जन्म: दादर येथे (मुंबई)
माध्यमिक शिक्षण ठाण्याच्या बी.जे. हायस्कूलमध्ये .
१९४५साली मॅट्रिक.

त्यांच्या लेखनाची सुरुवात ‘धनुर्धारी’ मधून झाली. त्यांचे लेखन बव्हंशी चरित्रात्मक आहे. त्यांची सुमारे ५४ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.

‘विश्वविख्यात क्रीडारत्ने’ यासारखी आणि सर डॉन बॅडमन, विजय मर्चेट, विनू मंकड, सर गॅरी सोबर्स, खंडू रांगणेकर या सारख्या क्रिकेटपटूंची कारकीर्द दाखविणारी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. महात्मा गांधी, गो. कृ. गोखले, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आदी राजकीय नेत्यांची चरित्रे त्यांनी लिहिली आहेत.नामवंत साहित्यिक या पुस्तकाबरोबरच ना. सी. फडके, ग.त्र्यं. माडखोलकर, पु.भा. भावे, आचार्य अत्रे यांच्यासारख्या साहित्यिकांची चरित्रे त्यांनी लिहिली आहेत. शिवाजी, संभाजी, नेपोलियन, विन्स्टन चर्चिल, यांच्या चरित्रांवरही त्यांचे लेखन आहे.विडा रंगला असा हा कथासंग्रह, झिनी, हिरकणी या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. सत्यशोधक सप्तर्षी कर्तबगार उद्योगपती पहिलवानांच्या गोष्टी, पुरुषश्रेष्ठ यांसारख्या पुस्तकांतून कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती देणारे लेख त्यांनी लिहिले आहेत.देश विदेशातील महान कर्तृत्ववान व्यक्तीविषयी आदरभावनेतून त्यांच्या कर्तबगारीचा व कार्याचा परिचय मराठी वाचकांना घडवण्याच्या उद्देशाने ताटके यांचे बहुतेक लेखन झालेले आहे.

८) मधुसूदन पांडुरंग भावे
(दि.२५ मार्च १९२४ ते दि १९ मे २००३)
जन्म: नाशिक येथे

म. पां. भावे याच नावाने ओळखले जाणारे भावे नोकरीच्या निमित्ताने ठाणे येथे स्थायिक झाले आणि ठाणेकर म्हणूनच प्रसिद्धीस पावले. मितभाषी, मृदू स्वभाव तरीही अंतरंगी मिश्किल असलेले भावे, हे बराच काळ बेस्टमध्ये नोकरीला होता. पुढे त्यांनी ही नोकरी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव सोडली. मुळात कवी असलेले भावे आकाशवाणीची मान्यता मिळविण्यात यशस्वी झाले आणि तेथून त्यांचा गीतकार म्हणून प्रवास सुरू झाला.

ठाणे म्हटले, की श्याम फडके आणि पी. सावळाराम यांचा आवर्जून उल्लेख होत असे, त्या नावात एका नावाचा समावेश झाला, तो म्हणजे म.पां. भावे यांचा.

‘स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा’, या गीताने प्रचंड लोकप्रियतेचे वलय भाव्यांच्या नावाभोवती निर्माण केले. तसे ‘औंदा लगीन करायचं’, या लावणीने ते गाजले. पुढे ‘स्वप्नातल्या कळ्यांनो’ याच नावाचा संग्रह प्रकाशित झाला. त्याची कॅसेटही निघाली होती. अनिल मोहिले यांच्यासारख्या संगीतकार आपल्याला लाभला, याचा भावे आदराने भाग्याचे लक्षण म्हणून उल्लेख करीत. अनेक नामवंत गायकांनी त्यांची गीते आपल्या आवाजात फुलविलेली आहेत.

विडंबन काव्य हा त्यांचा आवडीचा काव्य प्रकार. ‘अरे संसार संसार’ हा या विडंबन काव्याचा संग्रह याच कवितांवर आधारित प्रेक्षकांसमोर सादर करण्याचे कार्यक्रमही त्यांनी केले होते. ठाण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या ‘शब्दांगण’ या मासिकाचे संपादन त्यांनी केले, त्यावेळी विडंबन काव्याच्या स्पर्धा आणि होतकरू लेखकांनी व्यासपीठ म्हणून शब्दांगणचा उपयोग करुन घेतला.

त्यांनी अनेक कथा आणि लेख लिहिले आहेत. त्यापैकी विनोदी व खुशखुशीत अशा लेखाचा संग्रह म्हणजे ‘मसाला पान’ हा होय. कृष्णाच्या लीलांवर आधारित ‘गीतकृष्णायन’ हे काव्यमय लेखन प्रसिद्ध आहे.

लहान मुलांसाठी लिहिलेले ‘सार्थ रामायण’ हे तर पुढे अभ्यासक्रमात समाविष्ट झाले. त्यांची इंग्रजीतूनही आवृत्ती निघाली आहे.

कविता, गीते, कथा, लेख, यांच्यासोबत त्यांनी लोकनाट्याच्या प्रांतातही मुशाफिरी केली आहे. ‘भंपकपुरीचा फेरफटका’ आणि ‘औट घटकेचा कारभार’ ही दोन लोकनाट्ये त्यानी लिहिली व ती चांगली गाजलीदेखील. भावे साहित्य रसिक मंडळात सक्रिय सहभागी असत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते काही वर्षे कार्याध्यक्ष होते. त्यांना संगीत प्रांतात ही मुशाफिरी करायला आवडे. रांगोळी उत्कृष्टपणे काढण्यात त्यांचा हातखंडा होता.

‘मी हा असा’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. त्याशिवाय त्यांची साहित्यसंपदाही प्रसिद्ध आहेच. ‘चांदणे अंधारलेले’, ‘असा मी काय गुन्हा केला?’ या कादंबऱ्या आहेत. ‘मोहर फुलला सौख्याचा’, ‘माझी कविता-भाव कविता’ हे कविता संग्रह, ‘मला मोठं व्हायचं आहे’, ‘गजानन विजयामृत’, ‘रामकृष्ण संगीतगाथा’, ‘आपलं वागणं आपला देश’ ही विविध विषयांवरील पुस्तके प्रकाशित आहेत.

९) दिगंबर त्र्यंबक ऊर्फ श्याम फडके
(दि.२६ सप्टेंबर १९३१ ते दि.१० सप्टेंबर १९९१)
जन्म: ठाणे येथे
शिक्षण: बी.एससी, एम्.एड्. ठाणे येथील डॉ. बेडेकर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक व ज्ञानसाधना महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य.

८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भूषविणाऱ्या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या कार्यकारीणीवर काही काळ त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. सुरुवातीला त्यांनी नाटकांतून कामे केली. त्यामुळे नाटक लेखनाची आवड निर्माण झाली. प्रारंभी एकांकिका लिहिल्या, मुलांसाठी विनोदप्रधान नाटके लिहिली. महिलांसाठी नाटक लेखन तसेच पुरुषांसाठी केवळ नाटक लेखन केले.

‘एक होतं भांडणपूर’, ‘राज्यकन्या नीलमपरी’, ‘हिमगौरी आणि सातबुटके’, यांसारखी मुलांसाठी लिहिलेली नाटके लोकप्रिय ठरली. ‘आठ तासांचा जीव’, हे एक सामाजिक नाटक. त्या व्यतिरिक्त का असंच का?”अर्ध्याच्या शोधात दोन’, ही दोन गंभीर नाटके त्यांनी लिहिली. ‘काका किशाचा’ हे विनोदप्रधान नाटक सुप्रसिद्ध फार्स म्हणून खूप गाजले. ‘खोटे बाई आता जा’ हे रहस्यप्रधान नाटक नाट्यरसिकांच्या स्मरणात राहिले.

काही काळ ठाण्यातल्या नाट्यचळवळीशी त्यांचे संबंध अधिक जवळिकेचे राहिलेले आहे. हौशी नाट्यचळवळीला प्रोत्साहन मिळावे म्हणून संग्रहालयाच्या सभागृहाचा लहान नाट्य थिएटरसारखा उपयोग करून घेतला. त्यात ‘चांदणे संमेलन’ या सारखे रात्रभर साहित्यिक कार्यक्रम घडविणारे संमेलन काही वर्षे त्यांच्याच अध्यक्षतेखाली संग्रहालयाने साजरे केलेले आहेत.

-चांगदेव काळे

ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला चांगदेव काळे यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..