प्रेमाच्या बाबतीत आपण देशवासीयांचे विचार फार बुरसटलेले आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. प्रेमाने आयुष्यात कर्तृत्वाची प्रेरणा मिळते, प्रेमाने आयुष्य उभे राहते हे भारतीय माणसाच्या कुठेही खिजगणतीतही आढळून येत नाही.
पूर्वी एकदा ऑपेरा विंफ्रीच्या शो मध्ये लग्नं या विषयावर चर्चा सुरू होती. एक अमेरिकेत स्थायिक झालेले गुजराथी कपल त्यात सहभागी झालेले होते. आम्ही आमच्या मुलाला इतका खर्च करून इतके इतके शिकविले आहे, त्याच्याकडे लक्ष दिले आहे, त्याला खूप लक्ष देऊन घडविले आहे, आमची सूनही तशीच उत्तम घरातली लक्ष देऊन घडविलेली उच्च शिक्षण घेतलेली मुलगी असणार आहे. अधिक अक्कल पाजळण्याच्या अगोदर विंफ्रिने त्यांना तिथेच तोडले आणि सांगितले, तुम्ही मुलाला त्याची प्रेरणा शोधू देत नाही, तुम्ही त्याच्यासाठी असेट् शोधता आहात, तुम्ही खाली बसा. एवढे बोलून तिने त्या अत्याचारी कपलला पुढे संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत एकही प्रश्न विचारला नाही.
अनेक भारतीय कपल्स दावा करतात, आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी एकत्र राहिलो, नाहीतर राहिलोच नसतो, निव्वळ मुलांसाठी साक्रीफाईज केलं.किती नोबेल प्राईज विनर्स भारतात आहेत? किती जागतिक दर्जाचे उद्योजक भारतातील संस्कारांतून तयार झालेले आहेत? घटस्फोट किंवा रिमॅरेज किंवा घरगुती भांडणं यांचा मुलांवर फारसा काही परीणाम होत नाही, मुलं प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढायला शिकतात आणि अशीच मुलं धडपडी होतात. पुराव्या दाखल अनेक उदाहरणे देता येऊ शकतील. पैसे खर्च करणे आणि अव्वाच्या सवा अपेक्षा करणे, याव्यतिरिक्त इतर कोणतेही प्रोडक्टीव्ह काम करता येत नाही म्हणून भारतीय आई बाप आपल्या पोरांना छळून मिंधे करून ठेवत असतात असे माझे स्पष्ट मत आहे.
प्रेम हि माणसाच्या मनात निर्माण होणारी एक उत्कृष्ठ भावना आहे, ती प्रेरणादायी सुद्धा आहे. खरेतर आपली प्रेरणा शोधणे आणि ती सापडणे यासारखा आनंद आयुष्यात दुसरा कुठलाही नाही.
इयत्ता आठवीत नववीत असताना मला एक मुलगी आवडत असे. ती आवडण्याचे कारण फारसे विशेष नव्हते, ती माझ्या वहीत डोकावून माझी गणितं बघायची आणि रस्त्यात दिसली की ओळखीचं स्माईल द्यायची. ती भावना म्हणजे प्रेम असतं, असं मला त्यावेळी कधीही कळायचं नाही, पण तिने माझं आयुष्य भारावून टाकलं होतं. मला वाटलं आज तिने निळा ड्रेस घालून यावं, ती नेमका निळा ड्रेस घालून यायची, आज पिवळा ड्रेस घालावा असं वाटलं की पिवळा ड्रेस असायचा, माझ्या डोक्यात सकाळ पासून घोळणारं गाणं ती गुणगुणत असायची. या सगळ्या गोष्टींचा मला खूप त्रास व्हायचा आणि तो त्रास मला खूप आवडायचा. तिच्या आठवणींमुळे मी पूर्ण कॉन्सनट्रेशने अभ्यास पण करू शकायचो नाही, पण माझ्या फिजिक्सच्या आणि मॅथेमॅटिकस् च्या आवडीची ती प्रेरणा बनली होती. मी त्या काळात वेड्यासारखे मॅथस् आणि फिजिक्स केलं, फॉरीन ऑथर्सची पुस्तकं आणून त्यातील प्रॉब्लेम्स सोडवून केलं.
कोणतेही प्रॉब्लेम्स सोडविणे हा त्याकाळी माझा हातखंडा झाला होता. मेकॅनिक्स प्लॅंक आईन्स्टाईन गॉस ओहम, सगळेच्या सगळे मी त्याकाळात कोळून प्यायलो होतो. त्या काळात मी बीसीएल लायब्ररी लावून स्वतः आईन्स्टाईनने लिहिलेले एन् थ डायमेंशन नांवांचे एक पुस्तक आणून वाचण्याचा खूप प्रयत्न केला होता. प्रेमाच्या भरात माणूस काहिही करू शकतो, अगदी एव्हरेस्ट सुद्धा चढू शकतो. मी तिच्या आठवणी फिजिक्सशी आणि गणिताशीच का जोडल्या होत्या याचे मला आजही नवल वाटते. माझा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने नसायचा त्यामुळे शाळेत मार्क्स नेत्रदीपक असे कधीच नसायचे, पण माझं त्या विषयांत नॉलेज मात्र खूप जास्ती असायचं. पुढे ती दुसरीकडे रहायला गेली, आमची कॉलेजेस बदलली आणि हळूहळू तिची आठवण कमी झाली, पण ती मला फिजिक्स आणि मॅथस् हि माझी खासियत मला दाखवून गेली. असं ट्युनिंग असलेला जोडीदार जर मिळाला तर ते त्या दोघांचंही खरोखर भाग्यच म्हणावं लागेल.
भारतात प्रेमकथा फक्त त्यागाच्याच ऐकायला मिळतात, किंबहुना प्रेम म्हणजे त्याग, दुःख त्रास हे समिकरण इतके जोडले गेले आहे की त्या त्यागाने प्रेमाला बदनाम केले आहे. रामाची सीता, अहिल्या, लोपामुद्रा पासून ते थेट मुमताज महल पर्यंत सगळ्या कथा फक्त त्रास त्रास आणि त्रासाच्याच आहेत.
खरंतर प्रेम हे जगणं आहे, प्रेमात आनंद आहे चैतन्य आहे पण या वेड्या त्यागाने प्रेमातली प्रेरणाच संपवून टाकली आहे.
परवा परवाच आमच्या नववीतली ती मला पुन्हा दिसली होती, तिच्या तोंडावर तेच ओळखीचे स्मित होते, मला पटकन एक शेर आठवला आणि मी तो गुणगुणलो सुद्धा,
तेरी सूरत से नहीं मिलती किसीं की सूरत।
मैं जहाँ में ‘तेरी तसवीर लिये फिरता हूँ।
कदाचित शायर तीच हरवलेली प्रेरणा शोधत जगभर फिरत असावा आणि त्याला हि ओळ सुचली असावी. शेर अनुभवणं हा सुद्धा स्वर्गीय अनुभव ती जाता जाता देऊन गेली. खरं तर प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचा स्वर्गीय अनुभव असतो, तो आपल्या हृदयाला भिडविण्यासाठी मोठे शब्दप्रभूच जन्मावे लागतात.
मोठा झाल्यावर मुलींचा लग्नं या विषयावरचा दृष्टिकोन परिचित झाला. माझ्या दोन तीन मैत्रिणी होत्या, त्यांच्या मुलांबद्दलच्या अपेक्षा मी जेव्हा ऐकल्या, त्यानंतर माझा प्रेम बिम विषयावरचा विश्वासच उडून गेला. आयुष्यात आपण फक्त मुलंच नकारू शकतो अशा प्रकारे त्या मुलं नकारीत असत. आईला आवडला नाही, डोळे आवडले नाहीत, नाक खूप मोठं आहे, याला पगार कमी आहे, वडिलांची प्रॉपर्टी नाही, याचा शर्ट चांगला नाही, याच्या पत्रिकेत याची बायको मरणार आहे, याला मुलं होण्याचा योग नाही, इत्यादी इत्यादी इत्यादी. हे सगळं ऐकल्यावर मला माझं कधी लग्नं होईल असं वाटलंच नव्हतं. पण झालं. इतकी अन्सर्टन परीक्षा देणं म्हणजे मी माझा कॉन्फिडन्स घालवून बसणेच असेल, असंच मी समजू लागलो होतो.
आजकाल व्हॅलेंटाईन वीक असावा किंवा नाही किंवा व्हॅलेंटाईन डे साजरा करावा का नाही? याविषयी बरीच चर्चा होत असते. माझ्यामते प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची प्रेरणा शोधण्याचा आधिकार आहे, चुकीची प्रेरणा बदलण्याचा आधिकार आहे आणि आपले आयुष्य चैतन्यमय करण्याचा आधिकार आहे. आपला सुयोग्य जोडीदार शोधण्यासाठी तरुणाईने सर्वप्रथम आपल्या स्वतःकडे निरंजन दृष्टीने बघायला शिकणे आवश्यक आहे. आपल्या स्वतःला आपले अस्तित्व मिळवून देणारा जोडीदार शोधण्यासाठी प्रेमाच्या सर्व खुळचट समजुती बाजूला ठेऊन, माणसाचे रूप रंग जात सगळ्या वरवरच्या गोष्टींच्या पलिकडे जाऊन, आपल्या आईबापांच्या कल्पनांना छेद देऊन स्वतःच स्वतःची प्रेरणा शोधणे आवश्यक आहे. त्यासाठी हे व्हॅलेंटाईन डे सारखे उत्सव जरूर साजरे करावेत. प्रेमाच्या दुनियेत काहीच कुरुप नसतं, आपल्यातील खासियत शोधून देण्याची क्षमता कुणाकडे असेल याचा बाह्य रुपाशी कसलाही संबंध नसतो.
— विनय भालेराव.
Leave a Reply