शब्दांच्या मायावी सागरात
मुक्त पणे विहरावे…
उपहासाच्या लाटांना
हलकेच शिताफीने चुकवावे
अंतर्मनी विश्वासाचा
रहावा कायम खोलावा
विरहाचा खोल भोवरा…
अलगद पणे चुकवावा
आनंदाच्या तुषारांनी
रोमांचित होउन उठावे
अपमानाचे ते शिंतोडे…
अलगद पुसून काढावे
उन्मादाच्या फेसाळ बुडबुड्यास
व्यर्थ हवा नाही द्यायची
अहंकाराच्या दगडाची ठेच…
तटस्थ पणे चुकवायची
कौतुकाच्या वर्षावांनी
हर खुन बहकुन नाही जायचं
वादळी आरोपांच्या कणांनी
घायाळ नाही व्हायचं
दुःखाच्या ओल्या वाटांवर
जरा सावरुन चालायचं…
वैफल्याच्या शेवाळावरुन
घसरून नाही पडायचं
संतापाच्या त्या महापुरानं
विध्वंस न करता सरावे
अन् भावनांच्या धबधब्याने
जख्मी न होता पडावे
मुक्त बेधुंद वाहताना
वसा शिस्तीचा नाही सोडायचा
काठावरचा मायेचा ओलावा…
नाही कधी वाळु द्यायचा
मनातील कपटाचा
सद्-भावनांनी निचरा व्हावा
अंतरी सदैव प्रेमाचा
निर्मळ झरा वाहत रहावा…
– डॉ. सुभाष कटकदौंड