अंतरा आणि अभिनय दोघे मुंबईतील वरळीच्या किनाऱ्यावर फिरत होते. दोघांनी आपले हात मागून दुसऱ्याच्या कमरेभोवती लपेटलेले होते. अंतरा आणि अभिनय दोघे मनाने एकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडालेले होते. दोघांचेही शिक्षण आता पूर्ण झालं होतं. या वर्षी ते दोघेही आपापल्या गांवी परतणार होते. अंतराला तर उद्याच गांवी जायचे होते.
अभिनय आणखी तीन चार दिवसांनी आपल्या गांवी जाणार होता. दोघांची पुढची भेट कधी, कशी होणार, ते माहित नव्हतं आणि होईलच कीं नाही ही शंका दोघांना भेडसावत होती. त्यामुळे आजच्या भेटीचा आनंद दोघांना मनसोक्त अनुभवतां येत नव्हता. गेली पांच मिनिटे दोघांच्या तोंडातून चकार शब्दही बाहेर पडला नव्हता. उंच, सांवळा, सशक्त अभिनय आणि गोरी, काळेभोर भेदक डोळे असणारी, हंसताना गालाला खळी पडणारी, निमुळत्या हनुवटीची अंतरा परस्परांना सर्वच दृष्टींनी अनुरूप होते पण दोघांच्याही मनांत विचार मात्र एकच होता. “एकमेकांशी वैर करणारे आपले राजकारणी पालक आपल्या विवाहाला संमती देतील कां ?” तात्या पाटील, अंतराचे वडिल, त्यावेळी आपल्या ड्रायव्हरला सूचना देत होते, “आपल्याला उद्या तीन वाजतां स्टेशनवर जायचंय. गाडी कधी कधी धा-पंधरा मिन्टं आधी येती.” अंतराचे तात्या आणि आई आपल्या लेकीचे जंगी स्वागत करायच्या तयारीत होते. पांच वर्षे मुंबईत राहून आता त्यांची अंतरा परत गांवी येत होती.
तात्यांची थोरली मुलगी दोन वर्षांपूर्वी लग्न होऊन सासरी गेली होती. तसं तात्यांच घर कांही रिकामं नव्हतं. त्यांच्या घरी रहाणारी त्यांची बहीण होती. आश्रयाला इतर दूरच्या नात्यातली मुलं होती. नोकर-चाकर होतेच व शिवाय राजकारणामुळे पाहुणे रोजच असत. पण आपलं लेकरू ते आपलं लेकरू. अंतरा येणार म्हणून तात्या-वैनी तिच्या येण्याच्या तारखेकडे डोळे लावून बसले होते. दोघांच्याही मनांत एकच विचार होता, “अंतराचे शिक्षण पुरे झाले, आता तिचं लग्न लावून द्यायचं” वैनींच्या मनांत एका दूरच्या भाच्याशी तिचं लग्न लावून त्यालाच इकडे आणावा असं होतं. प्रतापरावांनी, अभिनयच्या आबांनी, गुरूजींना मूहूर्त काढायलाच बोलावले होते. तोलामोलाचं घराणं पाहून लग्न जुळवण्याची कामगिरी त्यांची वहिनी, जिला सर्व काकू म्हणत, तिच्याकडे होती. काकूने अभिनयसाठी स्वतःच्या बहिणीच्या नात्यांतली मुलीची निवड केली होती.
काकूच्या निवडीला प्रतापरावांनी नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी सरळ लग्नाच्या तयारीलाच सुरूवात केली होती.
त्यांना विरोध करण्याची कुणाचीच हिम्मत होत नसे. त्यांच्या दिवाणखान्यांत मधल्या भिंतीवर त्यांच्या आजोबांची बंदूक लटकत होती. प्रतापरावांच्या वडिलांनी रागाच्या भरांत कुणाला तरी त्या बंदुकीने गोळी घातल्याची वदंता होती आणि रागीट प्रतापरावही तो कित्ता गिरवायला मागे पुढे पहाणार नाहीत, याची सर्वांनाच खात्री होती राजकारणांतही प्रतापरावांच नाव होतं. अजून ते कधी आमदार झाले नव्हते. पण ह्या वेळच्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी जाहीर व्हावी, अशी त्यांच्या पाठीराख्यांची इच्छा होती. अडचण ही होती की पक्षांत दोन गट होते आणि दुसऱ्या गटाने तात्या पाटीलांची उमेदवारी जवळजवळ पक्की केली होती. तात्यासाहेब आणि प्रतापराव ह्यांचे परंपरेने वितुष्ट होते. आता दोघांच्या पाठीराख्यांनी ते जिल्हा पातळीवर नेऊन ठेवले होते. परिणामी एकाला तिकीट मिळाले तर दुसरा पक्ष सोडून आपल्या पाठीराख्यांसह दुसऱ्या पक्षांत जाणार होता. त्या पक्षातली फूट अटळ होती. दोन्ही पक्षांच्या हुशार श्रेष्ठींनी आपापले पर्यायी उमेदवारही ठरवले होते. जेव्हा प्रतापरावांकडे गुरूजी पोहोचले आणि तात्यासाहेबांच्या ड्रायव्हरला सूचना देऊन झाल्या, त्याच वेळी अंतरा अभिनयला म्हणाली, “अभि, आपण इथे बसूया थोडा वेळ. चालून चालून पाय दुखताहेत.”
दोघं कट्ट्यावर जाऊन बसलीं. अभिनय तिचा हात हातात घेत म्हणाला, “अंतरा, माझे आबा काय किंवा तुझे तात्या काय, दोघेही आपल्या लग्नाला संमती देणार नाहीत. मला गांवच्या एका मित्राचा फोन आला होता की माझ्या काकू त्याच्या आईकडे माझं लग्न ठरवलंय, असं कांही सांगताना त्याने ऐकलं.” अंतरा म्हणाली, “अभि, मलाही नेमकी हीच भिती वाटते आहे. तात्या माझं शिक्षण पूर्ण होण्याचीच वाट पहात होते. मी त्यांना शिक्षणाच्या नांवावर कसेबसे थोपवले होते.
मला नाही वाटत की आता ते थांबतील.” थोडं थांबून अंतराने विचारलं, “अभि, आपण बोलून पाहूया ना एकदा !”
अभि म्हणाला, “वेडी आहेस कां तू ! एकदा कां त्यांना हे कळलं तर आपल्या हालचालींवरही बंधनं येतील.त्यापेक्षा आपणच कांही ठरवूया.”
अंतरा म्हणाली, “आपण काय ठरवणार ?” अभिनय म्हणाला, “तेंच जे सर्व प्रेमी करतात. आपण पळून मुंबईत परत येऊयां. मी तोपर्यंत एकदोन मित्रांच्या मदतीने इथे लग्नाची सगळी तयारी करून ठेवीन. एकदा विवाह झाला की मग दोघांच्या विरोधाची धार कमी होईल.” अंतरा घाबरली होती. पळून जाऊन लग्न करायची कल्पना तिला भीतीदायक वाटत होती. दोघांचे राजकारणी बाप काय तांडव करतील याची भीती होती. अभिनयने त्याखेरीज पर्याय नाही हे तिला पटवून दिले. मग त्याने तिला आपला बेत सांगितला.
दोघांकडेही एक खास मोबाईल होता.
त्याचा नंबर त्यांनी कुणालाच दिलेला नव्हता.
गांवी गेल्यावर दोघांनी त्या फोनवर संपर्क ठेवायचा.
अभिनय खास गाडी भाड्याने मागवणार होता.
रात्री साडेअकरा-बाराला सामसूम झाल्यावर दोघांनी घर सोडायचं आणि अंतराच्या घराजवळ अभिनय येईल, तेव्हा तिने तयार रहायचं.
दोघानी सकाळी सातपर्यंत ठाण्याला एका मित्राकडे पोहोचायचं.
तो मित्र साडेसातला मॅरेज रजिस्ट्रारना घरी बोलावणार होता.
नोंदणीनंतर दोघांनी आपापल्या पालकांना कळवायचं.
प्रेम माणसाला धैर्य देते.
प्रेम माणसाला साहस करायला प्रवृत्त करते.
अभिनयने अंतराला जवळ ओढत विचारले, “जमेल ना तुला हे ?”
अंतराने अभिनयचा हात घट्ट धरला व वचन दिले की ती त्याच्याबरोबर जगात कुठेही यायला तयार आहे.
तिचा होकार ऐकून अभिनयने तिला घट्ट मिठी मारली व तिचे चुंबन घेतले.
ती कृतक कोपाने म्हणाली, “अभि, इथे लोक आहेत, याचे भान ठेव.”
अभिनय म्हणाला, “मुंबईची हीच तर मजा आहे. गर्दीतही खाजगीपण जपतां येतं इथे. दुसऱ्याकडे पहायला वेळच नसतो.”
प्रतापरावांना गुरूजींनी सांगितले होते की महिनाभर कांही चांगला मूहूर्त नाही.
त्यामुळे अभिनयच्या विवाहाची बोलणी लांबणीवर गेली होती.
विधानसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यायची हे ठरवण्याचा शेवटचा दिवसही जवळ येत होता.
त्याआधी एक दिवस तात्यासाहेब व प्रतापराव ह्या दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा, अशी श्रेष्ठींची सूचना आली.
श्रेष्ठींची सूचना म्हणजे हुकुमच.
जो दिवस अभिनयने पळून जायसाठी निवडला होता, त्याच दिवशी रात्री दहाला ही मिटींग ठरली होती.
बैठक गुप्तपणे होणार होती.
अभिनयला आपला बेत बदलणे शक्य नव्हते.
अंतराचे सारखे मेसेजेस येत होते.
त्यात प्रेमालापही असे व भीतीही.
अभिनय तिला धीर देत होता.
मिटींगमुळे दोन्ही गांवात जाग राहिली असती; पळून जाण्यात अडचणी येण्याची शक्यता होती, तरीही दोघांनी आपला निश्चय बदलला नाही.
तो दिवस आला.
अंतराने एका पिशवीत थोडे कपडे घेतले.
एकीकडे प्रेमाची ओढ व दुसरीकडे भीती ह्यामुळे तिच्या हृदयाची धडधड वाढलेली तिला जाणवत होती.
अभिनय मनाने घट्ट होता.
प्रतापराव दिवसभर बाहेरच होते.
त्यांच्या भेटीगाठी चालू होत्या.
घरी परत न येता, ते तात्यासाहेबांना भेटायला परस्पर जाणार होते.
त्यांनी अभिनयला एवढ्यात राजकारणांत आणायचे नाही, असे ठरवले होते ते अभिनयच्या पथ्यावर पडले.
नाहीतर प्रतापराव त्याला बरोबर घेऊन गेले असते.
घरांतील सर्वांच लक्ष उमेदवारीच्या निकालाकडे होतं.
रात्रीच्या जेवणानंतर एक शोल्डर बॅग घेऊन बाहेर पडतांना अभिनयला काकूने हटकलं, तेव्हा तो दचकला पण सांवरून म्हणाला, “काकू, आजचा दिवस मळ्यातल्या घरी जाऊन झोपतो.
इथे कांही झोप येणार नाही. जाऊ ना काकू ?”
अभिनय आपली परवानगी मागतोय म्हणून खूष झालेल्या काकूंनी “सकाळी लवकर परत ये रे, बाळा.” असं म्हटलं.
अभिनय घरून निघाला तो ठरवल्याप्रमाणे मित्राकडे गेला.
कार आधीच आली होती.
अभिनयने चावी घेऊन कार सुरू केली व तो अंतराच्या गांवाच्या दिशेने निघाला.
प्रतापराव आणि तात्यासाहेब दोघांची बैठक दहाला सुरू व्हायची होती, ती अकरानंतर सुरू झाली.
श्रेष्ठींचा प्रतिनिधी ऐनवेळी तिथे हजर झाला होता.
तो आल्यावरच मिटींग सुरू झाली.
प्रतापरावांनी आपण पक्षासाठी काय केलं याची यादीच बाहेर काढली.
तात्यासाहेबांनी आपण पक्षाची ताकद ह्या भागांत वाढवली त्याची माहिती पुढे केली.
खरं तर हा सर्व देखावा आहे आणि श्रेष्ठींचा प्रतिनिधी सांगेल तेच ठरणार हे त्या दोघांनाही चांगलंच माहित होतं.
बोलणी चालू असतांनाच एक तरूण येऊन तात्यांच्या कानाशी लागला.
त्याला कुणीतरी अंतरा आणि अभिनय ह्यांच्या पलायनाची बातमी सांगितली होती.
तात्यांनी मिटींगमधूनच अंतराला फोन करायचा प्रयत्न केला पण तिचा फोन बंद होता.
मग त्यांनी सरळ श्रेष्ठींच्या प्रतिनिधीलाच सांगितलं, “मला प्रतापरावांशी खाजगी गोष्ट बोलायचीय.”
त्यांचा बदललेला सूर ओळखून त्यांनी परवानगी दिली.
तात्या प्रतापरावांना म्हणाले, “प्रतापराव, हे बरं नाही केलंत. तुमचा लाडका लेक माझ्या पोरीला कुठे घेऊन गेला, ते सांगा.”
प्रतापराव आश्चर्याने ओरडलेच, “माझा लेक, अभि ? तुमच्या लेकीला घेऊन पळाला ? तात्या हे खरं आहे काय ?”
तात्या घुश्शातच होते, “तुम्हाला माहित नाही, असा आव नका आणू.
तुमच्या परवानगीशिवाय असं होईल कां ? माझ्या पोरीला….”
प्रतापराव म्हणाले, “तात्या, आता माणसं पाठवतो मागावर आणि सकाळ व्हायच्या आत परत आणतो दोघांना.
हे नाही झालं तर आमदारकी तुमची.”
अभिनयला माहित होतं की प्रतापराव माणसं मागावर पाठवणार.
अभिनयने दोन तासाच्या प्रवासानंतर त्या कारमधेच वेश बदलला.
अंतरालाही एक काळा बुरखा दिला.
मग कार वाटेतच सोडून दिली आणि दोघे चालत पुढच्या एसटी स्टॅंडवर गेले.
तिथे दोघे थेट ठाण्याला जाणाऱ्या एस.टी.त बसले.
प्रतापरावांनी नुसती माणसंच पाठवली नव्हती तर मोबाईल वरून दोघांचे फोटो ठाण्यालाच पोलिस अधिकारी असणाऱ्या मित्राकडे पाठवले होते व वाटेतूनच दोघांना सुरक्षित परत पाठवायला सांगितले होते.
एस. टी.त बसतांना अभिनयने अंतराला मुद्दामच लांब एका बाईच्या बाजूला बसवले होते व स्वतः अगदी मागे बसला होता.
त्याची युक्ती सफल झाली.
वाटेत एस. टी. दोनदां थांबवली गेली.
साध्या वेशांतले पोलिस येऊन पाहून गेले.
त्यांना एकत्र बसलेली तरूण जोडी न दिसल्यामुळे व वेशांतरामुळे ह्या दोघांना ओळखतां आले नाही.
दोघे ठाण्याला पोहोचले.
मित्र रिक्षा घेऊन आला होता.
रिक्षाचालक दोघांना न्याहाळत होता.
मित्राच्या घरी रजिस्ट्रार तर आले होते पण आणखीही कोणी पाहुणे होते.
तो रिक्षावालाही आत आला.
ते सर्व साध्या कपड्यातील पोलिस होते.
एक अधिकारी म्हणाले, “तुम्हाला घरी पोंचवायच्या ॲार्डर्स आहेत आम्हाला.”
अभिनय म्हणाला, “पण आमचा गुन्हा काय ? आम्ही सज्ञान आहोत.”
तो रिक्शावाला झालेला पोलिस म्हणाला, “आरोप, वगैरे सर्व तिकडे ठरेल, चला.”
अभिनय-अंतरा निश्चयाने म्हणाले, “आम्ही नाही येणार. तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही.”
एवढ्यात अभिनयच्या मित्राचा फोन वाजला.
फोनवर प्रतापराव होते.
मित्राने फोन अभिनयकडे दिला.
प्रतापराव म्हणाले, “अभि, बेटा परत ये.
तिकडे परस्पर लग्न करून बापाची अब्रू घालवू नकोस.”
मागोमाग तात्या अंतराशी बोलले, “पोरी, बापाची अब्रू वेशीवर नको टांगू परत ये.
आम्ही तुमचं लग्न लावून देतो आठ दिवसांत.”
अंतरा म्हणाली, “बाबा, आम्ही परत आलो आणि तुम्ही दोघांनी पलटी मारली तर !”
तात्या आणि प्रतापराव दोघे गयावया करत होते.
शेवटी प्रतापराव म्हणाले, “अरे, अभि, आजचा पेपर तरी बघा. मी जाहिर रित्या तुमच्या विवाहाबद्दल सांगितलय.”
अभि-अंतराने पेपर पाहिला.
त्यांना शेवटच्या पानावर गळाभेट घेणाऱ्या तात्या आणि आबांचा फोटो दिसला.
खाली बातमींत लिहिलं होतं, ‘———- विधानसभा मतदार संघातून XXX पक्षातर्फे तात्यासाहेबांची उमेदवारी जाहीर करण्यांत आली.
पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी प्रतापरावांना बहुदा पुढील निवडणुकीत लोकसभेची उमेदवारी मिळेल.
प्रतापरावांनी पत्रकारांना सांगितले, “आमच्या पक्षातर्फे जाहिर झालेल्या तात्यासाहेबांच्या उमेदवारीला आमचा संपूर्ण पाठींबा राहिल.”
ते पुढे असंही म्हणाले, “लौकरच तात्यासाहेब आमचे व्याही होणार आहेत.”
प्रेमाची परीक्षा पूर्ण देण्याआधीच पास झालेल्या अभिनय आणि अंतरानी भान विसरून परस्परांना मिठीत घेतलं, तें कधीच वेगळं न होण्यासाठी.
अरविंद खानोलकर.
३१ डिसेंबर २०२०
वि. सू. – कथेतील पात्रे, प्रसंग, घटना सर्वस्वी काल्पनिक आहेत.
कांही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
Leave a Reply