नीलम निघून गेल्यावर प्रतिभा आपल्या खोलीत जाऊन आडवी पडली असता तिच्या मनात विचार आला की रमेश भाऊंच्या बाबतीत सारेच इतके अस्वस्थ का आहेत? मी त्यांचे बरेच साहित्य वाचले आहे किती नावाजलेले तरुण लेखक आहेत ते! किती छान प्रेम कथा आणि कविता लिहितात त्यांच्या प्रत्येक कथेतील नायिका मनीषा तिच्याबद्दल त्यांना विचारायचय मला! चला काय योगायोग आहे माझा सर्वाधिक आवडता लेखक माझा दीर आहे. आज संध्याकाळी मी त्यांना भेटले की मला माझ्या कितीतरी अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळतील… प्रतिभा तिच्या सासूबाईसह रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होती.
संध्याकाळी सहाच्या सुमारास विजय कामावरून येताच प्रतिभाच्या हातचा गरमागरम चहा पिऊन कोणालातरी भेटायला घराबाहेर निघून गेला. त्यानंतर रमेश येताच प्रतिभा तयार होऊन त्याच्यासह रमेशच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी गेले. अजयच्या मामा – मामीने रीती रिवाजाला साजेल असचं त्यांचं भव्य स्वागत केले पण नेमका तेव्हाच रमेश कोठेतरी बाहेर गेला होता. रमेशची बहीण सोनल आपल्या वहिनीला तिचं संपूर्ण घर दाखवायला घेऊन गेली. वरच्या मजल्यावर रमेशची खोली होती. त्या खोलीत रमेशचा एक छानसा फोटो होता तो पाहून तो रमेशचाच आहे याची प्रतिभाने सोनलकडून खात्री करून घेतली. निदान त्या फोटोत तरी रमेश राजबिंडा एखाद्या अल्लड मुलासारखा दिसत होता. एखाद्या मोठ्या लेखकाचा एकही भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्याच्या खोलीत बरीच पुस्तके अस्ताव्यस्त पडलेली होती. त्यातील एक कथासंग्रह प्रतिभाने हळूच उचलला अर्थात त्याचा लेखक रमेश जाधवच होता. त्या खोलीच्या भिंतीवर अनेक गौरव पत्रे दिमाखात डोलत होती. त्या खोलीच्या खिडकीतून समोरचा सर्व परिसर स्पष्ट आणि अतिशय मनमोहक दिसत होता. त्या खिडकीतून प्रतिभा बराच वेळ बाहेर पहात होती. अजूनही रमेशचा कथासंग्रह प्रतिभाच्या हातातच होता. तो मी घेऊ का वाचायला? म्हणत सोनलची परवानगी काढली असता सोनल जवळ – जवळ तिच्यावर रागावलीच आणि तिला म्हणाली, वहिनी हे ही तुझेच घर आहे! परवानगी काय मागतेस? इतक्यात दारावरची बेल वाजताच दादा! आला वाटतं!! म्हणत सोनल खाली धावली. तिच्या पाठोपाठ प्रतिभाही खाली उतरली.
रमेश आपल्या समोर उभा आहे यावर प्रतिभाचा विश्वासच बसत नव्हता. रमेश प्रतिभाकडे पहात एकदाच हसला आणि त्याने अजयला प्रेमाने आलिंगन दिले आणि तो कपडे बदलायला गेला. तोपर्यत मामीने जेवण वाढायला घेतलं. जेवण झाल्यावर रमेश अजय आणि प्रतिभाला त्याच्या खोलीत घेऊन गेला त्याच्या खोलीतून आता रात्रीचा चंद्र आणि चांदण्या अगदी स्पष्ट दिसत होत्या. अजय रमेश सोबत गप्पा मारत असताना प्रतिभाने खिडकीतून बाहेर पहात असतानाच रमेशला प्रश्न केला, रमेश भाऊ तुम्ही आमच्या लग्नाला का आला नाहीत? इथे घरीही कोणीतरी थांबायला हवं होत, हे ही एक कारण होत आणि मी खरं म्हणजे कोणत्याच कार्यक्रमाला हल्ली उपस्थित रहात नाही. इतकं बोलून तो गप्प झाला म्हणून त्याला पुन्हा बोलतं करावं म्हणून प्रतिभाने आणखी एक प्रश्न विचारला सध्या कोणत्या विषयावर लिहिताय? आजच्या वर्तमानपत्रात तुमची प्रकाशित झालेले कविता वाचली ती फारच छान होती! मला खूपच आवडली! त्यावर रमेश म्हणाला, धन्यवाद प्रतिभा! तुला वाचनाची आवड आहे हे ऐकून खूप बरं वाटलं, सध्या मी सामाजिक विषयावर एक कादंबरी लिहितोय! या अशा अनेक विषयावर प्रतिभाने रमेशशी चर्चा केली पण एकदाही त्याच्या चेहऱ्यावर हसू फुललेलं प्रतिभाला दिसले नाही. प्रतिभासोबतची त्याची साहित्यिक चर्चा छान रंगली होती. त्याला आत्मविश्वासाने बोलताना पाहून मामा- मामी, सोनल आणि अजयही समाधानी दिसत होते.
रात्रीचे दहा वाजताच सर्वांचा निरोप घेऊन ते घरी आले तेव्हा विजय बाहेर सोफ्यावर टी. व्ही. पहात बसला होता त्याने प्रतिभाकडे पहात तिला प्रश्न केला काय वहिनीसाहेब भेटलात का तुमच्या रमेश भाऊंना? बोलला का काही की त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले होते? आज तुला भेटला तो रमेश एक सुप्रसिद्ध लेखक आहे आणि मी ज्या रमेशला ओळखत होतो तो माझा लाडका भाऊ आणि जिवाभावाचा मित्रही होता, अल्लड, विनोदी, उत्साही आणि टवाळखोर! मला आताचा त्याचा पडलेला निरुत्साही चेहरा पहावत नाही म्हणून मी हल्ली टाळतो त्याला. हे विजय रागात बोलत होता पण त्याचे डोळे दाटून आले होते. ते पुसत प्रतिभा आणि अजयला शुभरात्री म्हणून तो झोपायला गेला.
अजय आणि प्रतिभा कपडे बदलून बिछाण्यावर आडवे होताच प्रतिभाने अजयला प्रश्न विचारला की ही मनीषा कोण आहे? त्यावर अजय मनिषा ती तुला कशी काय माहीत? त्यावर प्रतिभा म्हणाली, त्यांचा प्रत्येक कथासंग्रह ते मनिषालाच अर्पण करतात म्हणून विचारलं! त्यावर अजय म्हणाला, मनिषा आहे नाही होती. ती आता या जगात नाही. पाच वर्षांपूर्वी एक आजारपणात तीच निधन झालं. रमेशच तिच्यावर आणि तिचं रमेशवर जीवापाड प्रेम होतं. ती रमेशच्या समोरच्याच घरात राहायची हल्ली ते घर बंदच असतं. मनिषा रमेशहून दोन वर्षांनी लहान होती आम्ही सर्व एकाच शाळेत होतो. आमच्यात खूप घट्ट मैत्री होती ती अभ्यासात खूपच हुशार होती तरी ती अभ्यासात रमेशची मदत घेत असे. ते दोघे नक्की एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते मलाही नाही सांगता येणार! दहावीत ती शाळेत पहिली आली होती शाळेत असतानाच तिच्या कविता वर्तमानपत्रात प्रकाशित होऊ लागल्या होत्या. कॉलेजात गेल्यावर तिचे लेखही प्रकाशित होऊ लागले. तोपर्यत विजय त्याच बी.कॉम.च शिक्षण पूर्ण करत होता.
मनिषा एक नवोदित लेखिका म्हणून प्रसिद्धीस येत असताना रमेश तिचा फक्त चांगला वाचक होता. एक मोठी लेखिका होणं हे मनिषाचं स्वप्न होतं. रमेश आणि मनिषा जरी एकमेकांच्या प्रेमात असले तर त्यांच्यात प्रेम हा विषय सोडून सर्व विषयांवर चर्चा व्हायची! त्या दोघांची प्रेमकथा जगावेगळी आणि कोणाचीच नजर लागू नये अशीच होती. त्यांच्या प्रेमाला कधीच कोणाचा कसलाच विरोध नव्हता. उलट सर्वाना त्यांच्या प्रेमाचा हेवा वाटायचा.
पदवीधर झाल्यावर विजय एका बँकेत कामाला लागला. रामेशवर तशी कोणाची खास जबाबदारी नव्हती त्यामुळे त्याने मानिषाशी तीच शिक्षण पूर्ण होताच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे मानिषाही भयंकर खुश होती. पण त्यांचा आनंद कदाचित नियतीला मान्यच नव्हता एक दिवस अचानक मनिषा आजारी पडली आणि तिचा आजार दिवसेंदिवस वाढत गेला आणि एक दिवस अचानक तिने या जगाचा निरोप घेतला. तीच अचानक जाणं रमेश सहन करू शकला नाही आणि कित्येक महिने तो भ्रमिष्ठा सारखा वागत होता हळू हळू तो सावरला पण आपलं हसू आणि आनंद तो कायमचा गमावून बसला…
— निलेश बामणे.
Leave a Reply