रमा नुकतीच पदवीधर झाली होती आणि एका वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून नुकतीच रुजू झाली होती. ती तिच्या वर्तमानपत्रासाठी एका मुलाखतीच्या शोधात होती. त्याच संदर्भात ती प्रतिभाशी बोलत असताना आई मध्येच म्हणाल्या, “मी सुचवू का? अगं! तुला मुलाखत हवी ना? मग! आमच्या रमेशची घे ना?” त्यावर रमा, “कोण रमेश?” म्हणताच प्रतिभा म्हणाली, “अगं! तरुण लेखक विजय जाधव! ते माझे दीर आहेत. अजयचे मावस भाऊ!” त्यावर उत्साही होत रमा म्हणाली, “रमेश जाधव! तुझे दीर आहेत? आमच्या वर्तमानपत्रात त्यांचे लेख प्रकाशित होत असतात पण ते कधीच कोणाला मुलाखत देत नाहीत, मी त्यांची सर्व पुस्तके वाचलेत माझे खूपच आवडते लेखक आहेत ते, मुलाखत जाऊदे! ती कोणाचीही घेता येईल पण विजय जाधवना भेटण्याची संधी मी नाही गमावू शकत. मला एकदातरी भेटायचं आहे त्यांना.” त्यावर आई प्रतिभाला म्हणाल्या, “रमेशला फोन लाव आणि मी ताबडतोब भेटायला बोलवलंय सांग.”
प्रतिभाने फोन करताच पुढच्या मिनिटाला दारावरची बेल वाजली रमाने पुढे होत दरवाजा उघडला तर दारात एखाद्या नायकासारखा दिसणारा राजबिंडा पुरुष उभा होता. तो रमेश असावा याबद्दल रमाला खात्रीच वाटली नव्हती पण प्रतिभाने रमेश भाऊ अशी हाक मारल्यावर तिची खात्री पटली. “काय काम होत आत्या! इतक्या तातडीने बोलावलस?” त्यावर आई म्हणाल्या, “काही नाही रे ही रमा!” रमाने, “हाय!” म्हणत हात मिळवला, “प्रतिभाची मावस बहीण आहे तिला तिच्या वर्तमानपत्रासाठी तुझी मुलाखत हवी होती.” रमेश रामाकडे पहात रुक्षपणे म्हणाला, “हं! विचारा प्रश्न!” रमा: “नुकताच तुमचा एक कथासंग्रह प्रकाशित झाला त्याबद्दल प्रथम तुमचे अभिनंदन! त्या कथासंग्रहा बद्दल तुम्ही काय सांगाल?” रमेश : “धन्यवाद! काही खास नाही माझ्या इतर कथासंग्रहासारखाच हा ही प्रेम कथांचा संग्रह आहे.” रमा: “सध्या तुम्ही एक कादंबरी लिहित आहात ती कादंबरी कोणत्या विषयावर आधारित आहे?” रमेश : “ती कादंबरीही एका प्रेमकथेवर आधारित आहे.” रमा : “तुमच्या यापूर्वीच्या प्रत्येक कादंबरीतील नायिका कादंबरीच्या शेवटी मरते. या कादंबरीतील नायिकांची शेवटी मरणार का?” रमेश : “ते इतक्यात नाही सांगता येणार.” रमा : “तुम्ही विनोदी लिखाण का करत नाही?” रमेश : “विनोदी लिखाण करायला मुळात माणूस विनोदी आणि त्याहून अधिक आनंदी असावा लागतो मी तसा नाही म्हणून!” रमा : “तुम्ही अविवाहित आहात! तुमच्या प्रत्येक कथेतील नायिका मनिषा प्रत्यक्ष तुमच्या आयुष्यात आहे का?” रमेश : “मनिषा माझी प्रेयसी आज या जगात नसली तरी माझ्या हृदयातील तिची जागा मी कोणासाठीही रिकामी करणार नाही.” रमा : “दुसरी जागा निर्माण तर करु शकता ना?” रमेश : “तशी शक्यता कमीच आहे.”
हे असे अनेक प्रश्न उत्तरे झाल्यावर धन्यवाद म्हणत मुलाखत संपली आणि रमेश जायला निघताच रमाने त्याचा हात धरून त्याला खाली बसवले आणि ती म्हणाली, “आमच्या आवडत्या लेखकाबरोबर बसून चहा पिण्याची आम्हाला संधी नाही देणार?” रमेश खाली बसताच चहा पिता पिता त्यांच्यात घरगुती चर्चा रंगल्या मग सेल्फी वगैरे प्रकारही पार पडले. रमेश सोबत रमाही प्रतिभाचा निरोप घेऊन निघाली. प्रतिभा आणि आत्या त्यांना दारापर्यंत सोडायला गेल्या.
आत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता कारण भल्या भल्याना अशक्य वाटणार काम रामाने सोप्प केलं होत रमेशला बोलतं केलं होतं, मोकळं केलं होतं, त्याच्या चेहऱ्यावरून चोरीला गेलेलं हसू तिला परत मिळवून दिलं होतं. प्रतिभा सहज आईंना म्हणून गेली, “रमेश आणि रमा जोडी किती छान दिसते नाही!” त्यावर आई म्हणाल्या, “अगदी माझ्या मनातलं म्हणाली बघ!” आईने ओले झालेले डोळे पुसले. काहीतरी अचानक आठवल्यासारख्या आई प्रतिभाला म्हणाल्या, “आज रात्रीच्या गाडीने मी आणि विजय गावी जाणार आहोत! ह्याची तब्बेत थोडी बरी नाही आणि मी ही थोडे दिवस आराम करेन म्हणते, आता घराची काळजी नाही तू आहेस की सांभाळायला, विजय येईल चार – पाच दिवसात माघारी! तसं ही कविता तिकडेच आहे म्हणजे त्याचाही जीव लागत नसेल इकडे.”
ठरल्याप्रमाणे आई आणि विजय त्यारात्री गावी निघून गेले. आता घरात प्रतिभा आणि अजय दोघेच आणि एकांत होता. त्यामुळे त्यारात्रीचा प्रत्येक क्षण ते दोघे मनसोक्त मनमुराद जगले… आठवडा झाला तरी विजय काही गावावरून परत आला नाही. एका दुपारी प्रतिभा घरात एकटीच असताना दारावरची बेल वाजली प्रतिभाने धावत जाऊन दरवाजा उघडला तर दारात ” मधुरा ” तिची मोठी नणंद उभी होती. एक वर्षापूर्वीच तिने नवऱ्याकडून घटस्फोट घेतला होता आणि आता पुण्यातील एका सेवाभावी संस्थेत कामाला राहिली होती. प्रतिभाने लगेच तिच्या हातातील बॅग घेत तिला आत घेऊन दरवाजा बंद केला आणि त्या दोघी आत येताच मधुरा समोरचया सोफ्यावर बसली. प्रतिभा तिचे सामान आतल्या खोलीत ठेऊन तिच्यासाठी सरबत घेऊन आली.
इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजली प्रतिभाने दरवाजा उघडला तर दरात सोनल होती तिला आत घेत प्रतिभा सोनलला म्हणाली, “आज बुवा! तुम्हांला आमची आठवण कशी काय आली?” त्यावर सोनल स्वतःला सावरत म्हणाली, “अगं! वहिनी मी बरेच दिवस तुझ्याकडे येते येते म्हणत होते पण अभ्यासातून वेळ मिळत नव्हता. आज कॉलेजला सुट्टी मारली म्हणून म्हटलं चला आपल्या लाडक्या वहिनीला जाऊन भेटूया. आले म्हणून बरं झालं मधुरा ताईचीही भेट झाली.” तिचं बोलणं संपत न संपत तोच मधुराने सोनलला प्रश्न केला. “आमचे लाडके बंधुराज कसे आहेत?” त्यावर सोनल थोड्या उत्साहात म्हणाली, “दादा! आता खूपच बदलला आहे, आता माझ्यासोबत पूर्वीसारख्याच मनसोक्त गप्पा मारू लागला आहे. म्हणजे तो आता माणसात येऊ लागला आहे. खरं म्हणजे मी त्याबद्दलच वहिनीला विचारायला आले होते. वहिनी! त्या दिवशी तुम्ही दादाला इकडे बोलावलत तेव्हापासून त्याच्यात हा बदल जाणवतोय! काय जादू केलीत त्याच्यावर?” त्यावर प्रतिभा म्हणाली, “काही जादू वगैरे केली नाही पण त्याच्यासोबत एक जादूगारीण गेली होती.” त्यावर उत्साही होत सोनल म्हणाली, “त्या जादूगारणीच नाव “रमा ” तर नव्हतं ना? नाही! हल्ली त्या रमाचा दादाला सारखे फोन येत असतात. तासन तास बोलत असतो तो तिच्याशी. आईतर त्या रमाचे सारखे आभार मानत असते आणि मनातल्या मनात तिला आशीर्वाद देत असते, आहे कोण ही रमा?? मला तिला प्रत्यक्षात भेटण्याची खूप इच्छा आहे.” त्यावर प्रतिभा म्हणाली, “रमा माझी मावस बहीण आहे. तेवीस चोवीस वर्षाची आहे. पदवीधर झाल्यावर एक वर्तमानपत्रात पत्रकार आहे. तुझ्या दादाची सर्वच्या सर्व पुस्तके तिने वाचली आहेत. इतकंच नव्हे तर तिला मनीषाबद्दलही सर्व माहित आहे. तुझ्या दादाच्या ती प्रेमात पडली आहे तुझी वहिनी होण्याची तिची इच्छा आहे. पण तुझा दादा तिच्यासोबत फक्त आणि फक्त साहित्यावरच चर्चा करतो त्यामुळे त्यांच्या प्रेमाची गाडी पुढे सरकत नाही. आमच्या लग्नाच्या अल्बम मध्ये तिचा फोटो आहे दाखवते नंतर तुला.”
— निलेश बामणे.
Leave a Reply