हे सारं ऐकल्यावर मधुरा म्हणाली, “रमा गोड मुलगी आहे. माझी चांगली मैत्रीण आहे मी बोलते रमेशशी आणि रमाशीही, रमेश माझा शब्द खाली पडू देणार नाही आणि आता त्याला या जगाचा सामना करावाच लागेल मनिषाला विसरून…रमा हीच त्याच्यासाठी योग्य जोडीदार आहे.” रमाचा फोटो पाहून तर सोनल खूप खुश झाली. आपल्या मोबाईलमध्ये तिच्या फोटोचा फोटो काढून ती आनंदाने निघून गेल्यावर प्रतिभा मधुराचा हात हातात घेत तिला म्हणाली, “ताई तुमच्यासारख्या सोज्वळ, प्रेमळ आणि सुंदर स्त्रीलाही नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याची वेळ यावी यावर विश्वास बसत नाही. त्यावर प्रतिभाचा हात आपल्या हातातून सोडवत जागेवर उभी रहात मधुरा म्हणाली, तुला दिसत तसं जग नाही आणि वाटतो तसा संसारही नसतो. आज स्त्री आकाशाला गवसणी घालत असली आणि कायद्याने स्त्रियांना कितीही अधिकार दिलेले असले तरी पुरुषांकडून स्त्रियांवर होणारे अन्याय काही कमी झालेले नाहीत. स्त्रियांवर अन्याय न करणारे पुरुष समाजात तुरळक आहेत हे उघड सत्य आहे. आजही प्रत्येक पुरुष स्वतःला संपूर्ण पुरुष समजत असतो आणि ज्या काही कमतरता असतात त्या फक्त स्त्रियांमध्ये असतात असे समजत असतो. आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी मी आई होऊ शकले नाही म्हणून मला वांजोटी म्हणून हिणवत माझा नवरा माझा छळ करू लागला प्रसंगी मला मारझोडही करू लागला. एक दिवस आमच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि मला सारेच असह्य झाल्यावर माझा तॊल सुटला आणि रागाच्या भरात मी त्याला म्हणाले, मी वांजोटी नाही तू नामर्द आहेस मी आई होऊ शकते याची मला खात्री आहे कारण लग्नाच्या अगोदर मी एकदा गर्भपात करू झाली आहे माझ्या त्या मुलाचा बाप कोण होता माहित आहे तुझाच चुलत भाऊ महेश! तुमच्या घरात साले सारे नामर्द भरलेत जे मर्द आहेत त्यांचा दुसऱ्यांच्या बायकांवर डोळे आहेत. त्यानंतर मीच स्वतःहून घटस्फोटासाठी अर्ज केला.” मधुराचे हे त्वेषाने बोलणे ऐकताना प्रतिभाला घाम फुटला पण तरीही भीत भीत तिने महेश? असा प्रश्न केलाच त्यावर स्वतःला सावरत मधुरा म्हणाली, “महेश हो महेश! महेशवर माझे शाळेत असल्यापासून प्रेम होते आमच्या प्रेमाला कोणाचाच कसलाच विरोध नव्हता. महेश दिसायला एखाद्या राजकुमारसारखा होता म्हणजे आहे. प्रेमात प्रियकर प्रेयसी जे – जे म्हणून करतात ते सारे आम्ही अनुभवले त्यातून मिळणारा प्रत्येक आंनद आम्ही उपभोगला. आम्ही लग्न करण्याच नक्की केलं होतं. महेश आणि माझ्यात एका नाजूक क्षणाला जे व्हायला नको ते झाले आणि मी गरोदर राहीले. पण ते वेळीच लक्षात आल्यामुळे आम्ही ते निस्तरले पण लगेच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या दरम्यान त्याच्या भावाचं लग्न झालं. प्रत्येक पुरुष लबाड असतो हे खोटं नाही महेशही लबाड निघाला. इकडे मी त्याला सर्वस्व अर्पण केलेले असतानाही त्याने माती खाल्ली. त्याला त्याच्या वहिनीसोबत माती खाताना त्याच्या भावानेच पकडले आणि त्याचा गाजावाजाही केला. तीही महेश पासून गरोदर होती पण महेशच्या आईने सारी सारवासारव करून तिचा गर्भपात करून तिला महेशच्या भावाला स्वीकारायला भाग पाडले. मी मात्र भयंकर चिडले होते त्या रागाच्या भरात त्याच्यासोबत लग्नाला नकार दिला त्याच्या आईने ताबडतोब त्याचे नात्यातील एका मुलीशी लग्न लावून दिले. मी ही मग नाईलाजाने महेशच्या चुलत भावाशी लग्न केले जो नामर्द होता. नंतर कळले महेशचा भावही तसाच होता. आता मला वाटते मी तेव्हा महेशला लग्नाला नकार देऊन चूक तर नाही ना केली कारण या सगळ्यात विनाकारण फक्त माझाच बळी गेला. आता मला कळतंय जगाचा अभ्यास केल्यावर कित्येक गोष्टी वाटतात तितक्या सोप्प्या आणि दिसतात तितक्या साध्या नसतात.”
मधुरा पुण्याला निघून गेल्यावर काही दिवसांनी रमा प्रतिभाला भेटायला आली असता तिने रमाशी तिच्या आणि रमेशच्या प्रेमाबद्दल चौकशी केली असता रमा म्हणाली, “रमेश मला रोज न चुकता फोन करतो, पण आमच्यात प्रेम या विषयावर सोडून बाकी सर्व विषयांवर चर्चा होते, मला तर आता हे सारं असह्य होतंय कधी – कधी वाटत एकदाचं काय ते विचारून एक घाव दोन तुकडे करून टाकावे पण नाही जमत कारण त्याच्यावर मी इतकं प्रेम करते की मला त्याच्यावर रागावणंही आता जमत नाही. त्याचं माझ्यावर प्रेम नसेल तर हरकत नाही पण निदान आमच्यातील मैत्रीचं नातं अबादीत राहावं म्हणून मी प्रयत्नशील आहे. त्याच्याशी रागाने नाही पण मैत्रीच्या नात्याने तरी या संदर्भात स्पष्ट बोलावं म्हणून मी त्याच्या घरी गेले होते, मला भेटून त्याच्या आईला आणि बहिणीला इतका आनंद झाला होता की कुठे ठेऊ आणि कोठे नको! मला वाटतं मी रमेशच्या प्रेमात आहे हे त्यांना माहित असावं बहुतेक पण रमेश घरी नव्हता त्यामुळे सोनलने मला त्याच अख्ख घर दाखवलं, तेव्हा मी रमेशच्या खोलीत मनिषाचा फोटो पाहिला काय सुंदर मुलगी होती, पाहता क्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावी इतकी! रमेश कडून त्याने मनिषाला विसरण्याची अपेक्षा करणे हा गाढवपणाच ठरेल. मी इकडे येताना सोनलला सांगून आलेय, मी आज संध्याकाळपर्यंत प्रतिभाकडे आहे म्हणून…पाहूया आता मला भेटायला इकडे येतो का ते?”
तिचं बोलणं संपत न संपत तोच दारावरची बेल वाजली प्रतिभाने दरवाजा उघडला दरात रमेशला पाहून तिला प्रचंड आंनद झाला, ती त्यांच्यासाठी चहापाणी आणायला आत गेली असता, रमेश रमला म्हणाला, “तू घरी येणार होतीस तर तसं अगोदर फोन करून सांगायचं ना, मी घरीच थांबलो असतो. माझ्याकडे काही खास काम होतं का?” त्यावर रागाने रमा म्हणाली, “नाही! मी इकडे सहज फिरायला आले होते तर म्हटलं तुझ दर्शन घेऊन जाऊया!” तिचं बोलणं पूर्ण होण्यापूर्वीच रमेश म्हणाला, “अगं! मी सोनाराकडे गेलो होतो एक भेटवस्तू आणायला!” “कोणासाठी?” रमाने खोचक प्रश्न केला असता रमेश शांतपणे म्हणाला, “कोणासाठी म्हणजे काय? तुझ्यासाठी! उद्या तुझा वाढदिवस नाही का??” त्यावर रमा म्हणाली, “माझा वाढदिवस माझ्याही लक्षात नव्हता तुझ्या बरा लक्षात राहिला, बरं! काय आणलीस भेटवस्तू?” त्यावर रमेशने तिच्या डोळ्यासमोर अंगठी धरली असता प्रतिभा आतून बाहेर आली आणि तिने हे पाहिले आणि ती विनोदाने म्हणाली, “हे काय रमेश भाऊ ही अंगठी देऊन रमला लग्नाची मागणी घालताय की काय?” त्यावर रमा किंचित लाजल्यावर रमेश म्हणाला, “हो! वहिनी!! खरंतर मी उद्या रमाच्या वाढदिवशी तिला ही अंगठी देऊन लग्नाची मागणी घालणार होतो पण रमाचा चढलेला पारा बघता ते मी आजच करतो तुमच्या साक्षीने!” आणि रमेश तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला म्हणाला, “रमा माझ्याशी लग्न करशील?” पाणावलेल्या डोळ्यांनी रमा “हो!” म्हणाली.
त्यानंतर चहापाणी करताना प्रतिभाने रमेशला विचारणा केली की, “हा रमा सोबत लग्नाचा निर्णय अचानक कसा काय घेतला?” त्यावर रमेश म्हणाला,”अचानक नाही! मधुरा ताईने माझ्याजवळ रमाबद्दल चौकशी केली, तिच्या मनात माझ्याविषयी ओलावा आहे हे ही सांगितले, माझ्या हृदयातील मनिषाची जागा कोणी घेऊ शकणार नाही हे खरं असलं तरी ताईने मला रमासाठी एक वेगळी, स्वतंत्र तिच्या हक्काची नवीन जागा निर्माण करायला भाग पाडले. जीवन हे पाण्याच्या प्रवाहासारखे असायला हवे पण मनिषामुळे माझ्या जीवनाच्या प्रवाहाला कोठेतरी बांध घातला गेला होता. पण तो बांध रमाने हळूहळू फोडला. मी मनिषाला विसरणार नाही पण रमावर माझी पत्नी म्हणून अन्याय होऊ देणार नाही. रमा माझ्याशी संवाद साधत राहिली आणि मी तिच्या प्रेमात पडलो पण तिच्या मनात नक्की काय आहे हे माहीत नव्हते पण ताईने ते स्पष्ट केल्यावर मात्र मी रमाशी सरळ लग्न करण्याचाच निर्णय घेतला…कारण आता ती मलाच नाही तर आमच्या संपूर्ण कुटुंबाला हवी आहे.”
रमेश आता पुन्हा पूर्वीचाच रमेश झाला होता…रमा भयंकर आनंदी झाली होती तिला रमेश सोबत एकांतात मनसोक्त गप्पा मारायच्या होत्या म्हणून ती प्रतिभाचा निरोप घेऊन रमेशच्या पावलावर पाऊल टाकून निघून गेली…
— निलेश बामणे.
Leave a Reply