रमा आणि रमेश निघून गेल्यावर प्रतिभा बिछान्यावर आडवी झाली. इतक्यात दारावरची बेल वाजली. प्रतिभाने दार उघडलं तर दारात नीलम होती. तिला आत घेत प्रतिभाने दरवाजा बंद केला आणि तिला सरळ तिच्या खोलीत घेऊन गेली. आतल्या पलंगावर दोघीही डोक्याखाली उशी घेत आडव्या झाल्या. थोडी मान उंचावून प्रतिभा निलमला म्हणाली, “आता कॉलेज सकाळचं असणार म्हणजे दुपारी तुमच्याकडे बराच निवांत वेळ असेल त्यातील एखादा तास ह्या बिचाऱ्या वाहिनीसाठी काढा म्हटलं! मला एकटीला घरात कंटाळा येतो आमच्या गावच्यासारख्या इकडे गंमती – जंमती नाहीत.”
त्यावर सावरून बसत नीलम म्हणाली, “वहिनी सांगना तुझ्या गावच्या गंमती – जंमती!” त्यावर प्रतिभा म्हणाली, “नीलम तू आमच्या गावचं घर पाहिलं नाहीस? या घरा एवढं तर आमच्या घराचं अंगण आहे. घरात मोठं स्वयंपाकघर, चार प्रशस्त खोल्या, पडवीत मोठा झोपाळा आणि गच्ची, आमचं घर डोंगराच्या एका कडेलाच आहे. तेथून खाली डोंगराच्या पायथ्याला संथ वाहणारी नदी जिला बारमाही पाणी असते. नदीच्या कडेलाच शेकडो वर्षांपूर्वीच्या लेण्या ज्या पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येतात. आमच्या घराच्या पुढच्या दरवाज्यातून उगवतीचा सूर्य आणि संध्याकाळी मावळतीचा सूर्य रोज दिसतो. आकाशातील चंद्र तो ही पाहता येतो रात्री काचेच्या झरोक्यातून. घरासमोर छोटीशी बाग त्या बागेत अनेक फुलझाडे आहेत आणि समीरच्या जागेतील आंबा फणसाची झाडे. आमच्या घरापासून थोड्या अंतरावर आमच्या गावाचे देऊळ आहे. त्या देऊळाच्या परिसरात एक गोड पाण्याची विहीर आहे आणि आजूबाजूला शेकडो वर्षे जुनी वडाची झाडे आहेत. इकडे मुंबईत पाणी मोजून वापरावे लागते पण आमच्या गावी पाण्याला काही तोटा नाही. वाटेल तेव्हा त्या पाण्यात जाऊन एक डुबकी मारून मनसोक्त पोहण्याचा आनंद घ्यायचा आणि पोहण्याचा कंटाळा आला की गळ टाकून मासे पकडत राहायचे. आणि पकडलेले मासे मनसोक्त खायचे! पूर्वी विजय जेव्हा त्याच्या मावशीकडे गावी यायचा तेव्हा तो ही यायचा माझ्यासोबत मासे पकडायला. तो पाण्याला फारच भित्रा होता मी त्याला पोहायला शिकवून त्याची पाण्याची भीती दूर केली. आमच्या गावाच्या टेकडीवर एक फार जुने शंकराचे मंदीर आहे. तेथे जाऊन आम्ही तासन – तास गप्पा मारत बसायचो. विजय आणि माझ्यात जमलेल्या गट्टीमुळेच विजयच्या मावशीने मध्यस्ती करून अजय करीता माझा हात मागितला. मला इतक्या मोकळ्या वातावरणात राहायची सवय लागली आहे की इकडे माझा जीव गुदमरतो! न राहून सारखी आई – वडील, गुरं- ढोरं, कोंबड्या, झाडं, फुलं वेली, नद्या नाल्यांची साऱ्यांची आठवण येते. कधी एकदा त्या साऱ्यांना भेटते – पाहते असं झालं आहे.” “वहिनी! तुला तुझ्या भावाची आठवण येत नाही?” निलमने अचानक प्रश्न केला. त्यावर हसून प्रतिभा म्हणाली, “त्याची आठवण कशी येईल तो लहानाचा मोठा मुंबईतच काकांकडे झाला. आणि आता आमची भेट होते अधून मधून आणि रोज फोनवरही बोलतो की आम्ही! आमच्या काकांना एकच मुलगी आहे तिचं नाव प्रेरणा! आमच्या दोघींच्या नावावरून आमच्या भावाचं नावं ठेवलं प्रणय! प्रेरणा नुकतीच बी.ए. झालेय तिला अभिनयाची खूप आवड आहे. निलेश भाऊंना सांगून मी तिला एखाद्या नाटकात संधी द्यायला सांगणार आहे. थांब मी तुला प्रणय आणि प्रेरणाचा फोटो दाखवते.”
प्रणयचा फोटो पाहून नीलम फक्त जागेवर उठायची शिल्लक होती कारण प्रणय तिच्या कॉलेजात शिकत होता आणि एका कार्यक्रमात नुकतीच त्याची ओळख झाली होती. पण निलमने हे प्रतिभाला सांगण्याचा मोह आवरला आणि तिचा मोबाईलची रिंग वाजल्यावर ती प्रतिभाचा निरोप घेऊन निघून गेली आणि प्रतिभा बिछान्यावर आडवी झाली…. आता प्रतिभाच्या मनात विजय आणि कविताच्या लग्नाचा विचार घोळू लगला होता. ती स्वतःशीच विचार करत होती, “आता विजयला लग्नासाठी आग्रह करायला हवा! कविता या घरात आली की मला कामात थोडी मदत होईल आणि माझा एकांतवास थोडा कमी होईल.”
इतक्यात दारावरची बेल वाजली प्रतिभाने दार उघडलं तर दारात चक्क कविता उभी होती. तिला आत घेत प्रतिभा म्हणाली, “कविता तुला शंभर वर्षे आयुष्य आहे मी आता तुझीच आठवण काढत होते इतक्यात तू प्रत्यक्ष हजर झालीस.” त्यावर कविता लडिवाळपणे म्हणाली, “माझी आठवण यायला काही खास कारण?” त्यावर प्रतिभा चटकन म्हणाली, “तसं काही खास कारण नाही, मी विचार करत होते आता तुझ्या आणि विजयच्या लग्नाचा विचार करायला हवा! बर! त्याबद्दल तुला काय वाटतं?” त्यावर कविता म्हणाली, “मला काय वाटणार? मी तर एका पायावर लग्नाला तयार आहे पण विजय तयार व्हायला हवा ना?? तो अजूनही स्वतःला लहानच समजतो.” त्यावर तिला धीर देत प्रतिभा म्हणाली, “मी समजवते त्याला पण तू अचानक आज विजय नसताना इकडे यावेळेला कशी काय आलीस?” त्यावर कविता म्हणाली, “प्रतिभा ताई येत्या रविवारी आमच्या घरी सत्यनारायणाची पूजा आहे त्याचेच आमंत्रण द्यायला आले होते. आता येतानाच रमेश आणि निलेश भाऊंकडे जाऊन आले, मी गेले तेव्हां रमेश भाऊ घरीच होते. त्यांनी आज माझी फक्त विचारपूस केली नाही तर माझ्यासोबत चक्क गप्पा मारल्या. माझा तर विश्वासच बसत नव्हता. न राहून हा चमत्कार कोणी केला म्हणून सोनलकडे चौकशी केली तेव्हा ती म्हणाली, “हा चमत्कार तुझ्या मावस बहिणीने म्हणजे रमाने केला आहे. प्रेमात किती ताकद असते नाही ते एखाद्याचं आयुष्य निर्जन वाळवंट करू शकते आणि फुललेली बागही करू शकते. लवकरच ते लग्न करणार आहेत म्हणत होती. निलेश भाऊ नाही भेटले पण नीलम भेटली ती म्हणाली, “मी आत्ताच वहिनीला भेटून आली.” कालच मी आणि विजय निलेश भाऊंच्या नवीन नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो नाटक संपल्यावर आम्ही एका हॉटेलात जेवायला गेलो तर सर्व लोक आमच्याकडे कुतूहलाने पाहत होते. त्यांना त्याची सवय आहे पण मला अवघडल्यासारखं होत होत. मी आता येण्यापूर्वी विजयला फोन लावला होता, तो अर्ध्या तासात येतो म्हणाला, तोपर्यत आपण गप्पा मारू!”
त्यांच्या गप्पा रंगल्या इतक्यात दारावरची बेल वाजली, कविताने धावत जाऊन दार उघडलं. विजयने तिला अर्धवट अलिंगन दिलं आणि बॅग टेबलावर ठेऊन तो ताजातवाना होऊन बाहेर आला तोपर्यत प्रतिभाने चहा – नाश्ता तयार केला. चहा पिता – पिता प्रतिभाने लग्नाचा विषय छेडला असता, विजय म्हणाला, “वहिनी तू म्हणत असशील तर मी कविताशी उद्याही लग्न करेन पण थांबावं म्हणतोय! कदाचित कवितापेक्षा सुंदर मुलगी माझ्या आयुष्यात आली तर?” हे ऐकून कविता रागावली आणि पाय आपटत निघून गेल्यावर प्रतिभा म्हणाली, “ही अशी थट्टा बरी नव्हे”, त्यावर विजय म्हणाला, “ती रागावली की अधिक सुंदर दिसते आणि ती काही गेली नसेल बघ पुढच्या मिनिटाला माघारी येईल.” आणि चक्क कविता माघारी आली आणि विजयला म्हणाली, “चला महाराज येतायना मला घरी सोडायला?” त्यावर विजय प्रेमाने म्हणाला, “जी राणीसरकार!”
— निलेश बामणे.
Leave a Reply