विजय कविताला तिच्या घरी सोडून माघारी आल्यावर विजय प्रतिभाला म्हणाला, “वहिनी तू म्हणालीस ते बरोबर आहे आता मला कवितासोबत लग्न करायला हवं, मी दादाच लग्न होण्याचीच वाट पाहत होतो. आमचं प्रेम आहे वगैरे ठीक आहे पण समाज आजही प्रेमाकडे संशयाने पाहतो. आपण जिच्यावर प्रेम करतो तिला लोकांनी असं संशयाने पाहणे मला योग्य वाटत नाही. लोकांच्या नजरा चुकवत प्रेम करण्यात एक मजा असते पण एका मर्यादेपर्यत! त्यानंतर प्रेमाला नात्याची वेसण घालावीच लागते. आता आपण बोलू प्रतिभाच्या घरच्यांशी आणि मग ठरवू आई – बाबा गावावरून आल्यावर काय ते!”
इतक्यात विजयचं मोबाईल खणखणला आणि तो बाहेर जायला आणि अजय घरात यायला एक गाठ झाली. सोफ्यावर बसता – बसता अजय प्रतिभाला म्हणाला, “प्रतिभा उद्या तुझे काका – काकी, प्रणय आणि प्रेरणा आपल्याकडे येणार आहेत आपल्याला भेटायला! आज त्यांचा तसा फोन आला होता आणि हो रात्रीच्या जेवणाला थांबव त्यांना एकत्रच जेवू खूप दिवसांनी मस्त गप्पा मारू!”
हे ऐकून प्रतिभाला खूप आंनद झाला. रात्री झोपता – झोपता ती उद्या स्वयंपाक काय करायचा याचा विचार करत होती आणि तो विचार करत करतकरतच ती अजयच्या कुशीत झोपी गेली. दुसऱ्या दिवशी दुपारी प्रतिभाचे काका- काकी प्रणय आणि प्रेरणा घरी आले त्यांनी प्रतिभासाठी बऱ्याच भेटवस्तू आणल्या होत्या. ते दुपारचं जेवण करूनच आल्यामुळे ते सर्व प्रतिभाशी निवांत गप्पा मारत होते गप्पा मारता – मारता प्रतिभाने प्रेरणाला तिच्या नाटकाच्या छंदा विषयी विचारले असता ती म्हणाली, “मला आयुष्यात एकतरी व्यवसायिक नाटक करायचे आहे.” त्यावर प्रणय मध्येच म्हणाला, “भले ते नाटक डब्यात गेले तरी चालेल.” त्यावर प्रेरणा म्हणाली, “गेलं तर जाऊदे तुझं काय जातंय?” त्यावर प्रणय म्हणाला, “माझं नाही जाणार पण माझ्या भावोजीचं जाईल ना? नाहीतर दुसरा कोणी तुला घेऊन नाटक करणार नाही!” त्यावर प्रेरणा रागावून त्याला मारायला उठली असता प्रणय येथे जवळच माझा एक मित्र राहतो त्याला भेटून येतो म्हणून निघून गेला. त्यावर प्रेरणा म्हणाली, “हा नक्कीच मित्राला नाही मैत्रिणीला भेटायला गेला असेल!” त्यावर काकी म्हणाल्या, “तो जाऊदे त्याचं वय आहे मैत्रिणी फिरविण्याचं आणि तुझं लग्नाचं!”
विषयाला जोडून प्रतिभा म्हणाली, “काकी प्रेरणासाठी एखादा मुलगा पहिला आहे का?” “मुलगे हजार भेटतील पण हिला पसंत पडायला हवा ना! तूच बघ आता तुझ्या या लाडक्या बहिणीसाठी एखादा राजकुमार!” गप्पा मारता – मारता स्वयंपाक तयार झाला, त्या दिवशी अजय लवकर घरी आला, विजय त्याच्या ठरलेल्या वेळी आणि प्रणयही त्याच्या मित्राला भेटून वेळेत आला. जेवणाची ताटे वाढायला घेतलीच होती इतक्यात दारावरची बेल वाजली तर दरात निलेश उभा होता. प्रतिभाने त्याची ओळख करून देण्यापूर्वीच सर्व त्याला एक अभिनेता म्हणून ओळखत होते पण तो प्रतिभाचा दीर आहे हे माहीत नव्हते. प्रेरणाने तर चक्क पुढे होऊन त्याच्याशी हात मिळविला. प्रतिभाने खूपच आग्रह केला म्हणून तो त्यांच्यासोबत जेवायला थांबला आणि जेवता – जेवता प्रतिभा निलेशला म्हणाली, “निलेश भाऊ आमची प्रेरणा चांगली अभिनय करते कॉलेजात तिने अनेक नाटकात कामे केली आहेत एखादं व्यावसायिक नाटक तिला करायचं आहे तुमच्या ओळखीने काही झालं तर बघाणा!” “बस! काय वहिनी तू शब्द टाकलास, मी तो खाली पडून देईन का? माझ्या नवीन नाटकात मी तिला संधी देतो तीही मुख्य नायिका म्हणून उद्यापासून नाटकाच्या तालमीला ये! बाकी मी फोनवर सांगतो!!!” हे ऐकून प्रेरणा जाम खुश झाली कारण तिच्या स्वप्नातील नायक तिच्या इतक्या जवळ होता. प्रतिभालाही खूप आनंद झाला.
खूप गप्पा – टप्पा झाल्यावर ते माघारी निघाले असता सारेच त्यांना गाडी पर्यत सोडायला गेले. प्रेरणा निलेशला प्रेमाने शुभ रात्री म्हणाली आणि गाडीत बसता-बसता टाटाही केला… रविवारी कविताच्या घरी सत्यनारायणाच्या पूजेकरिता निलेश त्याची बहीण नीलम, रमेश त्याची बहीण सोनल, अजय- प्रतिभा आणि विजय एकत्र गेले. कविता त्यांचीच वाट पाहत उभी होती. कविताने प्रतिभाची ओळख तिच्या आई- वडिलांशी आणि तिच्या लहान भावाशी स्वप्नीलशी करून दिली. कविताचे आई – वडील प्रतिभाला खूपच प्रेमळ वाटले त्यांच्यासोबत तिच्या छान गप्पा रंगल्या. रात्री पूजेचा महाप्रसाद घेऊन ते सर्व निघाले वाटेत रमेशने सर्वाना आईसक्रीमच्या गाडीवर आइसक्रीम खायला थांबवले. त्यावेळी आईसक्रिम खाताना अजय आणि विजयचे डोळे पाणावले कारण पूर्वी ते तिघे मानिषासोबत रात्री गप्पा मारत भटकताना नेहमी याच गाडीवर आईसक्रीम खायचे. रमेशच्या डोळ्यातून तर अश्रू टप टप गळत होते पण सावरले त्याने स्वतःला. निलेश मात्र स्तब्ध होता. सर्वांनी विषय बदलत वेगळ्या विषयावर बोलायला सुरुवात केली आणि बोलता बोलता निलेशच्या घराजवळ आले आणि त्याच्या आग्रहाखातर त्याच्या घरी गेले.
काका मावशीला त्या सर्वाना एकत्र पाहून खूप आनंद झाला खास करून रमेशला. रमेशला पाहताच मावशी म्हणजे रमेशची आत्या म्हणाली, “काय रमेश तुझं लग्न ठरलं? दादा कालच बोलत होता, प्रतिभाची मावस बहीण आहे ना? म्हणजे नक्कीच तिच्यासारखी रूप आणि गुणवान असेल यात शंका नाही तरीही तिला भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. घेऊन एकदा मला भेटायला.” त्यावर रमेश म्हणाला, “आत्या तू म्हणालीस आणि मी नाही म्हणालो असं झालंय का कधी? उद्याच घेऊन येतो!” त्यावर सर्व मनमुराद हसले निलेश आणि निलमला त्यांच्या घरापर्यत सोडून घरी आल्यावर प्रतिभा स्वतःशीच विचार करत होती.
स्वप्नील आणि सोनल मध्ये काही असेल का? नाही पूजेत ते सारखे एकमेकांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्यात बऱ्यापैकी मैत्री आहे त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले नसेल ना? हल्ली प्रेम म्हटलं की प्रतिभाला धडकीच भरते. दुसऱ्या दिवशी प्रतिभा एकटीच घरी असताना सोनल आणि नीलम एकत्र तिला भेटायला आल्या. तिघी एकत्र बसून टी. व्ही. पहात असताना निलमने मध्येच विषय काढत प्रतिभाला प्रश्न केला.”वहिनी मध्यंतरी तुझे काका काकी आले होते ना घरी?” त्यावर प्रतिभा चटकन म्हणाली, “माझा भाऊ प्रणय आणि बहीण प्रेरणा पण आली होती. तू प्रणयला ओळखतेस ना?” त्यावर नीलम अडखळत म्हणाली “हो! पण तो तुझा भाऊ आहे हे मला माहित नव्हते. आम्ही कॉलेजच्या कार्यक्रमात एकत्रच निवेदन करतो. वहिनी! प्रणय तुझा सख्खा भाऊ आहे? स्वप्नीलचा खास मित्र आहे.” “आणि स्वप्नील तुझा!!” प्रतिभा मध्येच म्हणाली. त्यावर नीलम आणि सोनल भांबावल्या असता प्रतिभा म्हणाली, “मी काही आकाशातून नाही पडले, सगळं कळतं मला फक्त एक सांगते ते लक्षात ठेवा मैत्रीच्या झाडाला हमखास लागणारं फळ म्हणजे प्रेम असते पण तरीही ते फळ डोळे झाकून न खाता डोळसपणे खायला हवे! यापुढे मला मैत्रीण समजून जे आहे ते मोकळ्या मनाने वेधडक बोलत जा! अशी लपवाछपवी करायची काही गरज नाही!! प्रेम करा पण प्रेमासाठी त्याग कारायचीही तयारी ठेवा. तुमच्या दोघींची निवड योग्यच आहे म्हणून त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेऊ नका! पुरुष लबाड असतात हे न नाकारता येणार सत्य आहे त्यामुळे आपले प्रेम कोणी आपल्याकडून हिसकावून तर घेत नाही ना? यावर आपलं बारीक लक्ष असायला हवं!”
— निलेश बामणे.
Leave a Reply