प्रेमात कशिश आहे, कोशिश आहे, आतिश (बाजी) आहे
नि कधी कधी साजिशही आहे
आणि हे सारं करायला दैवी आशिषचीही गरज आहे
प्रेमात आमिष आहे, ते सामिषही (बऱ्याचदा) असू शकतं.
प्रेमात ईश आहे, इश्श्य तर आहेच आहे.
त्यात he नि she लागते
प्रेम wishही आहे नि विषही ते असू शकतं
प्रेम विशेष आहे, पण त्यातून ‘we’गेलं की शेष फारसं उरत नाही
प्रेम देवाचा प्रदेश आहे, त्याचा हृदयातून प्रवेश आहे
ते जिंकायला लागतो आवेश नि अभिनिवेषही
प्रेम आहे आस, प्रास (तहान), प्रयास-सायास, आभास सारं काही
प्रेम असतं आपल्याच आसपास
ते असल्यास आहे विश्वास, नसल्यास केवळ निःश्वास
प्रेमामध्ये नाद (दोन्ही अर्थाने) आहे, दाद आहे, एक उन्मादही आहे.
अखेर प्रेम हा विषय सादाचा आहे, वादाचा नाही
प्रेम आग आहे, एका अर्थाने नाग आहे
तो दागही आहे नि डागही (दागिना).
प्रेमात त्याग आहे, त्यात भागम्भाग आहे
पण इतकं सारं असूनही, प्रेम करणं भाग आहे.
प्रेमात (आपल्या माणसाला) डोळे भरुन पहावंसं वाटतं
त्याच्या/तिच्या वाटेकडे डोळे लावून बसावंसं वाटतं
न भेटल्यास डोळे भरुनही येतात. पण
इतकं सारं असूनही प्रेम आंधळं आहे म्हणतात
प्रेमाला नसतो बंध, बांधून मात्र आपल्याला ठेवतं
चव नसलेल्या प्रेमावाचून जीवन मात्र बेचव आहे.
प्रेमात आसक्ती आहे पण सक्ती नसावी
तो उपहार आहे, उपकार नसावा…
प्रेम आर्जवी व्हावं पण अवाजवी असू नये
प्रेम उन्नत असावं, उन्मत्त नको.
त्यात संवेदना जरुर असाव्यात, वेदना नकोत,
प्रेमात गुंतवणूक लागते पण गुंतागुंत नसावी
प्रेमात उमलून यावं-उन्मळून पडायची पाळी न येवो
प्रेम उदार असावं पण उधार नसावं
प्रेमाचं संक्रमण होऊ शकतं – आक्रमण करु नये
शेवटी प्रेम हा आसूसून जाण्याचा प्रकार आहे
-उसासून रहाण्याचा नाही
प्रेम देवासारखं आहे, शुद्ध, सर्वव्यापी पण अदृश्य,
अनादि, अनंत, असीम व अथांग.
आपल्या साऱ्यात अंश असला तरीही कुणातच नाही
प्रेम ज्ञानासारखं आहे – अपार, अथांग!
ते कणाकणाने जोडता येतं, एकमेकांत वाटल्याने वाढतं,
कितीही संपादन करा संपतच नाही
जितकं खोल जावं तितकी अधिक खोली वाढत जाते
जेवढं जास्त संपादावं तेवढा संतोष, समाधान, शांति, समृद्ध दृष्टी मिळते.
प्रेम असलं तर दाखवायला लागत नाही
कारण ते लपवावं म्हणून लपत नाही
नसलं तर मात्र दाखवूनही दिसत नाही
हे प्रेम आहे तरी काय?
ध्येय आहे की ध्यान
साध्य की साधन
आराध्य आहे की आहे आराधना
पूजनीय आहे प्रेम की आहे ही पूजा
प्रेम जसा साज आहे की आहे ती सजा
प्रेम माज निश्चित नाही वा नुसतीच मजा
प्रेम आहे सच्च्या भावनेची धारणा
अंत:करणाची एक प्रेरणा
एक अवगुंठित संवेदना नि त्याची निखळ आराधना
-यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(१९९९)
Leave a Reply