नवीन लेखन...

प्रेमगंध..

“प्रेम” या शब्दाचा इतका गैरवापर केला गेला आहे की प्रत्येक चरणावर या प्रश्नांबद्दल प्रश्न उठविले जातात. प्रेमाची तुलना वारंवार वासनाशी केली जाते. प्रेमाची तुलना मैत्री म्हणजे पक्की मैत्रीशी ही केली जाते. जर हे खरे प्रेम असेल तर ते कसे असेल..?

“प्रेम” हा शब्दच असा आहे की जो फक्त ऐकला तरी, आपल्या प्राणामध्ये एक तरंग उठायला लागते. प्रेम या शब्दातच एक अजब मिठास, एक अजब शीतलता, एक अजब सौंदर्य आहे. प्रेम हा असा शब्द आहे ज्याला आपण गमावू इच्छित नाही. प्रेम हे स्नेह, माया, वात्सल्य अशा अनेक भावनांचे मिश्रण आहे. प्रेम हे एक मजबूत आकर्षण आणि वैयक्तिक प्रतिबद्धतेची भावना आहे. एखाद्याच्या दयाळूपणा, भावना आणि स्नेह सादर करण्याचा हा एक मार्ग मानला जाऊ शकतो. खरोखर प्रेम हे एक चिरंजीवी ‘विश्वव्यापी तत्व’ आहे. ते कधी, कुठे, कोणावर, कसे होईल सांगता येत नाही. एखादी व्यक्ती ही कोणतीही वस्तू, प्राणी किंवा कार्य किंवा तत्व किंवा लक्ष्य यांवर प्रेम करू शकते ज्यापासून ती व्यक्ती जोडली गेली आहे..
 
सांसारिक व्यवहारात केवळ ‘प्रेमच’ मुलांना, कौटुंबिक सदस्यांना, सहकार्यांना, प्रत्येकास जिंकू शकते. इतर सर्व पद्धती बेकार ठरतील. आपण घरासमोर एखादे रोपटे लावले तर आपल्याला त्याचे प्रेमाने पोषण करावे लागेल. फक्त त्याला पाणी देऊन ते वाढू शकणार नाही. जर तुम्हाला त्याबद्दल प्रेम, काळजी असेल तर ते तुम्हाला सुंदर फुले देईल. असं हे प्रेम ‘मनुष्या’ला किती प्रभावित करु शकेल, याचा आपण विचार करू शकतो… प्रेमाची दुनिया ही निराळीच असते. यात कुणी योग्य मार्गाला लागतो तर कुणी वेडा होतो. प्रेमाच्या दुनियेत वाटेल ते घडू शकते.. शपथ घेतल्या जातात, कविता स्फुरतात, त्यागाला भरती येते, रणरणते ऊन चांदण्यासमान वाटू लागते, जीवाची बाजी लावली जाते. आपण कोणाच्या तरी प्रेमात पडावे, कोणीतरी आपल्यावर तुटून प्रेम करावे असे प्रत्येकाला वाटत असते. आपले प्रेम हे कोणाला दिसू नये, कोणी त्यात वाटेकरी असू नये, असे किशोरवयीन प्रेमिकांना वाटत असते. पण वडीलधाऱ्यांना अनुभवाअंती प्रेमाचा पंचनामा केल्याशिवाय राहवत नाही. आणि त्यामुळे दोन पिढ्यात तेढ निर्माण होते.
 
आजकाल निसर्गरम्य, प्रेक्षणीय स्थळे अशा अनेक ठिकाणी तरुण मुले-मुली सिनेमातील गाणी गाडीत लावून अंगविक्षेप करत नाचताना, अगदी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेली दिसतात. पण ही वासनांची जत्रा-भवयात्रा असते. ‘भावने’पासून सुरु होऊन जिचे रूपांतर विकारांतून उदभवलेल्या ‘अंत्ययात्रा’ मध्ये होत जाते. आज भरकटलेली तरुणाई एकतर्फी प्रेमातून स्वतःचे जीवन संपवताना किंवा समोरच्याला उध्वस्त करताना दिसत आहेत. यासाठी पालकांनी, इष्ट मित्र-नातेवाईकांनी त्यांना वेळ देऊन, मायेची ऊब त्यांना दिली पाहिजे. त्यांच्या मनातील पोकळी भरून काढण्यासाठी वात्सल्याने प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना नैतिक मूल्यांचे धडे दिले पाहिजेत, भावभावनांचे व्यवस्थापन करावयास शिकविले पाहिजे.
 
जे प्रेम फक्त सुख, सुविधांमुळे होते त्यात घनिष्ठता तर येते, परंतु त्यात काही जोश, उत्साह किंवा आनंद नसतो. जे प्रेम आकर्षणामुळे होते, ते क्षणिक असते कारण ते अनभिज्ञता आणि संमोहन यामुळे झालेले असते. यांत आकर्षणामुळे झालेला मोह त्वरित वितळायला लागतो आणि मग काही काळाने कंटाळा, भय, अनिश्चितता, असुरक्षितता आणि उदासीनता आणतो.
 
प्रेमाची भूक ही माणसाला जन्मापासून मरेपर्यंत असते. किंबहुना सर्वात पहिली भूक ही प्रेमाचीच असते. मूल मातेच्या उदरातून बाहेर आल्यावर पहिला टाहो फोडते ते दुधासाठी नव्हे, तर त्याला ‘मायेची उब’ हवी असते म्हणून. अखेरच्या क्षणीही माणसाला आपली प्रिय व्यक्ती जवळ असावी असे वाटते. असे खरे प्रेम हे पारिजातकाची प्रसन्नता प्रदान करते. ते कधी मावळत नाही, त्याला अंध आसक्तीची अवकळाही येत नाही.
 
स्त्री ही निसर्गतः खूप काळजीवाहू असते व पुरुष हा थोडा स्वाभिमानी व अहंकारी असतो. जेव्हा स्त्री पुरुषावर प्रेम करते तेव्हा पुरुषांच्या सर्वांगीण विकासासाठी ती पूर्णतः स्वतःला झोकून देते. ती त्याला सारख्या सूचना करू लागते. तिला वाटते ती जणू त्याचे संगोपनच करते आहे. तर पुरुषाला वाटते की, ती त्याला आपल्या मुठीत ठेऊ पाहतेय. स्त्री-पुरुषाच्या जडणघडणीत निसर्गतः फार मोठा फरक असतो, तो समजून घेणे फार गरजेचे आहे.
 
स्त्रियांना शिक्षणाची अधिक आवड असते, त्यांना अपशब्द उच्चारणे आवडत नाही. घरातील सर्वांची काळजी घेणे हे त्या आपले कर्तव्य समजतात. पुरुष कोणत्याही क्षणी घराबाहेर पडू शकतात, पण स्त्रियांना हे शक्य नसते. पुरुषांची अनेक कामे स्त्रिया करू इच्छितात, मात्र पुरुषांना स्त्रियांची कामे करावयास कमीपणा वाटतो. पुरुष थोडे आजारी पडले कि औषधोपचार आरंभ करतात, स्त्रिया मात्र अनेक आजार अंगावर काढतात. स्वार्थ हा भाव त्यांच्या मनात मूळ धरू शकत नाही. सेवा व समर्पण ही त्यांची नैसर्गिक वृत्ती असते. पुरुष विश्रांती घेण्यासाठी आतुर असतात. स्त्रियांना वेळ मिळाला तरी त्या काही ना काही काम करतच राहतात. विश्रांतीकडे कानाडोळा करतात. स्त्रियांना खूप बोलावेसे वाटते. पुरुषांच्या तिप्पट ते बडबड करत असतात व हे नैसर्गिकरित्या घडत असते. ‘पुरुषांच्या प्रेमाच्या अविष्काराची सुरुवात शरीराकडून सुरु होते, तर स्त्रीच्या प्रेमाचं अभिव्यक्तीकरण मनापासून सुरु होऊन शरीरापाशी थांबते.’
 
पुरुषांचा स्वभाव हा खोडकर व खेळकर असतो तर स्त्रियांचा स्वभाव हा नेहमी काळजी करणारा असतो. स्त्रियांच्या भाषेत तुलनेने सौम्यता, शालीनता अधिक असते. पुरुष काय वाटते ते स्पष्ट बोलतात. स्त्रिया आपल्या भावना स्पष्टपणे न सांगता, अप्रत्यक्षपणे व्यक्त करतात. स्त्रिया स्वतःच्या गरजा नाकारतात. कुटुंबात संघर्षांची ठिणगी पडू नये म्हणून त्या स्वतःच्या भावनांना दडपून टाकतात. ‘अनेक जोडपी एकाच मुद्द्यावरून वादविवादाला सुरुवात करतात आणि पाचच मिनिटात ते बोलण्याच्या पद्धतीवरून भांडू लागतात.’
 
मुळातच स्त्री व पुरुष यांनी एकमेकांच्या नैसर्गिक स्वभावाचा अभ्यास केल्यास आपसांत प्रेम, शांतता नांदू शकते. म्हणून स्त्रियांनी पुरुषांना न मागता सल्ले देणे, नियंत्रण ठेवणे, सारख्या तक्रारी करणे, सारखं सुधारण्याचा प्रयत्न करणे… आणि पुरुषांनी स्त्रीचे म्हणणे पूर्णपणे न ऐकणे, उगीचच उपदेश देणे, तिच्या भावना व गरजांना दुय्यम स्थान देणे, तिला कमी लेखणे इत्यादी कटाक्षाने टाळून दोघांनीही एकमेकांना समजून घेणे आवश्यक असते. ‘त्याचे व तिचे नाते हे एखाद्या बगीच्याप्रमाणे असते. जर ते हिरवेगार, रसरशीत व्हावे असे वाटत असेल तर त्या बागेला नियमितपणे समजूतदारपणाची मशागत करून अनावश्यक तण बाजूला सारून, प्रेमरूपी फुलं उमलण्यासाठी दोघांनी सदैव पुढाकार घ्यायला हवा, तरच दोघांचेही जीवन आनंदी होईल..’
 
‘प्रेम’ आणि ‘सौंदर्य’ या दोहोंची उत्पत्ती व वृद्धी या प्रक्रियांची सुरुवात अंतःकरणापासून होते. सौंदर्य मनुष्याचे व्यक्तिमत्व प्रभावित करते आणि त्या सौंदर्यात प्रेम समाविष्ट केलेले असते.
 
प्रेम महासागराप्रमाणे असते, पण महासागरालाही तळ असतोच. सांसारिक प्रेमात आसक्ती असते. जर आसक्ती नसेल तर ते प्रेम, प्रेम न राहता ‘भक्ती’चे रूप धारण करते. खरंतर मोह आणि भक्ती या दोघांमधली अवस्था म्हणजे ‘प्रेम’. म्हणूनच अध्यात्मात वर्णिलेले ईश्वराप्रतीचे ‘दिव्य प्रेम’ हे अनंत आकाशाप्रमाणे असते, ज्याला कोणतीच सीमा नसते….
 
नश्वर असतात शरीरांची देणी, बंध मनाचा दृढ असणं महत्वाचं असते. खरे प्रेम कधीच वाढते किंवा कमी होत नाही. खऱ्या प्रेमात कोणतीही अट किंवा आशा नसते. खऱ्या प्रेमात एकमेकांच्या चुका दिसत नसतात. प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास, अधुरा राहतो तो श्वास… अधुरी राहते ती कहाणी…
 
मोह, सौंदर्य, प्रेम, भक्ती आणि ‘दिव्य प्रेम’.
 
 
प्रेमगंध..
©Shyam’s Blog

Avatar
About Shyam Thackare 17 Articles
एक वाचक, एक श्रोता आणि रोजच्या जीवनातून जे अनुभव गाठीशी येतील ते अलगद कागदावर उमटवणारा मी...आणि काही आठवणी, काही अनुभव, काही मतं… लेखणीद्वारे मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न…!
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..