एखाद्यावर भरभरून प्रेम करणाऱ्याला प्रेमाच्या बदल्यात कधी कधी प्रेमच मिळतं नाही. मग त्याची मानसिकता प्रेम करणाऱ्यांच्या आणि प्रेमाच्याही अगदी विरोधी बनते. आणि त्याचा प्रेमावरून विश्वास उडतो. मग तो एकेवेळी प्रेमात वेडा झालेला प्रेमीक प्रेमाचा विरोध करतो आहे असं आपल्याला भासतं. पण वास्तविक तो पुन्हा प्रेमात पडण्यासाठी प्रेमचं शोधत असतो. फक्त तिरस्काराच्या खांद्यावर बसून, एवढाच काय तो फरक असतो. प्रेम करणाऱ्याला फक्त प्रेम ठाऊक असतं, आपणास विश्वास बसत नाही पण तिरस्काराचा गाव तिथून खूप दूर असतो. आणि हे फक्त माणसांना प्रेम वाटणाऱ्या प्रेमाच्या पुजाऱ्यालाच उमजत, प्रेमात माणसं वाटणाऱ्याना नाही …!
आठवणींचा प्रवाह दाटून असतो मनात, आणि अश्या वेळी दुःख मोकळं करायला विश्वासू खांदा मिळतं नाही. तुटलेले ह्रदय दुःखाच्या आवर्तनात गुंतलेलं असतं. नेमकं अश्याच अवेळी प्रेमाला हास्याचं ग्रहण का लागतं ? मग खरा प्रेमीक प्रथम जखमेच्या हिंदोळ्यावर झुलतो, प्रेमाला प्रतिकार दर्शवतो. आणि मग सगळाच सारासार विचार फेकून देऊन आठवणींच्या लाटा किनारी लावतो, आणि पुन्हा सज्ज होतो नव्याने प्रेम करायला..! भावनेचे ढग पिंगा घालू लागतात. अश्रूची परतफेड प्रेमानेच करावी असा कुठलाच वैश्विक नियम नाही, तरी भूतकाळाच्या स्मृतिचिन्हा वर पाय देऊन प्रेम पुढचं जात असतं. आणि तोच जगावेगळा प्रेमवेडा प्रेमाच्या पुनरुत्थानाचा मार्ग प्रकट करतो….! प्रत्येक वेळी फक्त याचंच वाईट वाटतं की, त्याच्या प्रेमाचं कोणाला सोयीरसुतक नसतं…!
– © अनिलराव™
Leave a Reply