MENU
नवीन लेखन...

प्रेरणा

गावातल्या नाक्यावर असलेली जमीन डेव्हलपला देऊन बाळ्याला बिल्डर कडून बिल्डिंग मध्ये तळमजल्यावर चार गाळे मिळाले होते. वरच्या तीन मजल्यावर प्रत्येकी चार याप्रमाणे बारा ब्लॉक पैकी साठ चाळीस च्या हिशोबात पाच ब्लॉक मिळाले त्यापैकी, एका अक्खा मजल्यावर स्वतःला राहण्यासाठी चार ब्लॉक एकत्र करूनही गावातल्या जुन्या घरापेक्षा कमी जागा मिळाली. उरलेला एक ब्लॉक घरात नवीन फर्निचर आणि शो शाईन करण्यासाठी विकून टाकला. खाली मिळालेल्या चार गाळ्यापैकी एक गाळा विकून पंधरा लाखाची फोर व्हीलर घेतली. दुसरा गाळा विकून जोरात हळद आणि लग्न करून पंधरा लाखाची चटणी केली. नवीन फोर व्हिलर घेतली होती ती चालवत असताना रस्त्यात समोरून आलेल्या दुसऱ्या फोर व्हिलर वाल्याने साईड दिली नाही म्हणून त्याच्या डोक्यात गाडीतल्या स्टेपनीचा पाना घालून त्याचे डोके फोडले. हाफ मर्डरची केस लागू नये म्हणून पोलीस आणि कोर्ट कचेऱ्या करता करता तिसरा गाळा विकून परत एकदा पंधरा लाखाची चटणी केली. गावात असलेले ऐटदार जुने घर दोन वर्षातच रिकामं राहिल्याने भूत बंगल्या सारखे झाले. बापाने हिस्श्याला आलेली नाक्यावरची मोक्याची जागा तेवढी होती त्यातून फक्त एक मजला आणि एक गाळा तेवढा शिल्लक राहिला.

जेमतेम बारावी पास असल्याने बाळ्याला चांगली नोकरी मिळत नव्हती आणि गावातल्या नाक्यावर सांगायला बिल्डिंग झाल्याने मिळेल ती नोकरी करायला लाज वाटतं होती. एका गाळ्याच्या भाड्यात नवीन घेतलेल्या पंधरा लाखाच्या गाडीला डिझेल टाकायला पण पैसे पुरतं नव्हते.

लक्ष्मीच्या बापाने नाक्यावर बिल्डिंग बघून ग्रॅज्युएट झालेल्या त्याच्या देखण्या पोरीचे बाळ्यासोबत लग्न लावून दिले होते. सुरवातीला तिच्याच पायगुणामुळे बाळ्या वर विका विक करायची अवस्था आली असं बाळ्याच्या ऐतखाऊ मित्रांनी बोलायला सुरवात केली. बाळ्याची बहीण गरिबा घरी दिली होती, बाळ्याने बाप मेल्यावर मित्रांच्या आणि गावातल्या दलालांच्या नादाला लागून बहिणीला गोड बोलून नाक्यावरच्या जागेतून हक्क सोड करायला लावले होते. लबाडी करून हक्क सोड केला नसता तरी त्याच्या बहिणीने स्वतःच हिस्सा सोडला असता असा तिचा स्वभाव होता.

गावात एका लग्नाला आली असता तिला तिचे गावातल्या जुन्या घराची अवस्था बघून राहवले नाही. दुर्लक्ष केल्याने आपण ज्या घरात राहिलो, मोठे झालो त्या घराची झालेली पडझड आणि अवस्था बघून खूप वाईट वाटले. असंच दुर्लक्ष जर आपण आपल्या भावावर केले तर त्याची अवस्था पण या घरासारखी दुर्दैवी होईल असा विचार आल्याने ती घाबरली. बाळ्याला तिने फोन केला आणि गाडी घेऊन तिच्या गावात घरी पोचवायला चल असे सांगितले. बाळ्या तिला घरी सोडून निघणार तोच तिने त्याला थांबवले.

गावातल्या नाक्यावर आपली बिल्डिंग नाही बोलणार, पण तुझी एकट्याची बिल्डिंग असताना तुला फोर व्हीलर मध्ये डिझेल टाकायला पण पैसे पुरतं नाहीत यांच्यासारखे दुर्दैव नाही. ताईच्या शब्दांनी बाळ्या दुखावला खरा पण आज ती जे काही बोलेल ते निदान ऐकून तरी घेणार होता. ताईने सुरवात केली, तुझ्या दोस्तांच्या नादाला लागून सोन्यासारख्या बायकोला नावं ठेवताना तुझ्यासारख्या पुरुषाला लाज नाही का वाटत. तिचे नावच लक्ष्मी आहे, तूच जरा शहाण्या सारखा वागायला सुरवात कर जरा. नाक्यावरच्या बिल्डिंग मधल्या मजल्यावर घर बनवले आहेस त्याचे पुन्हा चार ब्लॉक कर आणि भाड्याने दे, ब्लॉक च्या डिपॉजिट मध्ये गावातले जुने घर दुरुस्त कर आणि तिथे राहायला जा.

आम्ही गरीब आहोत म्हणून तुझ्या भाऊजींना नाक्यावर वडापावची गाडी उभी करायला लागते यावरून तुला बहिणीकडे यायला लाज वाटते, पण त्याच वडापावच्या गाडीवर मेहनत करून तुझे भाऊजी आता नाक्यावर स्वतःचा गाळा विकत घेणार आहेत. खाली तुझ्या बिल्डिंग मध्ये एकुलता एक गाळा आहे तुझ्या मालकीचा महिन्याला दहा हजार भाडे घेशील की त्या गळ्यात उद्योग धंदा करून पन्नास हजार कमवशील ते ठरव तुझं तू. बाळ्याचे डोळे पाण्यात भरले पण त्याने जाता जाता ताईच्या पायावर डोके ठेवले. पुढच्या वर्षभरात बाळ्याने गाळ्यात सुरु केलेल्या वडापावच्या धंदा वाढवत नेऊन जोडीला कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम आणि फालुदा विकायला सुरुवात केली. त्याचा व्याप एवढा वाढला की त्याला गाळ्यावर चार पोरं कामाला ठेवावी लागली. ताईने त्याला दहा हजार भाड्याऐवजी पन्नास हजार कमवायचा कानमंत्र दिला होता. बाळ्याने वडापावचा धंदा सुरु केला तेव्हा फ्लॅट सोडून जुन्या घरात आनंदाने राहायला आलेल्या लक्ष्मीने तिचे नावं सार्थ करून दाखवले, बीकॉम असूनही तिने बाळ्याला वडापाव बनवण्यासाठी लागणारे बटाटे उकडण्या पासून ते गाळ्यावर फक्त बटाटे वडे उकळत्या तेलात नेऊन सोडायला लागतील एवढी तयारी सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळेला करून देत गेली.

लक्ष्मीनेच बाळ्याला सुचवले की या भाऊबीजेला ताईला ओवाळणी म्हणून वरच्या चार ब्लॉक पैकी दोन ब्लॉक नावावर करून द्यायचे. ताईने ब्लॉक घेण्यास नकार दिला पण बाळ्याने सांगितले ब्लॉक घेतले नाहीस तर विकेन आणि सगळे पैसे तुझ्या घरात आणून ठेवीन. मग ताईने नाईलाजाने रजिस्ट्रेशन करून घेतले.बाळ्याने ताईच्या नावावर दोन ब्लॉक तर केलेच पण पुढील दोन वर्षात बाजूचा विकलेला गाळा पुन्हा स्वतःच विकत घेतला आणि दोन्हीही गाळे एकत्र करून प्रेरणा रेस्टॉरंट या ताईच्याच नावाने पॉश हॉटेल सुरु केले..

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर,

B. E. (Mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..