लेखक : रामदास फुटाणे – अद्वैत फिचर्स
आचार्य अत्रेंचे ‘मी कसा झालो? ‘ हे पुस्तक वाचल्यावर आपणही वेगवेगळ्या कलांमध्ये रस घेतला पाहिजे अशी प्रेरणा मला मिळाली. त्यानंतर मी कवितांचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. अनेक कविसंमेलने आयोजित केली. माझ्या मते विविधांगी कविता करायच्या असतील तर कवीने भारतात रहायला हवं आणि इंडियातही. चांगली आणि कसदार कविता करण्याच्या दृष्टीने कवींनी प्रयत्न केला पाहिजे.
मला पहिल्यापासूनच कलेची आवड होती. विशेषतः, चित्रपट, चित्रकला आणि कविता याबद्दल मला विशेष आकर्षण वाटायचं. वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षांपासून कविता सुचायला लागल्या. तेव्हा मी आचार्य अत्रेंचे मी कसा झालो? ‘ हे पुस्तक वाचले. आपणही आपली रूची असलेल्या कलांमध्ये रस घेतला पाहिजे अशी प्रेरणा मला त्या पुस्तकातून मिळाली. १५-१६ वर्षांचा असताना मी इतरांप्रमाणेच त्या त्या वयातील जाणीवांवर प्रकाश टाकणार्या कविता करत होतो. पण, त्यांचा दर्जा सुमार होता. हळूहळू अनुभवाने कवितांमध्ये परिपक्वता येत गेली.
१९६५ मध्ये माझी पहिली कविता ‘साप्ताहिक स्वराज्य’ मध्ये छापून आली. तेव्हा मला ५ रूपये मानधन मिळाले होते. संध्याकाळी शेतात पाऊस पडायला सुरूवात होते आणि तरूण मुलगी तिथेच अडकते. त्यावेळी तिच्या मनातल्या भावना मी कागदावर उतरवल्या होत्या.
दिस गेला खाली संध्यायणी आली. आणिक यी कुळी य्नात्च आशाच्या शली. गोऱ्या गोऱ्या गाली प्रसरली लाली गुलाबाची ढगांचे चुंबन घेतसे किरण, सूर्य तया ओढून नेई खाली, सुगंध मातीचा सुटला रानात, संगीत कानात गाई वारा, जवानीत पोर, आई-बापा घोर, इश्काचे गं चोर न्याहाळती आल्या आल्या सरी, चल आता घरी, वाट पाहती दारी आई-बाप
अशा आशयाची ती कविता चमकली. त्या कवितेबद्दल मला बरेच अभिप्रायही आले. मी हिंदी माध्यमाच्या शाळेत असताना एकदा एका हिंदी कविसंमेलनाला गेलो होतो. ‘हास्यरस’ असे त्या कविसंमेलनाचे नाव होते. कवितांचे सादरीकरण सुरू असताना मी अधूनमधून विनोदी चुटकेही सांगत असे. कविसंमेलनातील कविता ऐकत असताना आपणही अशा कविता लिहू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला आणि मी व्यंगकवितेकडे वळलो.
‘कटपीस’ ही माझी पहिली हिंदी व्यंगकविता. माझी ही कविता बऱ्याच ठिकाणी छापून आली. बर्याच कविसंमेलनांमध्ये सादर झाली. कवितेला मानधन मिळते हे मला हिंदी काव्यसंमेलनांमुळे कळले. ‘कटपीस’साठी मला सुरूवातीला ११ रूपये मानधन मिळायचे. त्यानंतर सत्तरच्या दशकापर्यंत य कवितेला १००० रूपये मानधन मिळू लागले. त्यावेळी लोळण आणि ज्येष्ठ कवींना ३००० ते ५००० रूपये मानधन मिळायचे त्यामानाने मला बऱयापैकी पैसे मिळत होते. मी वेगवेगळ्या आशयाच्या कविता करायचो, त्या श्रोत्यांपर्यंत, वाचकांपर्यंत घेऊन जायचो. त्याचा वाचक आणि श्रोत्यांचा चांगला प्रतिसादही मिळायचा. अशा प्रकारे कवितेच्या गावात मी चांगला रमलो होतो.
काही काळाने कवितेपासून दूर जाऊन मी चित्रपटव्यवसायात आलो. ‘सामना’ या चित्रपटाची निर्मिती केली, ‘सर्वसाक्षी’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. त्यावेळी खूप खर्च झाला. चित्रपटक्षेत्रातील अनुभवानंतर मी कमी भांडवलाचा धंदा म्हणून पुन्हा कवितेकडे वळलो.
तेव्हा चित्रपटाचे कर्ज डोक्यावर होते. या काळात कवितांनीच मला साथ दिली. कवितांचे कार्यक्रम करून मी बँकेचे कर्ज फेडले. माझ्या या लगबगीवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. त्यानंतर मानधन घेऊन कवितांचे कार्यक्रम करण्याची परंपराच सुरू झाली. त्याआधी बापट, पाडगावकर, करंदीकर हे तीन कवी मानधन घेऊन कवितांचे कार्यक्रम करत असत. पण, कविसंमेलन त्या तिघांपुरतेच मर्यादित होते. मी कविसंमेलनातून खेड्यापाड्यातील कवींना पुण्या-मुंबईच्या व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला. तसेच पुण्याचे कवी ग्रामीण भागात घेऊन जायचे ठरवले. १९८२ पासून माझा हा प्रयत्न सुरू आहे. गेली २५ वर्षे मी कविता चळवळीचे हे काम करत आहे. कारण, ग्रामीण भागातील कविता शहरातील लोकांपर्यंत आणि शहरातल्या कविता खेड्यापाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचण्याची गरज आहे असे मला वाटते. असे झाले तरच रसिकांना वेगळ्या आशयाच्या कवितांची ओळख होऊ शकते.
पूर्वीच्या आणि आताच्या कवितेमध्ये फरक पडला असला तरी त्यांचा दर्जा मात्र ढासळलेला नाही. फक्त गरज आहे ती सध्याच्या कवींनी वेगवेगळे विषय हाताळण्याची. चांगली कविता सुचण्यासाठी भारतात रहावं लागतं आणि इंडियातही. तसं केलं तरच कविता बहुआयामी होतात. कविता स्वांतसुखाय लिहिली गेली असेल तर क्षणभंगुर ठरते. त्यामुळे कवींनी केवळ निसर्गामध्ये, फुला-पानांमध्ये, प्रेमामध्ये न रमता सामाजिक आशयाकडे वळले पाहिजे. क्लिष्टतेकडे न जाता लोकबाजेचा स्वीकार केला पाहिजे. मी माझ्या कवितांमध्ये असेच प्रयोग केले. त्यामुळे या कविता नागपूरपासून गोव्यापर्यंत आणि बंगळुरूपासून मुंबईपर्यंत पोहोचल्या. मी अमेरिकेतही तीन-चार कार्यक्रम केले. माझ्या “भारत कधी कधी माझा देश आहे’ या
कार्यक्रमाला आता २५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या कार्यक्रमातल्या कवितांचे पुढच्या पिढीलाही आकर्षण वाटत आहे. कविता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायाची असेल तर त्याचे सर्व कंगोरे तपासून पहावे लागतात. लोकांच्या मनातले प्रश्न, विचार आणि भावनांचे कललीळ कवितेमधून साध्या-सोप्या शब्दात व्यक्त केले तर ती सर्वांपर्यंत पोहोचते आणि दीर्घकाळ टिकते.
भाष्यकविता, व्यंगकविता बोलक्या असल्याने लोकप्रिय होतात. कविता ही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी नसून श्रोत्यांसाठी, जनसमुदायासाठी असली पाहिजे. कवितांचे पुस्तकातल्या कविता आणि रंगमंचावरच्या कविता असे प्रकार असतात. श्रोत्यांना रंगमंचावरील कवितांचा समुहाने आस्वाद घेता येतो. काही कविता केवळ वाचकांसाठी असतात. त्यांचा आनंद एकांतातच घेता येतो. रसिकांनी दोन्ही प्रकारच्या कवितांचे स्वागत केले पाहिजे. बरेचदा व्यंगकविता हास्यास्पद मानल्या जातात. जे आपल्या अवतीभवती घडतं, मग ते राजकारण असो वा समाजकारण, त्यावर व्यंगचित्र बोलत असेल तर व्यंगकवितेला नाकं मुरडण्यात काय अर्थ आहे? कधी कधी हा प्रबोधनासाठी उपरोध परिणामकारक ठरू शकतो याचा अनुभव आपल्याला बरेचदा येत असतो. कवितांमधून रंजनाबरोबरच प्रबोधनही घडत असते. आपल्याकडील समीक्षा मोठी विचित्र आहे. गुलाबाचे फूल झेंडूसारखे का दिसत नाही, झेंडुच्या फुलाला मोगऱ्याचा वास का येत नाही, मोगरा गुलाबासारखा का दिसत नाही अशी वायफळ चर्चा मराठी समिक्षेतून होत असते आणि मूळ कलेकडे दुर्लक्ष केले जाते.
आपले साहित्य समाजासाठी असते हे कवींनी विसरून चालणार नाही. लोकभाषा ही कवितांची गरज आहे. म्हणूनच मी भाष्यकविता करताना समीक्षकांना काय वाटते याचा कधीच विचार केला नाही. त्यामुळे ३० वर्षांच्या कवितेच्या चळवळीकडे समिक्षेने दुर्लक्ष केले आहे. मी आतापर्यंत बरीच कविसंमेलने आयोजित केली. या कविसंमेलनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कविता सादर केल्या जातात. यातील बर्याच कविता विनोदाच्या अंगाने गांभीर्याकडे जाणाऱ्या असतात. या कविता ऐकण्यासाठी भरपूर गर्दी जमते. अशा कवितांना महाराष्ट्रात मंचीय कविता’ म्हणून हिणवण्याची पद्धत आहे. पण, त्या प्रबोधनाच्या उद्देशानेच केल्या जातात. कविसंमेलन सादर करताना थोडे विनोदी चुटके, वात्रटिका आल्या तर साहित्याकडे न वळणारे लोकही उत्सुकतेने कविता ऐकतात. पण, आम्ही केवळ बघे निर्माण केले असा आरोप होतो. परंतु, बघ्यांना श्रोते करणे, श्रोत्यांना वाचक करणे, वाचकांना अंतर्मुख करणे हा आमचा उद्देश असतो.
सध्याच्या काळात कसदार कविता कमी झालेल्या नाहीत किंवा रसिकांची आवडही कमी झालेली नाही. चांगली कविता टिकते आणि श्रोत्यांना आवडतेही. त्यामुळे अर्थघन कसदार कविता करण्याच्या दृष्टीने कवींनी प्रयत्न केला पाहिजे. कवितेत क्लिष्टता असेल तरच ती श्रेष्ठ ठरते असा गैरसमज आहे. हा गैरसमज सर्वप्रथम दूर केला पाहिजे. कविता साधी-सोपी आणि रसिकांना कळणारी असेल तर ती जास्त काळ टिकते. महाराष्ट्रातील सर्व नवे कवी उमदे आणि हुशार आहेत. ते शबरीच्या बोरांप्रमाणे आहेत. त्यांनी रसिकांची रूची लक्षात घेऊन कसदार कविता लिहायला हव्यात. मी शंभर वर्षांनंतर लोकांच्या लक्षात राहिलो, त्यांनी तेव्हाही माझ्या कविता वाचल्या तरच मी खरा कवी आहे हे सिद्ध होऊ शकते. त्यामुळे दूरदृष्टी ठेवून कवितांची निर्मिती केली गेली तर त्या शेकडो वर्षे रसिकांच्या स्मरणात राहतील आणि कवितेच्या गावी कायमस्वरूपी मुक्काम करतील.
रामदास फुटाणे
अद्वैत फिचर्स (SV10)
Leave a Reply