नवीन लेखन...

व्यंगचित्रकारांना असुरक्षित वाटेल अशी आजची परिस्थिती

अ.भा. व्यंगचित्रकार संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे

ठाणे येथे २० व २१ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या अ.भा. व्यंगचित्रकार संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे ह्यांचे अध्यक्षीय भाषण


व्यंगचित्रकारांना या देशात असुरक्षित वाटेल अशी आजची परिस्थिती

सस्नेह नमस्कार,

उपस्थित सर्व व्यंगचित्रकार, संपादक, पत्रकार व रसिक ठाणेकर आपणा सर्वांचे मन:पूर्वक स्वागत !

आम्ही व्यंगचित्रकार खरंतर `अल्पसंख्यांक’च! १३२ कोटीच्या देशात जेमतेम १४० व्यावसायिक व्यंगचित्रकार आहेत. महाराष्ट्रात वैचारिक बैठक, संस्कार, वाचन बNयापैकी असल्याने व्यंगचित्रकारांची संख्या अन्य राज्यांच्या तुलनेने थोडी जास्त आहे.

मराठी व्यंगचित्रकारांची प्रतिभा, विनोदबुद्धी, कल्पकता वाखाणण्यासारखी असूनही आजकालच्या माध्यमांच्या रेट्यामुळे ही कलाच लुप्त होईल की काय ? अशी भीती वाटू लागली आहे.

दैनिकांच्या वाचकांना राजकीय व्यंगचित्रं हवी असतात. म्हणूनच एखाद्या नेत्याच्या गैरवर्तणुकी विरोधातील जनतेच्या भावना जेव्हा व्यंगचित्रातून मांडल्या जातात तेव्हा वाचक सुखावून जातात. दर्दी वाचकांना खरोखरच अशी व्यंगचित्रे पाहायला हवी असतात.
पूर्वी राजकीय व्यंगचित्रे पहिल्या पानावर, ३ कॉलम रूंदीत छापली जात असत. हळूहळू ती आतल्या पानांवर गेली. (पहिल्या पानावर बिल्डरांच्या जाहिराती असतात म्हणून नव्हे… हल्ली तर काही दैनिकांचे मुख्य पहिले पानच पाचवे किंवा सातवे असते!) …आणि आता तर महाराष्ट्रातल्या आघाडीच्या, महत्त्वाच्या दैनिकांनी `राजकीय व्यंगचित्रेच’ छापणे थांबवले.

(पॉकेट कार्टुन्स / सोशल कार्टुन्स रोज छापणारी दैनिकेही आता हाताच्या बोटावर मोजावी लागतील़ हे असे का होत आहे ? यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.)

छापील मिडियात संधी नाही म्हणून काही व्यंगचित्रकार स्वत: अशी व्यंगचित्रे रेखाटून सोशल मिडियावर पोस्ट करू लागले आहेत. व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरच्या लोकप्रियतेमुळे अशी व्यंगचित्रे क्षणार्धात सर्वदूर पसरतातही.. त्यांना प्रतिसादही खूप चांगला मिळतो. पण त्या व्यंगचित्रकारास ती चित्रे रेखाटण्याबाबत मानधन मिळत नाही.. सारा हौशीचाच मामला !

खरंतर खऱ्या, सुजाण राजकीय नेत्यांचा राजकीय व्यंगचित्रांना विरोध नसतो. उलट माध्यमात मिळणाऱ्या `ह्या’ फुकटच्या प्रसिद्धीचाही ते आनंद लुटतात. अगदी आपल्या मुख्यमंत्र्यांचाही त्यांच्यावरच्या व्यंगचित्रांना आक्षेप नसतो. (फक्त चित्रात दाखवलेल्या मोठ्या पोटाबाबत ते नाराज असतात.)

पण राजकीय नेत्यांचे सो कॉल्ड-फॉलोअर्स, कार्यकर्ते (?) यांची टोळकी सवंग प्रसिद्धीसाठी दंगे, दगडफेक, जाळपोळ, काळे फासणे असे उद्योग करतात. सध्या तर कोणत्याही क्षुल्लक गोष्टींमुळे भावना दुखावल्या जातात. ते पाहिलं की आजच्या काळात पु.ल., पाडगांवकर, आचार्य अत्रे, चिं. वि. जोशी, दत्तु बांदेकर यांनाही मनासारखे लिहिताच आले नसते. टी-शर्टवर नेत्यांचे फोटो व घोषणा रंगवून फिरणारे गल्लीबोळातले दादा, नेते, प्रमुख इत्यादींची टोळकी यांना घाबरून अशी व्यंगचित्रे प्रकाशित होणार नसतील तर ती गोष्ट लोकशाहीला मारक आहे. नेमकेपणाने व्यंगावर बोट ठेवत समोरच्याची खिल्ली उडवण्याची जी ताकद व्यंगचित्रात आहे तिला हिटलरसारखा हुकुमशहासुद्धा घाबरत असे.

मुद्याला प्रतिवाद मुद्यांनीच करायचा असतो, शब्दांना शब्दांनी विंâवा लेखणीने उत्तर द्यायचे असते हेच आता अनेकांच्या गावी नाही. समज कमी असल्याने राजकीय व्यंगचित्रांना सर्वत्र विरोध होतो आहे हे खेदजनक आहे. ह्यामागे नेमवंâ कोण आहे ? याचा शोध घेणं अशक्य आहे.. पण `व्यंगचित्रकारांना या देशात असुरक्षित वाटेल’ अशी परिस्थिती निर्माण करण्यात मिडियाला यश आलेलं आहे.

मी सर्वांना हे सांगू इच्छितो आपल्याकडे दर्जेदार व्यंगचित्रे रेखाटणार्‍या व्यंगचित्रकारांची कमतरता नाही. `हास्यदर्शन २०१८’ ह्या प्रदर्शनात असलेली शेकडो व्यंगचित्रेच याची साक्ष पटवतील. केवळ व्यावसायिकच नव्हे तर सामान्य जनतेने व नवोदित चित्रकारांनी व्यंगचित्र स्पर्धेसाठी देश-परदेशातून त्यांची हास्य-व्यंगचित्रे मोठ्या संख्येने आमच्याकडे पाठवली याचा आम्हाला अभिमान वाटतो.
नव्या पिढीतील मराठी व्यंगचित्रकारांची शैली स्वतंत्र आहे. त्यांच्याकडे बौद्धिक क्षमता तर आहेच पण तंत्रज्ञानाची सोबत त्यांच्या रेखाटनाला मिळत आहे. त्यांच्याकडून दर्जेदार व्यंगचित्रांची भरघोस व्यंगचित्र निर्मिती यापुढच्या काळात होईल याची मला खात्री आहे.
आपल्या मुलांनी सिनेनट, खेळाडू, राजकारणी, आय. ए. एस अधिकारी किंवा बिल्डर व्हावे असे हल्लीच्या पालकांना वाटते. पण त्याने हास्य-व्यंगचित्रकार होऊन उत्तम नाव व भरपूर पैसा मिळवावा असे पालकांना वाटत नाही. महिला व्यंगचित्रकारांचे प्रमाण तर अगदीच नगण्य आहे.

आमच्या क्षेत्रात करिअरच्या संधी किती व कशा आहेत हे जाणून घेण्याची इच्छा अशा संमेलनांमुळे होईल अशी मला आशा वाटते. इंटरनेटमुळे जग म्हणजे एक `ग्लोबल गाव’ झाले आहे. मराठी व्यंगचित्रकारांच्या चित्रांना देश-परदेशात प्रचंड वाव मिळू शकतो त्यासाठी आपली भाषा चांगली हवी. वाचन भरपूर हवे व विषय नेमकेपणाने, कमी शब्दात उत्तम रेखाटनांसह मांडता यायला हवा. संमेलनातील परिसंवादांमध्ये ह्या सर्व मुद्यांवर साधक बाधक चर्चा होत आहे याचा आनंद वाटतो.

व्यंगचित्रकारांना साहित्यिकाचा दर्जा द्यावा असे १०० वर्षांनंतरही कोणाला वाटत नाही. मराठीतील उत्तम खपाच्या दिवाळी अंकांमध्ये विनोदी अंकांचे स्थान वरचे आहे. ज्यामध्ये अनेक हास्यचित्रे रसिकांचे मनोरंजन करीत आहेत. ही परंपरा फार वर्षांपासून असूनही साहित्य संमेलनातील कार्यक्रमांच्या व्यासपीठांवर व्यंगचित्रकारांना निमंत्रण नसते. चित्रकार, नवचित्रकार, स्थापत्य रचनाकारही अजूनही व्यंगचित्रकारांना आपल्या सोबत घेत नाहीत. यामुळे व्यंगचित्रकारांची स्थिती `ना घर का ना घाट का’ अशी झालेली आढळते.

येवला हे शहर पैठणीच्या नजाकतीसाठी प्रसिद्ध आहे. या संमेलनाच्या निमित्ताने येवला येथील ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री. प्रभाकर झळके ह्यांना `जीवनगौरव’ सन्मानाने पुरस्कृत करण्याचे निश्चित केले. श्री. झळके ह्यांनी उभी हयात रसिकांना हसवत घालवली. त्यांच्या कलासेवेबद्दल, अजोड कर्तृत्वाबद्दल व असामान्य सामाजिक सेवेबद्दल हा `कार्टुनिस्ट कंबाईन – पितांबरी जीवन गौरव’ पुरस्कार म्हणून देण्यासाठी श्री. रविंद्र प्रभुदेसाई यांचे सहकार्य लाभले.

उद्घाटक म्हणून लाभलेले ज्येष्ठ चित्रकार श्री. सुहास बहुलकर, नटश्रेष्ठ श्री. जयंत सावरकर, व्यंगचित्रकार श्री. राजसाहेब ठाकरे, तसेच परिसंवादांत सहभागी झालेले सर्व पत्रकार, चित्रकार यांचे मन:पूर्वक आभार.

देशभरातील मराठी व्यंगचित्रकारांचे आदरातिथ्य करणाऱ्या सौ. रूचिता व राजेश मोरे या दांपत्याला आम्ही साद घातली. हे दोघेही ठाणेकरांच्या मदतीसाठी सातत्याने पुढाकार घेत असतात. त्यांनी तत्परतेने प्रतिसाद देऊन हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

जगभरातील नवोदित कल्पक मराठी तरुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून आम्ही `व्यंगचित्र स्पर्धा’ आयोजित केली. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके घोषित करून देणारे `आवाज’ ह्या लोकप्रिय दिवाळी अंकाचे संपादक श्री. भारतभूषण पाटकर यांचेही आभार.
आमची ही चळवळ, आमचे उपक्रम अधिक व्यापक होण्यासाठी ह्या ठाणे शहरातील हे `हास्यदर्शन’ संमेलन निश्चितच मोठी भूमिका बजावणारे ठरेल याची खात्री आहे.

पत्रकार, मिडिया, राजकीय क्षेत्रातील अनेक जणांनी संमेलनास प्रोत्साहन देऊन आमचे बळ वाढवले. हास्य-व्यंगचित्र संमेलनाच्या सुखद स्मृती उपस्थित व्यंगचित्रकारांच्या व ठाणेकरांच्या स्मरणात अनेक वर्षे राहतील.

आपलाच,

विवेक मेहेत्रे
अध्यक्ष, कार्टुनिस्टस् कंबाईन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..